Tuesday, May 9, 2023

परमात्मा-जगाचा संबंध | Supreme Being – World Relationship

 



निर्गुण, निराकार, निरवयव, निर्विशेष, निर्विकार, नित्य शाश्वत चैतन्यस्वरूपाने सगुण, साकार, सावयव, जड, अनृत विश्वाला व्याप्त करून प्रकाशमान केलेले असेल, तर परमात्म्याचा आणि जगाचा काय संबंध आहे ?  कारण परब्रह्म प्रकाशक आहे आणि विश्व प्रकाश्य आहे.  त्यामुळे प्रकाशक आणि प्रकाश्य वस्तू नित्य भिन्न असतात, हा सर्वांचा लोकप्रसिद्ध अनुभव आहे.  त्याचप्रमाणे विश्व सुद्धा परब्रह्मापासून भिन्न आहे का ?  त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ?  भगवान उत्तर देतात – मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः |

 

आचार्यांनी दृष्टांत दिलेला आहे.  तरंग किंवा लाट पाहाताना दोन गोष्टी दिसतात.  एक पाण्याची सत्ता आणि दुसरी नामरूपात्मक लाट किंवा तरंग.  मग त्या नामरूपाचे स्वरूप काय आहे ?  जर अत्यंत जवळून पाहिले तर लाटेमध्ये अंतर्बाह्य फक्त पाणीच आहे.  त्यामुळे आपण लाटेला स्पर्श करीत नाही, तर फक्त पाण्यालाच स्पर्श करतो.  जेथे पाहातो तेथे पाणीच आहे.  फक्त पाणी वरती आल्यानंतर दिसणारे एक रूप दुसऱ्या रूपापासून भिन्न करण्यासाठी आम्ही नावे देतो.  हा तरंग, हा बुडबुडा, ही लाट वगैरे.  म्हणजेच ही सर्व नाम आणि रूपे पाण्यामध्ये दिसणारा भास आहे.  म्हणून ती सर्व नामरूपे मिथ्या आहेत.  मिथ्या याचा अर्थ ज्यांना स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही, तर ती दुसऱ्याच्या सत्तेवर अवलंबून आहेत.  ज्यावेळी आपण म्हणतो लाट आहे, तेव्हा “पाणी आहे, म्हणून लाट आहे” असा अर्थ आहे.  परंतु लाट नाही तरीही पाणी आहेच.  त्यामुळे एकही लाट पाण्याच्या सत्तेपासून दूर नाही, भिन्न नाही किंवा बाहेरही नाही.

 

याप्रमाणे दार्ष्ट्रांतामध्ये पाहिले तर पाणीस्थानीय निर्विशेष, निर्विकार, निरुपाधिक प्रत्यगात्मस्वरूपाने असलेले सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आणि त्याव्यतिरिक्त अव्यक्तापासून स्थूलापर्यंत अनुभवाला येणारी तरंग-बुडबुडे स्थानीय सर्व भूतमात्रे आहेत.  त्यावेळी भगवान म्हणू शकतील की हे अर्जुना !  तुझ्यासहित सर्व भूतमात्रे माझ्या – परमात्म्याच्या प्रत्यगात्मस्वरूपाच्या सत्तेमुळे सत्तावान होऊन माझ्याच पारमार्थिक सत्तेमध्ये म्हणजेच सच्चिदानंदस्वरूपामध्ये अस्तित्वात आहेत.  त्यांना स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही, तर त्यांना मिळालेली माझीच परमात्म्याची सत्ता आहे.  “मी आहे” हे म्हणण्यासाठी सुद्धा माझी आत्मचैतन्याची सत्ता आवश्यक आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ