Tuesday, April 11, 2023

तपस्वी, ज्ञानी, कर्मठ, योगी | Penancer, Seeker, Orthodox, Self-Realized

 



तपसा कल्मषं हन्ति इति स्मरणात् |  तपाने पापांचा क्षय होतो.  तरी सुद्धा कोणतेही तप मर्यादित आणि अल्प फळ देणारे आहे.  याचे कारण जीवाने अनेक जन्मांच्यामध्ये अनेक पातके केलेली असल्यामुळे केवळ तापाच्या अनुष्ठानाने त्यांचा संपूर्ण नाश होत नाही.  विशिष्ट तप एखाद्या विशिष्ट पापाचा नाश करीत असल्यामुळे तपाचे फळ हे मर्यादित आहे.  केवळ तपाने सर्व पापांचे कारण अज्ञान आणि भोगवासना नष्ट होत नाही.  त्यामुळे ब्रह्मज्ञानी यतीला मिळणारे अमर्याद फळ स्वस्वरूपाची आत्मतृप्ति आणि निरतिशय शांति प्राप्त होत नाही.

 

तपस्वी अनेक प्रकारचे तपानुष्ठान करून संसारांतर्गतच राहातो.  तो तपस्वी असूनही संसारीच आहे.  तसेच कोणतेही तप हे अज्ञानजन्यच असल्यामुळे द्वैतदृष्टि किंवा भेदाची दृष्टि नाश होत नाही.  द्वैतात् हि भयं भवति |  उदरमंतरं कुरुते अथ तस्य भयं भवति |  - यत्किंचित भेदबुद्धि सुद्धा संसाराला कारण आहे.  याउलट स्वस्वरूपामध्ये स्थिर झालेला यति अज्ञानध्वंस करून परमपावन करणारी परमोच्च अद्वैताची दृष्टि प्राप्त करतो.  आत्मवित् शोकं तरति |  - आत्मज्ञानी शोकसागराला पार करतो.  म्हणून ब्रह्मज्ञानी यति तपस्वी पुरुषापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे.

 

ज्ञानिऽभ्योपि मतोऽधिकः |  सम्यक ज्ञान प्राप्त केलेला यति ज्ञानीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे.  येथे ज्ञानी याचा अर्थ ज्याने शास्त्रअध्ययन केलेले आहे आणि त्यामधून त्याला फक्त शब्दबोध झालेला आहे, परंतु सम्यक ज्ञानाची दृष्टि प्राप्त झालेली नाही.  याउलट यति म्हणजे तत्त्वार्थ जाणून सम्यक ज्ञानाची अभेद दृष्टि प्राप्त केलेला जीवनमुक्त पुरुष आहे.

 

कर्मिभ्यश्चाधिको योगी |  – कर्मठ पुरुषाहूनही योगी श्रेष्ठ आहे.  कर्मठ मनुष्य नित्यनिरंतर अग्निहोत्रादि वैदिक कर्मांच्या अनुष्ठानामध्ये प्रवृत्त झालेला असतो.  त्याची वेदावर व वेदोक्त कर्मावरच श्रद्धा, निष्ठा असते.  त्याचे लक्ष फक्त ऐहिक आणि पारलौकिक फळांवरच असते.  याप्रकारची कूपमंडुक, मर्यादित दृष्टि असते.  तसेच त्याची ती द्वैताची दृष्टि असून अज्ञानांतर्गतच आहे.  तो कर्म-कर्मफळाच्या संसारामध्ये बद्ध झालेला आहे.  याउलट ब्रह्मज्ञानी सर्व कर्म-कर्मफळामधून निवृत्त झालेला, अज्ञानध्वंस करून अद्वैताची सम्यक दृष्टि प्राप्त झालेला असल्यामुळे संसारातील कर्म करूनही तो बद्ध होत नाही.  तो आत्मतृप्त आणि संतुष्ट, कृतकृत्य पुरुष आहे.  या सर्व कारणांमुळे तपस्वी, ज्ञानी आणि कर्मठ पुरुषांहून सम्यक ज्ञानवान योगी श्रेष्ठ आहे.


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ