वसिष्ठ मुनि सांगतात की, ज्याला प्रश्न विचारावेत
तो वक्ता प्रामाणिक असावा. येथे प्रामाणिक
म्हणजे ज्याला वेदांतशास्त्राचे परिपूर्ण ज्ञान आहे, ज्याने या श्रेष्ठ गुरूपरंपरेमध्ये
स्वतः अध्ययन केले आहे आणि ज्याने विज्ञानसहित म्हणजे अनुभवसहित ज्ञानाची प्राप्ति
केली आहे, असाच वक्ता आवश्यक आहे. असा वक्ता
म्हणजे आपले गुरु होय. न गुरोरधिकं
तत्त्वं न गुरोरधिकं तपः | तत्त्वज्ञानात्परं
नास्ति तस्मै श्री गुरवे नमः || (गुरुगीता)
गुरूपेक्षा अधिक श्रेष्ठ दुसरे तत्त्व
नाही, गुरुसेवेपेक्षा दुसरी श्रेष्ठ तपश्चर्या नाही. तत्त्वज्ञानापेक्षा अधिक श्रेष्ठ या जगात दुसरे काहीही
नाही. म्हणून गुरु हे स्वतःच ज्ञानस्वरूप आहेत.
शिष्याच्या अंतःकरणामधील अज्ञान आणि अज्ञानापासून
निर्माण झालेल्या भ्रामक कल्पना आत्मज्ञानाच्या साहाय्याने नष्ट करणे, हेच गुरूंचे
कार्य आहे. शिष्याला ज्ञान द्यावयाचे असेल
तर प्रथम गुरूंना यथार्थ व निःसंशय ज्ञान असले पाहिजे. तसेच या ज्ञानाचा अनुभव ही पाहिजे.
ज्याप्रमाणे एखाद्याने साखर खाल्ल्यावर साखर
गोड आहे, असे म्हणणे आणि एखाद्याने साखर कधीच खाल्ली नसेल तरी साखर गोड आहे असे म्हणणे,
यामध्येही दोन वाक्ये सारखी असतील तरी ती खूप भिन्न आहेत. एका वाक्यात स्वानुभव आहे तर दुसरे वाक्य अनुभवरहित
आहे. अनुभवरहित वाक्याला कोणताही अर्थ उरत
नाही. कारण त्यावर कोणी शंका विचारली तर त्याला
उत्तर देता येत नाही. कारण ते वाक्य अनुभवाचे
नसून पाठांतर केलेले असते. मात्र ज्याने
साखरेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असेल त्याच्यावर कोणी कितीही शंका उत्पन्न केल्या तरी
त्याचे ज्ञान ठाम आणि निश्चयपूर्वक असते.
तसेच ज्ञानी पुरुषाला अनुभव असणे महत्त्वाचे
आहे. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज सांगतात
- संतत्व नाही मठात । संतत्व नाही विद्वात्तेत । संतत्व नाही कवित्वात । तेथे स्वानुभव पाहिजे ।। याप्रमाणे अशा अधिकारी गुरूंना प्रश्न विचारल्या
नंतर त्यांची यथार्थ वचने शिष्याने ऐकावीत. इतकेच नव्हे तर त्यांच्या प्रत्येक शब्दाचे आणि आज्ञेचे
तंतोतंत पालन करावे. म्हणून साधकाने एक
तर प्रश्न विचारू नयेत आणि विचारले तर मात्र ती आज्ञा शिरसावंद्य मानून पालन करावी.
परंतु जो गुरुआज्ञेचे उल्लंघन करतो, गुरूंच्या
वचनाप्रमाणे वागत नाही, त्याच्यासारखा अधम आणि निकृष्ट दुसरा कोणी पुरुष या जगात नाही.
म्हणून सत्पुरुषांचे शब्द उल्लंघन करणारा मनुष्य
या जगात अधमाधम मनुष्य आहे.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–