Tuesday, February 28, 2023

भक्तीचे फळ तात्काळ मिळते | Result Of Devotion Is Instantaneous

 



भक्ति साधकाला ईश्वराभिमुख करून शेवटी ईश्वरस्वरूप बनविते.  भक्तीची पक्वता हेच भक्तीचे फळ आहे.  ते म्हणजे - यल्लब्ध्वा पुमान् सिद्धः भवति, अमृतः भवति, तुप्तः भवति |  म्हणून भक्ति प्राप्त झाली की, भक्त आनंदस्वरूप होतो.  हा आनंद कालांतराने नसून ज्याक्षणी भक्तीचा अनन्य भाव निर्माण होतो त्याचक्षणी तो आनंदरस लुटतो.  हा भाव अंतःकरणातील काम-क्रोध, लोभ-मोह, मद-मत्सर, दंभ-दर्प वगैरे दोष नाहीसे करतो आणि सत्य, नम्रता, करुणा, दया, त्याग वगैरे गुणांना भरती येते.  गुणांचा उत्कर्ष होतो.  अहंकार-ममकार नाहीसा होऊन समर्पण, शरणागति येते.  मन अत्यंत शुद्ध, सात्त्विक, प्रसन्न अंतर्मुख होऊन गुणसंपन्न होते.  भक्त मधुरभाषी होतो.  अंतर्बाहय वृत्ति ईश्वरस्वरूपामध्ये तल्लीन होते.  म्हणून भक्तीचा भाव उदयाला आल्यानंतर होणारा जो अत्यानंदाचा अनुभव आहे.  तो इहलोक आणि परलोकामध्ये मिळणाऱ्या सुखापेक्षा अनंतपटीने अधिक श्रेष्ठ आहे.

 

भक्त्या संजातया भक्त्या - भक्तीचे फळ भक्ति हेच आहे.  भक्त कधीही कोणतीही मुक्ति मागत नाही.  सालोक्य मुक्ति - भगवंताच्या लोकामध्ये जाऊन राहाणे, सामीप्य मुक्ति - भगवंताच्या अत्यंत जवळ जाऊन त्याची माळ, आभूषण वगैरे होऊन राहाणे, सारुप्य - भगवंताच्या रूपामध्ये बनणे आणि सायुज्य - भगवंताच्या विग्रहामध्ये एकरूप होणे.  याउलट भक्त परमेश्वराची सेवा मागतो.  कल्याणगुण गावयास मागतो, परमेश्वराची प्रसन्नता हीच भक्ताची इच्छा असते.  यालाच सेवा म्हणतात.  आनुकूल्येन कृष्णानुशीलनं भक्तिरुत्तमा |  श्रीकृष्णाच्या अनुकूल होऊन त्याचे अखंड चिंतन करणे हीच उत्तम भक्ति आहे.

 

अन्य सर्व मार्गामध्ये साधकाला कालांतराने फळ मिळते.  कर्मामध्ये यज्ञाचे फळ स्वर्गप्राप्ति हे वर्तमान शरीराचा मृत्यु झाल्यानंतर मिळते.  ज्ञानमार्गामध्ये अनेक प्रकारच्या साधनेने साधनचतुष्टय प्राप्त होते आणि नंतर श्रवण, मनन, निदिध्यासाने व समाधिअभ्यासाने अद्वैतसिद्धि मिळते.  त्याचवेळी मोक्षप्राप्ति होते.  हे एका जन्मात प्राप्त होत नसून, अनेक जन्मांच्यामध्ये केलेल्या साधनेच्या प्रभावाने शेवटी मिळते.  योगाभ्यासामध्येही तेच आहे.  यमनियमांची सिद्धि करून धारणा, ध्यान, समाधीच्या अभ्यासाने योगनिष्ठा मिळते.  या सर्व साधनेमध्ये अत्यंत कठीण परिश्रम आहेत.  अनेक वेळेला नैराश्य येते; परंतु भक्तीमध्ये मात्र काहीही नाही.  फळ तात्काळ मिळते.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006


- हरी ॐ