Tuesday, March 7, 2023

राजविद्या आणि राजर्षि | Supreme Knowledge And Sage-Kings

 



सर्व विद्यांच्यामध्ये अध्यात्मविद्येला प्रथम स्थान होते.  राजदंडापेक्षाही धर्मदंडाला उच्च स्थान होते.  राज्य, राजा आणि प्रजा या सर्वांच्यावर धर्माचा, ज्ञानाचा, ज्ञानी सत्पुरुषांचा अंकुश होता आणि त्यांच्या सामर्थ्यशाली अधिकारवाणीने संपूर्ण राष्ट्र नियमित होत होते.  राज्यामध्ये न्यायला व आचारधर्माला सर्वोच्च स्थान होते.  कारण या सर्वांच्यामागे अध्यात्मविद्येचे अधिष्ठान होते.  म्हणून या विद्येला 'राजविद्या' असेही म्हटले जाते.  'राजविद्या' म्हणजे सर्वप्रथम ही क्षत्रिय राजांना उपदेशिली गेली.  किंवा दुसरा अर्थ, राजविद्या म्हणजेच सर्वश्रेष्ठ विद्या होय.  याप्रकारे समाजामध्ये या राजविद्येचा प्रचार आणि प्रसार झाला.

 

सर्वश्रेष्ठ असल्यामुळे ही विद्या सर्व विद्यांची साम्राज्ञी आहे.  तसेच ही विद्या 'राजगुह्य' म्हणजे अत्यंत गोपनीय, गुह्य व रहस्यमय विद्या आहे.  याचे कारण या विद्येचा म्हणजे अध्यात्मिक ज्ञानाचा विषय आत्मवस्तु असून, आत्मस्वरूप हे अत्यंत सूक्ष्म व अदृश्य आहे.  विश्वामधील अन्य सर्व विषय डोळ्यांनी दृश्य रूपाने दिसतात.  इंद्रियांना व मनाला अनुभवायला येतात.  त्यामुळे स्थूल विषयांचे ज्ञान सहजपणे होते.  मात्र आत्मवस्तु ही अत्यंत सूक्ष्मतम असून ती डोळ्यांना, इंद्रियांना, मनाला किंवा बुध्दीलाही आकलन होत नाही.  ती अदृश्य, अव्यक्त, निर्विशेष स्वरूपाची आहे.  आत्मा कसा आहे ?  याचे शब्दांनीही वर्णन करता येत नाही.

 

अशी ही आत्मवस्तु प्रत्येक जीवाचे प्रत्यगात्मस्वरूप आहे.  जीव स्वतःच आत्मचैतन्यस्वरूप आहे.  म्हणजेच येथे ज्ञाता ही 'मी' आहे आणि ज्ञेय वस्तु सुद्धा 'मी' च आहे.  म्हणून - आत्मानं अधिकृत्य यद्  ज्ञानं तत् अध्यात्मं इति |  आत्मस्वरूपावर म्हणजे स्वस्वरूपावर केंद्रीभूत असणाऱ्या ज्ञानाला "अध्यात्मिक ज्ञान" असे म्हणतात.  म्हणून आत्मविद्या ही सूक्ष्मतम असणाऱ्या आत्मवस्तूची असल्यामुळे तिला 'राजगुह्य' असे म्हटले जाते.  हे रामा !  अशी ही गुह्य ब्रह्मविद्या जाणून सर्व राजे लोक दुःखरहित अवस्थेला प्राप्त झाले.  यावरून समजते की, पूर्वीचे राजे सुद्धा ब्रह्मज्ञानी असल्यामुळे त्यांना 'राजर्षि' असे म्हटले जात असे.  प्राचीन काळी विदेही राजा जनकासारखे ब्रह्मज्ञानी आणि ब्रह्मनिष्ठ राजे होऊन गेले.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ