Tuesday, February 21, 2023

आदर्श राज्ये आणि युद्धे | Ideal Kingdoms And Wars

 प्राचीन काळी युद्धाशिवाय राज्ये चालत असत.  राजेलोक परस्परांच्या सहकार्याने पृथ्वीचे रक्षण करीत असत.  एका राज्यात काही कमी पडले तर दुसरे राजे मदतीला येत असत.  शत्रु, युद्ध असा प्रश्नच नव्हता.  फक्त सोयीसाठी देशांच्या सीमा निश्चित केल्या होत्या.  आपापसामध्ये अत्यंत मैत्रीपूर्ण, प्रेमाचे व विश्वबंधुत्वाचे नाते होते.  राजा व प्रजा अत्यंत सुखाने नांदत होती.  अशी ही आदर्श राज्ये व त्यांचे आदर्श राजे पृथ्वीचे पालन करीत असत.

 

परंतु काळाच्या ओघात राजेलोक सुखासीन होऊन भोगासक्त झाले.  सत्तेचा लोभ वाढला.  त्यामुळे एकमेकांच्यामध्ये द्वेष, मत्सर, असूया, कपट, निर्माण होऊ लागले.  सत्ता ऐश्वर्य, प्रसिद्धि यासाठी स्पर्धा होऊ लागली.  त्यामुळेच देशदेशांच्यामध्येच युद्ध अपरिहार्य ठरले.  राज्य व प्रजेचे रक्षण करण्यासाठी राजांच्यासमोर युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.  म्हणूनच ही सगळी युद्धे प्रथम मनुष्याच्या मनात आणि नंतर राज्या-राज्यांच्यामध्ये, देश, विदेशांच्यामध्ये युद्धे, महायुद्धे होऊ लागली.  युद्ध ही एक मनामधील भयंकर प्रवृत्ति आहे.  यामुळे मन अस्वस्थ व अस्थिर होऊन शत्रूचा सूड उगविण्यासाठी मनुष्य कोणत्याही स्तराला जाऊ शकतो.  विश्वामधील सर्व महायुद्धाचे बीज हे मनुष्याच्या मनात आहे.

 

या युद्धांच्यामध्ये ज्या राजाचा पराभव होत असे, त्या राज्यातील प्रजा दुःखी होऊ लागली.  प्रजेवर अनेक कर लादले जाऊ लागले.  जीवनावश्यक गोष्टींच्यावर सुद्धा प्रजेला कर द्यावा लागत असे.  यामुळे प्रजा त्रस्त होऊन दैन्यावस्थेला प्राप्त झाली.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019- हरी ॐ