ज्ञानाने सर्व कर्मांचा नाश होत असेल तरी
सुद्धा शास्त्रामध्ये पापांचा क्षय करण्यासाठी अनेक प्रकारची कर्मे सांगितलेली
आहेत. राजसूय यज्ञ, तसेच अग्निहोत्रादि
अनेक यज्ञयागादि आणि शारीरिक, वाचिक व मानसिक तप याप्रकारची अनेक कर्मे आहेत. त्याचप्रमाणे निषिद्ध कर्मांचा प्रभाव कमी
करण्यासाठी प्रायश्चित्त कर्मे दिलेली आहेत. या सर्व कर्मांचा उद्देश पापकर्माचा क्षय होऊन ऐहिक
आणि पारलौकिक सुख आणि आनंद मिळावा, हाच आहे.
याउलट भगवान याठिकाणी सर्व विषयांचा, सर्व
कर्मांचा त्याग करून शमदमादि साधनांच्या साहाय्याने आत्मज्ञान प्राप्त करावे असे
सांगतात. आनंद आणि सुख प्राप्त करणे
हेच जीवनाचे ध्येय असेल तर, ते जर यज्ञयागादि सोप्या कर्मांच्या अनुष्ठानाने मिळत
असेल तर इंद्रियसंयमन, विषयांचा त्याग, कर्माचा त्याग, मनःसंयमन आणि सतत विचार
करून आत्मज्ञान प्राप्त करणे याप्रकारच्या अत्यंत कठीण आणि अवघड मार्गाने का जावे ?
हा मार्ग सामान्य मनुष्याला शक्य आहे का ?
यापेक्षा यज्ञयागादि कर्मांचा सरळ, सोपा
मार्ग अनुसरण करून पापक्षालन करावे आणि सुख मिळवावे हे अधिक युक्तिसंगत नाही का ?
यावर भगवान म्हणतात की, जरी यज्ञयागादि
कर्माने पापांचे क्षालन होते, तरी सर्व पापांचा निरास होत नाही. तसेच आपण गृहीत धरले की पापांचा क्षय होतो, तरी
सुद्धा पुण्यकर्म शिल्लक राहातेच. पुण्याचा
कधीही नाश होत नाही. पुण्यकर्म सुद्धा पापकर्माप्रमाणे
बंधनकारकच आहे. ते सुद्धा जन्माला
कारण आहे. थोडक्यात, जीव संपूर्ण कर्म
बंधनापासून मुक्त होऊ शकत नाही, कारण कर्म, कर्तुत्व-भोक्तृत्व भावनेचा आणि
अज्ञानाचा ध्वंस करू शकत नाही. अज्ञानाचा
नाश फक्त ज्ञानानेच होतो. म्हणून ज्ञान
हेच सर्व प्रकारच्या कर्मामध्ये अधिक श्रेष्ठ असून जीवाला संपूर्ण पावन करणारे
आहे. यासाठी प्रत्येक मुमुक्षूने
प्रयत्नपूर्वक ज्ञान संपादन करण्यासाठी प्रयत्न करावा.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–