ईश्वराचा अवतार हा केवळ आणि केवळ मनुष्यमात्रासाठीच
आहे.
नृणां निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतो
नृप I अव्ययस्याप्रमेयस्य निर्गुणस्य महात्मनः II
(श्रीमद् भागवत)
अव्यय, अप्रमेय, निर्गुण, निर्विशेष असणारा परमात्मा
केवळ मनुष्याच्या उद्धारासाठी उपाधि धारण करून सगुण-साकार होतो. पृथ्वीतलावर अनेक वेळेला अवतार घेतो. केवळ अवतार घेत नाही, तर ईश्वर मनुष्याच्या उद्धारासाठी
बरोबर तपादि साधने उत्पन्न करतो. म्हणून
आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये तप-धर्म-दान-सत्य-तीर्थयात्रा या सर्वांचे महत्त्व
असून ही सर्व साधने अर्थपूर्ण आहेत.
जीवनामध्ये तपश्चर्या म्हणजे शरीर, वाणी व मन
यांच्यावर मनुष्याने संयमन केले पाहिजे. यासाठीच
अनेक उपवास, उपासना, व्रतवैकल्ये, अनुष्ठाने सांगितली जातात. श्रावण महिना, चातुर्मास, अधिक मास, विशेष पर्वकाळ
यामध्ये व्रतस्थ राहिले जाते. पूर्वीच्या काळी
घराघरामधून पुराणे वाचली जात. परंतु आज विज्ञानयुगात
त्यांना व्यर्थ गोष्टी समजल्यामुळे त्या नाहीशा झाल्या आहेत.
परंतु या सर्वांचा निश्चित काहीतरी मथितार्थ
आहे. उपवास किंवा व्रतवैकल्ये ही देवासाठी
केली जात नसून त्यामागे तपश्चर्या आणि इंद्रियसंयमनाचा उद्देश आहे. शास्त्रामध्ये कृच्छ्रांद्रायणादि तपे सांगितली जातात.
नक्त म्हणजे एकभुक्त व्रत केले जाते. पुरश्चरणे केली जातात. मौनव्रत, अग्निहोत्र व्रत अशी कितीतरी तपे ईश्वराने
निर्माण केली. मनुष्याने या तपांचे आचरण
करावे आणि एक अतिशय सुंदर व संयमित जीवन जगावे. हाच त्यामागील उद्देश आहे. तपामध्ये प्रचंड मोठे
सामर्थ्य आहे.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–