Tuesday, August 30, 2022

अनायासाने ज्ञानप्राप्ति | Why Self-Realization is Easy ?

 



कोणत्याही व्यावहारिक प्राप्तीमध्ये खूप शारीरिक कष्ट घ्यावे लागतात.  सातत्याने प्रयत्न करावे लागतात.  परंतु ब्रह्मज्ञानामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचे शारीरिक प्रयत्न नाहीत.  यत्किंचित कष्टही नाहीत.  नव्हे, शारीरिक कर्मही नाही.  थोडक्यात कोणतेही शारीरिक प्रयत्न न करता हे ज्ञान प्राप्त होते.  याचे कारण ज्ञान हे अंतःकरणामध्ये होते आणि अंतःकरण हेच ज्ञानाचे साधन आहे.  ज्याप्रमाणे एखादा मनुष्य रत्नपारख्याकडून शिक्षित झाला तर त्याला सहजपणे रत्नाची पारख होते.  त्याला गुह्य रहस्य समजते.

 

त्याचप्रमाणे जर एखादा मुमुक्षु साधक विवेकवैराग्यादि गुणांनी संपन्न, शुद्धात्मा असेल आणि ईश्वराच्या कृपेने सद्गुरुप्राप्ति झालेली असेल तर त्याला अनायासाने ब्रह्मविद्या प्राप्त होते.

आचार्यवान् पुरुषो वेद |                                    (छान्दो. उप. ६-१४-२)

अनन्यप्रोक्ते गतिरत्र नास्ति |                               (कठ. उप. १-२-८)

यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ |

तस्यैते कथिता ह्यार्थाः प्रकाशन्ते महात्मनः ||                  (श्वेत. उप. ६-२३)

 

जो अत्यंत श्रद्धावान असून अनन्यभावाने सद्गुरूंना शरण गेलेला असेल तर गुरूंनी केलेला उपदेश त्याच्या अंतःकरणामध्ये ठसतो, स्थिर होतो आणि त्याला तेथेच निरतिशय आनंदाची अनुभूति येते.  त्याचे मन अत्यंत शुद्ध आणि ज्ञानग्रहण करण्यासाठी योग्य व अनुकूल असते.  त्याला सहजपणे ज्ञाननिष्ठा प्राप्त होते.  परंतु जर एखाद्याचे अंतःकरण अनेक प्रकारच्या विषयवासनांनी बरबटलेले असेल, रागद्वेष, कामक्रोधादि विकारांनी अशुद्ध झालेले असेल, तर हजारो वेळेला श्रवण करूनही त्याला ज्ञानप्राप्ति होणार नाही.  हा दोष गुरूंचा नाही, किंवा शास्त्राचा नाही तर त्याचे अंतःकरण दोषी आहे.

 

म्हणून ज्ञान होण्यासाठी वेळ लागत नाही किंवा कोणतेही प्रत्यक्ष प्रयत्न नाहीत.  प्रयत्न किंवा कष्ट असतील तर ते फक्त अंतःकरणामधील दोष निवारण करण्यासाठी, मन शुद्ध करून दैवी गुण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न आहेत.  जर मन शुद्ध आणि दैवीगुणसंपन्न असेल तर अनायासाने, सहज ज्ञान प्राप्त होते.


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ