Tuesday, August 9, 2022

बालकाप्रमाणे मनाचे संगोपन | Nurturing Mind Like A Child

 आपल्या अंतःकरणामध्ये चांगल्या व वाईट अशा दोन्हीही प्रकारच्या वासना असतात.  मनावर पूर्णतः नियंत्रण करून युक्तीने कधी शीघ्र तर कधी हळुहळू मनाला अनेक गोष्टी समजावून द्याव्यात.  मनाला ईश्वरचिंतनाची सवय लावावी.  मन एखाद्या जनावराप्रमाणे जर पुन्हा-पुन्हा विषयांच्यामध्ये गेले तर तेथून हळुवारप्रमाणे बाहेर काढून त्या मनाला श्रवणादि साधनेमध्ये प्रवृत्त करावे.

 

आपण सतत दुसऱ्या व्यक्तीला व दुसऱ्याच्या मनाला प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो.  परंतु आयुष्यभर ट्रेनिंग देऊनही एकही व्यक्ति पूर्णपणे आपल्या मनासारखी घडू शकत नाही.  म्हणून दुसऱ्याला घडविण्यापेक्षा आपण आपल्याच मनाला घडवावे. आपल्या मनाला इतके सुंदर प्रशिक्षण द्यावे की, आपण मनाला आज्ञा द्यावी आणि आपल्या मनाने ती तंतोतंत पाळावी.  असे जर झाले तर निश्चितच साधकाचे मन परमोच्च अवस्थेला पोहोचू शकेल.  मात्र यासाठी अविरत प्रयत्न आवश्यक आहेत.

 

याचे कारण आपले मन हे अत्यंत चंचल, दृढ, हट्टी व बलवान आहे.  वाऱ्याला जसे पकडता येत नाही तसेच मनावर निग्रह करणे अत्यंत दुष्कर आहे.  मनोनिग्रह अवघड असेल तरी अशक्य नाही.  अभ्यास आणि वैराग्याच्या साहायाने मनोनिग्रह करता येतो.  वसिष्ठ मुनि येथे सांगतात, रामा !  या नाठाळ चित्तरूपी बालकाला हळुहळू प्रयत्नाने अनेक प्रकारे नियमित करावे आणि त्याला वाईट गोष्टींच्यापासून निवृत्त करून चांगल्या गोष्टीमध्ये प्रवृत्त करावे.

 

व्यवहारामध्ये आपण पाहतो की, आपणास लहान बाळाचे पालन-पोषण अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते.  त्याच्याबरोबर कसे वागावे, त्याला कसे खेळवावे, कसे भरवावे, तसेच त्याला एखादी गोष्ट कशी समजावून द्यावी, त्या लहान बालकाला चांगल्या गोष्टीमध्ये प्रवृत्त करून वाईट व हानिकारक गोष्टींच्यापासून कसे दूर करावे, या सर्व गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.  तसेच बाळ रडले तर काय करावे, बाळाने हट्ट केला, बाळ झोपत नसेल तर काय करावे, हे सर्व ज्याला माहीत आहे, तोच त्या लहान मुलांच्याबरोबर आनंद घेऊ शकतो.  त्याचप्रमाणे वसिष्ठ मुनि येथे सांगतात की, साधकाने असे मानावे की, आपले मन हेच जणु काही बालक आहे.  आपण आपल्या मनाशी अत्यंत सावधपणे व काळजीपूर्वक वागून आपल्या चित्तरूपी बालकाला व्यवस्थितपणे सांभाळावे.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ