Tuesday, August 23, 2022

शुभवासनांचे सामर्थ्य | Power of Pure Desires

 



श्री वसिष्ठ मुनि श्रीरामांचे निमित्त करून सर्व साधकांना एक सुंदर विचार सांगतात.  काही वेळेस साधकांना वाटते की, आता साधना करण्यासाठी आपल्याला आयुष्यात खूप उशीर झाला आहे, आता येथून पुढे साधना करून काय मिळणार ?  अध्यात्ममार्गामध्ये प्रवेश करायला उशीर होतो.  त्यामुळे वय झाल्यावर - "आता करून तरी काय उपयोग ?  आता काहीच साधना करू नये. पुढच्या जन्मी पाहू !"  असे मनुष्याला वाटते.  परंतु हा विचार अयोग्य आहे.

 

मुनि येथे सांगतात की, रामा !  आत्ता, या क्षणी जरी तू ठरविलेस तरी तू प्रयत्नाने शुभवासना दृढ करू शकतोस.  शुभवासना दृढ करण्यासाठी तू साधनेचा पुरुषार्थ कर.  श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवा, अर्चना, वंदन, दास्यत्व, सख्य, आत्मसमर्पण, त्याग, मनन, चिंतन, निदिध्यास अशा अनेक प्रकारच्या साधना तू जर सातत्याने केल्यास, तर निश्चितच शुभवासना दृढ होऊन अशुभवासना म्हणजेच वाईट भोगवासना निष्प्रभ होतील.

 

मनुष्य कितीही पापी असेल, यामागे आणि पूर्वीच्या अनेक जन्मांच्यामध्ये अनेक पापकर्मे घडली असतील तरीही शुभ वासनांच्या प्रभावाने सर्व पापे क्षणार्धात नाश होऊ शकतात.  शुभवासनेमध्ये खूप मोठे सामर्थ्य आहे.  मृत्यूच्या पूर्वीच जर या शुभवासना घनीभूत झाल्या तर तो जीव एका क्षणामध्ये सुद्धा मुक्त होऊ शकतो.  पुराणांच्यामध्ये खटवांग राजा, अजामिळ यांची आख्याने यासाठी प्रसिद्ध आहेत.

 

एक क्षणभर सुद्धा अतिशय तीव्रतेने साधना केली तर त्याचे फळ म्हणजेच चित्तशुद्धि व चित्ताची एकाग्रता प्राप्त होते.  सामान्य मनुष्य अनेक साधना करतो. परंतु त्यामध्ये धरसोड वृत्ति दिसून येते.  थोडा वेळ श्रवण केले की, आपल्याला वाटते, आता जप करावा.  दहा मिनिटे जप केला की, भजन करावे.  याप्रमाणे आपण एकही साधना दीर्घकाळ सातत्याने करीत नाही.  त्यामुळे त्यामध्ये निष्ठा प्राप्त होत नाही.  म्हणजेच अशा प्रकारे वर्षानुवर्षे साधना केल्या तरी मनामध्ये उत्कट भाव निर्माण होत नाही आणि भाव नसेल तर साधना निष्फळ आहे.  म्हणून सर्व साधकांनी पुरुषार्थाने सातत्याने व श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने साधना करून उत्कट भाव निर्माण केला तर निश्चितच साधकाला तत्काळ सुखाची अनुभूति येते.  केलेली साधना कधीही व्यर्थ जात नाही.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ