Tuesday, August 30, 2022

अनायासाने ज्ञानप्राप्ति | Why Self-Realization is Easy ?

 



कोणत्याही व्यावहारिक प्राप्तीमध्ये खूप शारीरिक कष्ट घ्यावे लागतात.  सातत्याने प्रयत्न करावे लागतात.  परंतु ब्रह्मज्ञानामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचे शारीरिक प्रयत्न नाहीत.  यत्किंचित कष्टही नाहीत.  नव्हे, शारीरिक कर्मही नाही.  थोडक्यात कोणतेही शारीरिक प्रयत्न न करता हे ज्ञान प्राप्त होते.  याचे कारण ज्ञान हे अंतःकरणामध्ये होते आणि अंतःकरण हेच ज्ञानाचे साधन आहे.  ज्याप्रमाणे एखादा मनुष्य रत्नपारख्याकडून शिक्षित झाला तर त्याला सहजपणे रत्नाची पारख होते.  त्याला गुह्य रहस्य समजते.

 

त्याचप्रमाणे जर एखादा मुमुक्षु साधक विवेकवैराग्यादि गुणांनी संपन्न, शुद्धात्मा असेल आणि ईश्वराच्या कृपेने सद्गुरुप्राप्ति झालेली असेल तर त्याला अनायासाने ब्रह्मविद्या प्राप्त होते.

आचार्यवान् पुरुषो वेद |                                    (छान्दो. उप. ६-१४-२)

अनन्यप्रोक्ते गतिरत्र नास्ति |                               (कठ. उप. १-२-८)

यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ |

तस्यैते कथिता ह्यार्थाः प्रकाशन्ते महात्मनः ||                  (श्वेत. उप. ६-२३)

 

जो अत्यंत श्रद्धावान असून अनन्यभावाने सद्गुरूंना शरण गेलेला असेल तर गुरूंनी केलेला उपदेश त्याच्या अंतःकरणामध्ये ठसतो, स्थिर होतो आणि त्याला तेथेच निरतिशय आनंदाची अनुभूति येते.  त्याचे मन अत्यंत शुद्ध आणि ज्ञानग्रहण करण्यासाठी योग्य व अनुकूल असते.  त्याला सहजपणे ज्ञाननिष्ठा प्राप्त होते.  परंतु जर एखाद्याचे अंतःकरण अनेक प्रकारच्या विषयवासनांनी बरबटलेले असेल, रागद्वेष, कामक्रोधादि विकारांनी अशुद्ध झालेले असेल, तर हजारो वेळेला श्रवण करूनही त्याला ज्ञानप्राप्ति होणार नाही.  हा दोष गुरूंचा नाही, किंवा शास्त्राचा नाही तर त्याचे अंतःकरण दोषी आहे.

 

म्हणून ज्ञान होण्यासाठी वेळ लागत नाही किंवा कोणतेही प्रत्यक्ष प्रयत्न नाहीत.  प्रयत्न किंवा कष्ट असतील तर ते फक्त अंतःकरणामधील दोष निवारण करण्यासाठी, मन शुद्ध करून दैवी गुण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न आहेत.  जर मन शुद्ध आणि दैवीगुणसंपन्न असेल तर अनायासाने, सहज ज्ञान प्राप्त होते.


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, August 23, 2022

शुभवासनांचे सामर्थ्य | Power of Pure Desires

 



श्री वसिष्ठ मुनि श्रीरामांचे निमित्त करून सर्व साधकांना एक सुंदर विचार सांगतात.  काही वेळेस साधकांना वाटते की, आता साधना करण्यासाठी आपल्याला आयुष्यात खूप उशीर झाला आहे, आता येथून पुढे साधना करून काय मिळणार ?  अध्यात्ममार्गामध्ये प्रवेश करायला उशीर होतो.  त्यामुळे वय झाल्यावर - "आता करून तरी काय उपयोग ?  आता काहीच साधना करू नये. पुढच्या जन्मी पाहू !"  असे मनुष्याला वाटते.  परंतु हा विचार अयोग्य आहे.

 

मुनि येथे सांगतात की, रामा !  आत्ता, या क्षणी जरी तू ठरविलेस तरी तू प्रयत्नाने शुभवासना दृढ करू शकतोस.  शुभवासना दृढ करण्यासाठी तू साधनेचा पुरुषार्थ कर.  श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवा, अर्चना, वंदन, दास्यत्व, सख्य, आत्मसमर्पण, त्याग, मनन, चिंतन, निदिध्यास अशा अनेक प्रकारच्या साधना तू जर सातत्याने केल्यास, तर निश्चितच शुभवासना दृढ होऊन अशुभवासना म्हणजेच वाईट भोगवासना निष्प्रभ होतील.

 

मनुष्य कितीही पापी असेल, यामागे आणि पूर्वीच्या अनेक जन्मांच्यामध्ये अनेक पापकर्मे घडली असतील तरीही शुभ वासनांच्या प्रभावाने सर्व पापे क्षणार्धात नाश होऊ शकतात.  शुभवासनेमध्ये खूप मोठे सामर्थ्य आहे.  मृत्यूच्या पूर्वीच जर या शुभवासना घनीभूत झाल्या तर तो जीव एका क्षणामध्ये सुद्धा मुक्त होऊ शकतो.  पुराणांच्यामध्ये खटवांग राजा, अजामिळ यांची आख्याने यासाठी प्रसिद्ध आहेत.

 

एक क्षणभर सुद्धा अतिशय तीव्रतेने साधना केली तर त्याचे फळ म्हणजेच चित्तशुद्धि व चित्ताची एकाग्रता प्राप्त होते.  सामान्य मनुष्य अनेक साधना करतो. परंतु त्यामध्ये धरसोड वृत्ति दिसून येते.  थोडा वेळ श्रवण केले की, आपल्याला वाटते, आता जप करावा.  दहा मिनिटे जप केला की, भजन करावे.  याप्रमाणे आपण एकही साधना दीर्घकाळ सातत्याने करीत नाही.  त्यामुळे त्यामध्ये निष्ठा प्राप्त होत नाही.  म्हणजेच अशा प्रकारे वर्षानुवर्षे साधना केल्या तरी मनामध्ये उत्कट भाव निर्माण होत नाही आणि भाव नसेल तर साधना निष्फळ आहे.  म्हणून सर्व साधकांनी पुरुषार्थाने सातत्याने व श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने साधना करून उत्कट भाव निर्माण केला तर निश्चितच साधकाला तत्काळ सुखाची अनुभूति येते.  केलेली साधना कधीही व्यर्थ जात नाही.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, August 16, 2022

साक्षीभाव आणि मन | The Witness And The Mind

 



अनात्म्यावर आत्म्याचा अध्यास होतो आणि दुसरा अध्यास म्हणजेच आत्म्यावर अनात्म्याचा अध्यास होय.  शरीरापासून अज्ञानापर्यंत सर्व अनात्म उपाधीचे गुणधर्म मी आत्म्यावर म्हणजेच ‘मी’वर आरोपित करतो.  म्हणून त्यांच्या गुणधर्मांनी ‘मी’च लिप्त, स्पर्शित, विकारी होतो.  या सर्व सुख-दुःखांच्यामधून, जंजाळामधून मुक्त व्हावयाचे असेल तर एकच साधन आहे आणि ते म्हणजे आपल्या मनाकडेच साक्षीभावाने पहिले पाहिजे.  साक्षीभावाचा अभ्यास केला पाहिजे.

 

भगवान रमणमहर्षींनी जीवनभर केवळ साक्षीभावाचा अभ्यास करून परमोच्चअवस्था प्राप्त केली.  आज मी मनाशी तादात्म्य पावल्यामुळेच मन म्हणेल तसे मला नाचावे लागते.  मनाचे सर्व विकार माझ्यावर आरोपित होतात.  माझेच मन मला या घोर संसारामध्ये अधिकाधिक बद्ध करीत असते.  म्हणून विश्व, विषय, माणसे समस्या नाहीत, तर माझेच मन मला problem आहे.  म्हणूनच ज्याक्षणी आपण मनाकडे साक्षी भावाने पाहू, त्याचक्षणी मन एका क्षणात शांत होते.  भगवान रमणमहर्षि म्हणतात –

            मानसं तू किं मार्गणे कृते |

            नैव मानसं मार्ग आर्जवत् ||              (उपदेशसारम्)

 

जे मन आपल्याला या संसाराचा अनुभव देते, ते मनच काय आहे ?  याचा विचार केला तर ते मनच लय पावते.  मनामधील विकार संपतात.  खरोखरच ज्याला मी ‘मन-मन’ असे म्हणतो, जे मला खूप भरकटायला लावते, त्याच मनावर प्रथम संयमन केले पाहिजे.  अन्य अनेक साधना वर्षानुवर्षे केल्या तरीही जोपर्यंत मनोनिग्रह होत नाही, तोपर्यंत संसाराचा, दुःखांचा निरास होणे अत्यंत कठीण आहे.  त्यासाठी मनामध्येच enquiry केली पाहिजे.  जितके आपण आपल्या मनाला महत्व देऊ, मनाबरोबर वाहत जाऊ, तितके ते मन मनुष्याचा नाश करते.

 

परंतु एखादाच धीर पुरुष विवेकाच्या मार्गाने मनावर निग्रह प्राप्त करतो, मनाकडे साक्षीभावाने पाहतो.  तो मनाचा गुलाम होत नाही.  त्यामुळे आपोआपच माझे मनाशी झालेले तादात्म्य कमी कमी होते.

 

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ




Tuesday, August 9, 2022

बालकाप्रमाणे मनाचे संगोपन | Nurturing Mind Like A Child

 



आपल्या अंतःकरणामध्ये चांगल्या व वाईट अशा दोन्हीही प्रकारच्या वासना असतात.  मनावर पूर्णतः नियंत्रण करून युक्तीने कधी शीघ्र तर कधी हळुहळू मनाला अनेक गोष्टी समजावून द्याव्यात.  मनाला ईश्वरचिंतनाची सवय लावावी.  मन एखाद्या जनावराप्रमाणे जर पुन्हा-पुन्हा विषयांच्यामध्ये गेले तर तेथून हळुवारप्रमाणे बाहेर काढून त्या मनाला श्रवणादि साधनेमध्ये प्रवृत्त करावे.

 

आपण सतत दुसऱ्या व्यक्तीला व दुसऱ्याच्या मनाला प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो.  परंतु आयुष्यभर ट्रेनिंग देऊनही एकही व्यक्ति पूर्णपणे आपल्या मनासारखी घडू शकत नाही.  म्हणून दुसऱ्याला घडविण्यापेक्षा आपण आपल्याच मनाला घडवावे. आपल्या मनाला इतके सुंदर प्रशिक्षण द्यावे की, आपण मनाला आज्ञा द्यावी आणि आपल्या मनाने ती तंतोतंत पाळावी.  असे जर झाले तर निश्चितच साधकाचे मन परमोच्च अवस्थेला पोहोचू शकेल.  मात्र यासाठी अविरत प्रयत्न आवश्यक आहेत.

 

याचे कारण आपले मन हे अत्यंत चंचल, दृढ, हट्टी व बलवान आहे.  वाऱ्याला जसे पकडता येत नाही तसेच मनावर निग्रह करणे अत्यंत दुष्कर आहे.  मनोनिग्रह अवघड असेल तरी अशक्य नाही.  अभ्यास आणि वैराग्याच्या साहायाने मनोनिग्रह करता येतो.  वसिष्ठ मुनि येथे सांगतात, रामा !  या नाठाळ चित्तरूपी बालकाला हळुहळू प्रयत्नाने अनेक प्रकारे नियमित करावे आणि त्याला वाईट गोष्टींच्यापासून निवृत्त करून चांगल्या गोष्टीमध्ये प्रवृत्त करावे.

 

व्यवहारामध्ये आपण पाहतो की, आपणास लहान बाळाचे पालन-पोषण अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते.  त्याच्याबरोबर कसे वागावे, त्याला कसे खेळवावे, कसे भरवावे, तसेच त्याला एखादी गोष्ट कशी समजावून द्यावी, त्या लहान बालकाला चांगल्या गोष्टीमध्ये प्रवृत्त करून वाईट व हानिकारक गोष्टींच्यापासून कसे दूर करावे, या सर्व गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.  तसेच बाळ रडले तर काय करावे, बाळाने हट्ट केला, बाळ झोपत नसेल तर काय करावे, हे सर्व ज्याला माहीत आहे, तोच त्या लहान मुलांच्याबरोबर आनंद घेऊ शकतो.  त्याचप्रमाणे वसिष्ठ मुनि येथे सांगतात की, साधकाने असे मानावे की, आपले मन हेच जणु काही बालक आहे.  आपण आपल्या मनाशी अत्यंत सावधपणे व काळजीपूर्वक वागून आपल्या चित्तरूपी बालकाला व्यवस्थितपणे सांभाळावे.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019




- हरी ॐ


Tuesday, August 2, 2022

ब्रह्मविद्या – तत्काळ फळप्राप्ति | Self-Realization – Instant Effect

 



ज्याचा अनुभव येतो ते फल असते.  कोणत्याही फलाचा अनुभव प्रत्यक्ष असतो.  जेवण केल्यानंतर पोट भरले आहे की नाही हे आपण दुसऱ्याला विचारीत नाही.  तर पोट भरल्याचा प्रत्यक्ष अनुभव असतो.  तसेच जेवल्यानंतर ताबडतोब पोट भरते.  आज जेवले आणि उद्या पोट भरले असे होत नाही.  धर्माचे फल पाहिले तर ते कधीही प्रत्यक्ष मिळत नाही.  आज पुण्यकर्म केले तर कालांतराने त्याचे फळ मिळते.  कदाचित या जन्मामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्येही फळ मिळेल.  म्हणजेच धर्माचे फळ हे नेहमी परोक्ष आहे.

 

परंतु ज्ञानाचे फळ मात्र भविष्यकाळात मिळणारे नसून ज्याक्षणी ज्ञानोदय होईल त्याच क्षणी अज्ञानरूपी अंधाराचा नाश होऊन आत्मानुभूति येते.  आत्मन्येवात्मना तुष्टः |  अत्यंत दुखःनिवृत्ति आणि निरतिशय आनंदाची अनुभूति हेच ज्ञानाचे फल आहे.  आनंद भविष्यकाळामध्ये अनुभवता येत नाही.  उद्या आनंद मिळेल ही भ्रामक कल्पना आहे.  आनंद आजच-वर्तमानकाळामध्ये-आत्ताच अनुभवला येतो.  याच अनुभवाने साधक तृप्त होतो.

 

नारदमहर्षि म्हणतात –

यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति |      (नारदभक्तिसूत्र)

म्हणून ज्ञानाचे फळ प्रत्यक्ष, साक्षात अनुभवजन्य आहे, असे म्हटले आहे.

 

भगवान पुढे म्हणतात की, असे प्रत्यक्ष अनुभवाला येणारे ज्ञान धर्म अविरुद्ध आहे.  हे ब्रह्मज्ञान सर्व मुमुक्षूंना धर्माप्रमाणे अनुसरण करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे.  ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमांच्यासाठी त्याप्रमाणे अनुकूल धर्म आहे.  त्या धर्माच्या अनुष्ठानाने मनुष्याचे रक्षण होते.  म्हणजेच धर्म हा मनुष्याला ऊर्ध्वगतीला नेणारा आहे.  त्याचप्रमाणे हे ब्रह्मज्ञान धर्मविरुद्ध नाही, तर धर्मानुकूल आहे.  त्यामुळे संसारापासून मुमुक्षूंचे रक्षण होईल.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ