Tuesday, July 26, 2022

स्वरक्षणासाठी शुभ वासना | Pure Desires For Self Defence

 



वसिष्ठ मुनि वासनांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी फार सुंदर उपाय सांगतात.  मनुष्याला अधःपतनापासून स्वतःचे रक्षण करावयाचे असेल तर त्याने शुभ, पवित्र भाव, शुद्ध वासना वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  मनुष्याच्या मनामध्ये जसे विचार असतात तसेच, त्याचे आचार व उच्चार होतात.  त्यामुळे मागील जन्मांच्यामध्ये जरी आपल्यावर अनेक वाईट संस्कार झाले असतील, मनामध्ये वाईट वासनांचा प्रभाव असेल तरी या जन्मामध्ये वर्तमान क्षणापासून आपण चांगले विचार करून तदनुसार सदाचाराचे पालन करू शकतो.  हे कोणालाही नाकारता येणार नाही.

 

समजा, आपल्याला आपले वाईट संस्कार, वासना किंवा वाईट सवयी लगेच काढता येत नाहीत.  हे सत्य असेल तर मग अशावेळी मनुष्याने त्यासाठी प्रयत्न न करता त्याऐवजी आपल्या मनामध्ये चांगले संस्कार वर्धन करण्याचा पुरुषार्थ करावा. जसे प्रसिद्ध उदाहरण दिले जाते की, एक रेषा काढली आहे.  त्या रेषेला स्पर्श न करता ती रेषा लहान करायची असेल तर आपण त्याच्या शेजारी त्यापेक्षा दुसरी मोठी रेषा ओढतो.  त्यामुळे पहिली रेषा हात न लावता आपोआपच लहान होते.

 

त्याचप्रमाणे आपण आपले आचार-विचार-उच्चार चांगले केले, सुसंस्कार वर्धन केले, शुद्ध भाव वाढविला तर आपोआपच अशुभ वासनांचा प्रभाव कमी होतो.  त्यासाठीच शास्त्रामध्ये सर्व ठिकाणी आचारधर्मांना विशेष महत्त्व दिले आहे.  संतांनी सुद्धा साधकाला सदाचाराचाच आदेश दिला आहे.  

आचार परमो धर्म: ।                                            (महाभारत )

सदाचार हा थोर सांडू नये तो ।  जनी तोचि तो मानवी धन्य होतो ।।    (मनोबोध )

याप्रमाणे श्रेष्ठ आचारधर्मांचे पालन केल्यामुळे त्या सत्कर्मांच्या प्रभावाने मन शुद्ध व सत्त्वगुणप्रधान होऊन वाईट वासनांचा प्रभाव कमी होतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Monday, July 18, 2022

विश्वनिर्मिती – माया प्रतिबिंबरूपेण | Creation – Source-Reflection Illusion

 



येथे आचार्य शब्द वापरतात – मायाप्रतिबिंबरूपेण |  बिंब-प्रतिबिंबवत् इति |  विश्वनिर्मिती ही बिंब आणि प्रतिबिंब याप्रमाणे होते.  बिंबस्थानीय सूर्याचे पाण्यामध्ये प्रतिबिंब पडते.  या दृष्टांताचा अभ्यास केला, मीमांसा केली की समजते की, बिंबस्थानीय सूर्य हा एक आहे.  सूर्य स्वतःच्या स्वरूपाने स्वयंप्रकाशस्वरूप असून तो संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करतो.  दुसरा भाग – जोपर्यंत त्याला उपाधि मिळत नाही, तोपर्यंत त्याचे प्रतिबिंब पडत नाही आणि अनेक बादल्या ठेवल्या, भांडी ठेवली की, त्याचे प्रतिबिंब पडते.  बादली, भांडे, नदी, समुद्र, तळे, डबके, या सर्व उपाधींच्यामध्ये प्रतिबिंब पडते.

 

बादली ही एक बाहेरची स्थूल उपाधि आहे.  परंतु केवळ रिकाम्या बादलीमध्ये प्रतिबिंब पडत नाही, तर त्या बादलीमध्ये पाणी पाहिजे.  ज्यावेळी भांडयामध्ये पाणी घातले जाते, तेव्हा ते पाणी त्या त्या उपाधीचा आकार घेते.  नंतरच त्या पाण्यामध्ये बिंबस्थानीय सूर्याचे प्रतिबिंब पडते.  याठिकाणी उपाधि ही कोणाला आहे ?  बिंबाला उपाधि नाही, तर प्रतिबिंबाला उपाधि प्राप्त होऊ शकते.  उपाधि मिळाल्यानंतरच बिंबाचे प्रतिबिंब पडते.

 

नंतर ते प्रतिबिंब त्या उपाधीने मर्यादित, परिच्छिन्न होते.  बादलीचे आकार बदलतात, त्याप्रमाणे प्रतिबिंबांचे आकार सुद्धा बदलतात, म्हणजेच आकारमान, measurements बदलतात.  बादलीमधील पाणी जसजसे विकारयुक्त होईल, तसतसे प्रतिबिंब सुद्धा विकारी, अस्थिर होते.  बादलीमधील पाण्याचा रंग बदलला की, प्रतिबिंबांचा सुद्धा रंग बदलतो.  बादली उचलली आणि एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत हलविली की, प्रतिबिंब सुद्धा आपोआप त्या बादलीबरोबर जणु काही जाते.  म्हणजेच जसजशी उपाधि बदलते, तसतसे प्रतिबिंब सुद्धा बदलते, कारण प्रतिबिंब हे त्या उपाधीशी तादात्म्य पावलेले आहे.

 

म्हणून जोपर्यंत उपाधि आहे, तोपर्यंत प्रतिबिंब असते आणि बादलीमधील पाणी ओतून दिले, की आपण म्हणतो – “प्रतिबिंब गेले”.  वस्तुतः प्रतिबिंब कोठे गेले ?  याचा सूक्ष्म विचार केला, तर समजते की, प्रतिबिंब कोठे आले ही नाही आणि गेलेही नाही.  ‘आले’ हाही औपचारिक शब्द आहे आणि ‘गेले’ हाही औपचारिक शब्द आहे.  उपाधीच्या दृष्टीने प्रतिबिंब आले आणि उपाधीच्या दृष्टीने प्रतिबिंब गेले.


 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ




Monday, July 11, 2022

सद्बुद्धि आणि सत् शास्त्र | Pure Intelligence And Pure Science

 



शुद्ध झालेल्या बुद्धीने सत्शास्त्राचे ज्ञान होऊन शास्त्राचे रहस्य, सार समजते आणि त्याचबरोबर सत्शास्त्राच्या सेवनाने, श्रवणानेच बुद्धि शुद्ध होते.  सत्शास्त्र व सद्बुद्धि यांचा असा परस्परसंबंध आहे.  सरोवरामध्ये किंवा एखाद्या जलाशयामध्ये ज्याप्रमाणे कमलपुष्प विकसित होते, त्याचप्रमाणे काळाच्या ओघात सत्शास्त्राने सद्बुद्धीचा विकास होतो.

 

वसिष्ठ मुनि येथे सत्शास्त्र व सद्बुद्धि यांचा अन्योन्य संबंध सांगतात.  जसजसे मनुष्य सात्त्विक असणाऱ्या वेदांतशास्त्राचे गुरुमुखामधून श्रवण करेल, तसतसे त्याच्या मनामध्ये बदल होत जातो.  मन रागद्वेषरहित, विकाररहित, शुद्ध होते.  अशा मनामध्येच अमानित्वादि दैवी गुणांचा उदय होतो. सेवा, त्याग, समर्पण, भक्ति, शम, दम, उपरति, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, विवेक, वैराग्य, मुमुक्षुत्व असे दैवी गुण वर्धन पावतात.  मन शांत होते.

 

मग हे कसे ओळखावे ?  तर मन शांत व शुद्ध झाल्यानंतर मनावर प्रसंगांचा परिणाम होत नाही.  मनामध्ये कामादि विकार उत्पन्न होत नाहीत.  मनामध्ये विषयांचे, उपभोगांचे, प्रसंगांचे, व्यक्तींचे विचार उत्पन्न न होता ईश्वरचिंतन, शास्त्रचिंतन होऊ लागते.  ईश्वराच्या सगुण-साकार सुंदर रूपामध्ये मन तल्लीन होते.  असे मन शास्त्राचा एकेक शब्द गुरुमुखामधून चातकाप्रमाणे श्रवण करते.  त्यावेळी मनामध्ये शास्त्रज्ञान प्राप्त होऊन शास्त्राचे संस्कार दृढ होतात आणि त्या ज्ञानाची अनुभूति येते.

 

याप्रमाणे स्वच्छ सरोवरामध्ये सुंदर कमळ उगवावे, त्याप्रमाणेच सत्शास्त्राच्या श्रवणामधून सद्बुद्धि उदयाला येते आणि सद्बुद्धीमध्येच शास्त्रज्ञान उदयाला येते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ





Tuesday, July 5, 2022

पाप-पुण्य आणि ब्रह्मविद्या | Self-Realization – Beyond Good-Bad

 



अत्यंत श्रेष्ठ आणि गुह्य ब्रह्मविद्या अत्यंत पावन करणारी आहे.  पुनाति इति पवित्रम् |  जे सर्वांना शुद्ध करते ते पवित्र होय.  या विश्वामध्ये सूर्य, अग्नि, वायु वगैरे देवता, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद, तसेच गंगा, गोदावरी वगैरे पवित्र नद्या आणि अनेक प्रायश्चित्त कर्मांचे अनुष्ठान याप्रकारची वेदांच्यामध्ये प्रतिपादित केलेली अनेक साधने पापक्षालानासाठी सांगितलेली आहेत.  परंतु ही सर्व तात्कालिक असून मर्यादित आहेत.  ही साधने पापांचा काही प्रमाणामध्ये नाश करतात.  परंतु जीवाने केलेल्या सर्व पापांचा क्षय होत नाही.  इतकेच नव्हे तर पुण्यसंचयाचा नाश होऊ शकत नाही.  परंतु ब्रह्मज्ञान मात्र अज्ञानासहित संपूर्ण पापपुण्यांचा नाश करते.

 

मनुष्याला पापकर्म तर बंधनकारक आहेच.  परंतु पुण्यकर्म सुद्धा बंधनकारक आहे.  बेडी लोखंडाची असली काय ?  किंवा सोन्याची असली काय ?  ती बद्ध करतेच.  त्याचप्रमाणे पाप आणि पुण्य आहे.  म्हणून प्रत्येकाने पापपुण्याच्याही पलीकडे जाऊन कर्मबंधनामधून मुक्त झाले पाहिजे. त्यासाठी देवता उपासना, वेदांचे पठण, गंगादि नद्यांचे स्नान किंवा प्रायश्चित्त कर्मांचे अनुष्ठान ही सर्व साधने तात्कालिक आहेत.  सर्वच कर्मांचा ती नाश करू शकत नाही.  याचे कारण ही साधने कर्तृत्व-भोक्तृत्व भावना आणि त्याचेही कारण अज्ञान यांचा नाश करू शकत नाही.

 

परंतु ब्रह्मविद्या मात्र अनंतकोटी जन्मामध्ये संग्रहित केलेली जीवाची सर्व कर्मे एका क्षणात नाश करते.  सूर्याच्या उदयाने घनदाट अंधार एका क्षणात नाश होतो.  किंवा कापसाचा प्रचंड डोंगर एक ठिणगी भस्मसात करू शकते.  त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या उदयाने अनादि अज्ञानरूपी अंधार नष्ट होतो आणि जीव कर्मांच्यामधून मुक्त होतो.

 

ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुतेऽर्जुन |             (गीता अ. ४-३७)

येथे म्हटल्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नि अज्ञानासहित सर्व कर्मांचा नाश करतो.  म्हणजेच त्याला नैश्कार्म्यावस्था प्राप्त होते.  याचे कारण ब्रह्मज्ञान सर्व कर्तृकारक प्रत्ययांचा निरास करून अध्यासाची निवृत्ति करते आणि जीवाला परम पावन करणारी अद्वैताची दृष्टि प्राप्त होते.


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ