वसिष्ठ मुनि वासनांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी
फार सुंदर उपाय सांगतात. मनुष्याला अधःपतनापासून
स्वतःचे रक्षण करावयाचे असेल तर त्याने शुभ, पवित्र भाव, शुद्ध वासना वाढविण्याचा प्रयत्न
केला पाहिजे. मनुष्याच्या मनामध्ये जसे
विचार असतात तसेच, त्याचे आचार व उच्चार होतात. त्यामुळे मागील जन्मांच्यामध्ये जरी आपल्यावर
अनेक वाईट संस्कार झाले असतील, मनामध्ये वाईट वासनांचा प्रभाव असेल तरी या जन्मामध्ये
वर्तमान क्षणापासून आपण चांगले विचार करून तदनुसार सदाचाराचे पालन करू शकतो. हे कोणालाही नाकारता येणार नाही.
समजा, आपल्याला आपले वाईट संस्कार, वासना किंवा
वाईट सवयी लगेच काढता येत नाहीत. हे सत्य असेल
तर मग अशावेळी मनुष्याने त्यासाठी प्रयत्न न करता त्याऐवजी आपल्या मनामध्ये चांगले
संस्कार वर्धन करण्याचा पुरुषार्थ करावा. जसे प्रसिद्ध उदाहरण दिले जाते की, एक रेषा
काढली आहे. त्या रेषेला स्पर्श न करता ती रेषा
लहान करायची असेल तर आपण त्याच्या शेजारी त्यापेक्षा दुसरी मोठी रेषा ओढतो. त्यामुळे पहिली रेषा हात न लावता आपोआपच लहान होते.
त्याचप्रमाणे आपण आपले आचार-विचार-उच्चार
चांगले केले, सुसंस्कार वर्धन केले, शुद्ध भाव वाढविला तर आपोआपच अशुभ वासनांचा प्रभाव
कमी होतो. त्यासाठीच शास्त्रामध्ये सर्व ठिकाणी
आचारधर्मांना विशेष महत्त्व दिले आहे. संतांनी सुद्धा साधकाला सदाचाराचाच आदेश दिला आहे.
आचार परमो धर्म: । (महाभारत
)
सदाचार हा थोर सांडू नये तो । जनी तोचि तो मानवी धन्य होतो ।। (मनोबोध )
याप्रमाणे श्रेष्ठ आचारधर्मांचे पालन केल्यामुळे
त्या सत्कर्मांच्या प्रभावाने मन शुद्ध व सत्त्वगुणप्रधान होऊन वाईट वासनांचा प्रभाव
कमी होतो.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–