Tuesday, May 3, 2022

मोक्ष कर्माचे फळ नाही | Liberation – Not A Result Of Action

 मोक्ष हे कोणत्याही कर्माचे फळ कदापि होऊ शकत नाही.  कारण मोक्ष हा कर्माचे फळ झाला तर कर्माप्रमाणेच नाशवान होईल.  काही काळ जीव मुक्त होईल आणि मोक्षाचा नाश झाला की, पुन्हा जीव बंधनात अडकेल.  मग वैषयिक सुख आणि मोक्षसुख यामध्ये फरक राहणार नाही.  परंतु याला मोक्ष म्हणत नाहीत.  मोक्ष हा मर्यादित कर्माचे फळ नाही.  तर उलट ज्यावेळी सर्व क्रिया थांबतात, द्वैताचा पूर्णतः निरास होतो, कर्तृकारकादि प्रत्यय संपतात, तीच निरतिशय मोक्षाची परमोच्च अवस्था होय.  त्यामुळे मोक्ष हा मन, बुद्धि किंवा इंद्रियांच्या प्रयत्नाने प्राप्त होत नाही.

 

व्यवहारात जे जे आपण मन, बुद्धी, इंद्रियांच्या साहायाने मिळवितो, ते ते सर्व मर्यादित व अल्प स्वरूपाचे असते.  व्यवहारात काहीही मिळवायचे असेल तर तिथे खूप कष्ट आहेत.  एक पी. एच. डी. ची पदवी मिळवायची असेल तरी अनेक वर्षांचे परिश्रम आहेत.  परंतु आत्मविद्या मात्र अतिशय सुलभ आहे.  या जगात मोक्षाइतके सोपे दुसरे काहीही नाही.  भगवान म्हणतात - राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं |  प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् |  आत्मविद्या ही सर्वश्रेष्ठ असणारी राजविद्या असून अत्यंत गुह्य, पवित्र, प्रत्यक्ष आणि अतिशय सहजपणे ग्रहण करण्यास योग्य अशी विद्या आहे.  कारण जे तत्त्व मी शोधतो आहे, ज्या तत्त्वाचे मला ज्ञान घ्यावयाचे आहे, ते माझ्यापासून भिन्न, दूर किंवा बाहेर नाही, तर ते माझ्या अंतरंगामध्येच आहे.  नव्हे नव्हे, ते माझे स्वतःचे प्रत्यगात्मस्वरूप आहे.  त्यामुळे 'मी'च मला जाणावयाचे आहे.  म्हणून गुरूंचा उपदेश आह - तत्त्वमसि ।  ते तत्त्व तू आहेस. तसेच, शिष्याने जाणवायचे आहे की - अहं ब्रह्मास्मि ।  'मी' ब्रह्मस्वरूप आहे.

 

एकदा हे ज्ञान झाले की, नंतर त्या ज्ञानाच्या परिपूर्ण अवस्थेमध्ये ना कोणता पुरुषार्थ आहे, ना कोणते दैव आहे, ना कोणते प्रयत्न आहेत.  मोक्ष ही स्वस्वरूपाची सहजावस्था आहे.  मोक्षासाठी कोणतेही कर्म किंवा कोणतीही साधना करण्याची आवश्यकता नाही.  किंबहुना मोक्ष हे कर्माचे, उपासनेचे, श्रवण-मननादि साधनेचे सुद्धा फळ नाही.  श्रुति स्पष्ट करते - नायमात्मा प्रवचनेन लभ्यः |  न मेधया न बहुना श्रुतेन |  आत्मा हा केवळ पुष्कळशी प्रवचने ऐकून अथवा प्रवचने करून प्राप्त होत नाही.  अथवा खूप शास्त्रश्रावण करून प्राप्त होत नाही.  खूप बुद्धीनेही प्राप्त होत नाही.  आत्मप्राप्तीमध्ये सर्व प्रयत्नांचा निरास होतो.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019- हरी ॐ