Tuesday, May 10, 2022

अहंकार रहित विद्या | Knowledge Without Ego

 



सर्व प्रमाणजनित विद्या अहंकारावर केंद्रिभूत असल्यामुळे अहंकाराचेच पोषण, वर्धन करतात.  उदा. एखादा फुगा हवा भरून फुगविला तर तो मोठा मोठा होतो, त्याप्रमाणे या सर्व विद्या अहंकाराला फुगवितात आणि “मी मोठा आहे” असा भ्रम निर्माण करून अनेक प्रकारचा अभिमान निर्माण करतात –  १) सौंदर्याचा अभिमान  २) शरीरस्वास्थ्याचा अभिमान  ३) कुल, गोत्र, जाति, धर्म, पंथ, वर्ण, आश्रम यांचा अभिमान,  ४) स्थावर-जंगम-मालमत्ता, संपत्तीचा अभिमान,  ५) सत्ता, यश, कीर्ति यांचा अभिमान,  ६) विद्वत्तेचा अभिमान, इतकेच नव्हे तर  ७) मी चार कोटी जप केला, मी धार्मिक आहे, त्यागी आहे, उपासक आहे, वगैरेंचाही अभिमान आहे.

 

म्हणून आचार्य म्हणतात – हा अहंकार आत्मस्वरूपाच्या आश्रयाने राहातो.  परंतु आपल्या स्वतःच्याच आश्रयावर आवरण घालून आपणच खरे आहोत असे भासवतो.  जितका अहंकार मोठा तितक्या प्रमाणामध्ये आपण शुद्ध, निर्भेळ आनंदापासून दूर दूर जातो.  त्यामुळे सर्व विद्या अपरा, निकृष्ट आहेत.  ती अविद्याच आहे.

 

मग विद्या कशी असावी ?  ज्या विद्येमुळे अहंकाराचा निरास होऊन मनुष्य नम्र, विनयशील होतो.  विद्या विनयेन शोभते | या उक्तीप्रमाणे जेथे खरे ज्ञान असते तेथेच नम्रता, विनयशीलता असते.  म्हणून तत्त्वमसि“ते तू आहेस” या महावाक्याच्या उपदेशाने “अहं ब्रह्मास्मिस्वरूपाने उदयाला आलेली ब्रह्मविद्या अनात्म्यामध्ये निर्माण झालेला अहंकार नष्ट करून देहात्मबुद्धीचा संपूर्ण निरास करते.  सर्व अविद्याकल्पित संसाराचा – सुखदुःख, तसेच द्रष्टा-दृश्य-दर्शन वगैरेदि त्रिपुटींचा निरास करते.  म्हणजे द्वैतभावाचा ध्वंस करून आत्मस्वरूप प्रकट करते.

 

म्हणून ब्रह्मविद्या स्वस्वरूपाने प्रकाशमान होत असल्यामुळे सर्व विद्यांची राणी आहे.  सर्वश्रेष्ठ आहे.  येथे ‘विद्या’ हा शब्द स्त्रिलिंगी असल्यामुळे ‘राज्ञी’ हा स्त्रिलिंगी शब्द वापरलेला आहे.  थोडक्यात ब्रह्मविद्या अहंकाराचे सर्व बुरखे फाडून जीवाला स्वतःचे खरे स्वरूप दाखविते की, ज्यामध्ये अहंकार-ममकार, शोकमोहादि संसार नष्ट होऊन जीव पूर्णात्मा होतो.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ