आत्मज्ञानाने प्राप्त होणारे सामर्थ्य हे
शारीरक सामर्थ्य नाही. तर आत्मस्वरूपावर अविद्येचे आवरण घालून सर्व अध्यस्त संसार निर्माण करणारी माया
सुद्धा ज्याचा पराभव करू शकत नाही, असे सामर्थ्य केवळ आत्मविद्येनेच प्राप्त होते. मायाशक्तीने
सर्व जीवांनाच आवृत्त केलेले आहे. त्यामुळे सर्व जीव
मोहीत होऊन जन्मानुजन्मे संसारचक्रामध्येच बद्ध होतात. परंतु जो कोणी एखादाच भाग्यवान
जीव आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करेल, गुरूंच्याकडून वेदान्तशास्त्राचे
ज्ञान विधिवत् प्राप्त करून मनन-निदिध्यासनेच्या साहाय्याने ज्ञाननिष्ठा प्राप्त
करेल, त्यालाच या आत्मविद्येचे फळ म्हणजे अमृतत्त्वाची प्राप्ति होईल. त्याला आत्मविद्येने इतके सामर्थ्य प्राप्त होते की, माया त्याला मोहीत करू
शकत नाही. त्याला पुन्हा शोकमोहात्मक संसाराची प्राप्ति होत नाही. हे सर्व सामर्थ्य आत्मज्ञानाचे
आहे.
हे सामर्थ्य कसे असते ? यावर
आचार्य आत्मज्ञानाच्या सामर्थ्याचे वैशिष्ठ्य सांगतात – अमृतं
अविनाशि | आत्मज्ञानाचे
सामर्थ्य हे अमृत म्हणजेच अविनाशी स्वरूपाचे असते. याउलट अविद्याजन्य सामर्थ्य हे नाशावान असते. कारण
अज्ञानाचा नाश ज्ञानाने होतो. मात्र ज्ञानाचा नाश कशानेही होत
नाही. म्हणून अविद्येमधून निर्माण झालेले सामर्थ्य
हे अविद्येप्रमाणेच नाशवान असते. बाह्य,
दृश्य पदार्थांची, अनात्म्याची विद्या ही
सर्व अविद्याच आहे. म्हणून बाह्य, भौतिक ज्ञानाने कितीही
सामर्थ्य, बल, वीर्य, प्रसिद्धि, नावलौकिक, प्रतिष्ठा मिळाली तरीही हे सर्व
नाशावान आहे. मात्र एखाद्याजवळ कदाचित बहिरंगाने काहीही
नसेल व फक्त सम्यक् आत्मज्ञान असेल तर तो सर्वात श्रेष्ठ, सामर्थ्यशाली पुरुष आहे. आत्मज्ञान हेच
आत्मज्ञानी पुरुषाचे सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य नित्य,
शाश्वत असते. म्हणूनच ब्रह्मज्ञानी पुरुष हा नित्य निर्भय
असतो.
श्रुति वर्णन करते-
विद्वान्न बिभेति कुतश्चन | (तैत्ति. उप.२-९-१)
विद्वान पुरुष कोणालाही भीत नाही, कारण ज्ञान हेच त्याचे बल आहे. आत्मज्ञानाने
मायेला सुद्धा पराभूत करण्याचे सामर्थ्य मिळते. मायेचा,
अध्यासाचा निरास झाला की, आपोआपच नित्य अमृतस्वरूप असणारे आत्मतत्त्व प्रत्यगात्मस्वरूपाने प्रकट होते.
- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "Kenopanishad" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013
- हरी ॐ–