Tuesday, April 26, 2022

स्वप्न व जागृतीमधील अनित्यता | Impermanence in Dream & Waking

 




साधकाने जागृतावस्था व स्वप्नावस्था या दोन अवस्थांचा सर्वांगीण विचार केला पाहिजे.  जागृतावस्थेमधील अन्न-पाणी या विषयांनी स्वप्नावस्थेमधील भूक-तहान शांत होत नाही.  म्हणून जागृत विषयांची प्रयोजनता स्वप्नावस्थेमध्ये राहत नाही.  समजा, एखादा मनुष्य जागृतावस्थेमध्ये पोटभर अन्न ग्रहण करून, पाणी पिऊन, तृप्त होऊन झोपला असेल तरी स्वप्नावस्थेमध्ये तो भुकेने-तहानेने व्याकूळ होतो.  म्हणजेच जागृतीमधील अन्न-पाणी ही विषय स्वप्नामधील भूक-तहान शमविण्यासाठी उपयोगी पडत नाहीत.  जागृतावस्थेत पोटभर अन्न ग्रहण करून झोपले तरी काही वेळेस मनुष्याला स्वप्नावस्थेमध्ये भुकेने व्याकूळ होण्याचा अनुभव येतो.  किंवा याउलट, स्वप्नामध्ये पंचपक्वान्नाचे जेवण करून तृप्त झालेला मनुष्य जेव्हा जागृत होतो, तेव्हा त्याला प्रचंड भूक लागलेली असते.  भूक तहानेने तो व्याकूळ होतो.  तो अतृप्त असतो.  याप्रमाणे स्वप्नामध्ये जागृतीमधील पदार्थांचा विपरीत भाव दिसतो.

 

याचा अर्थ जागृतावस्थेमधील पदार्थ जागृतीत जरी सत्य वाटले तरी स्वप्नामध्ये क्षुधा-तृषा-गमनागमन आदि व्यवहारासाठी त्यांचा उपयोग होत नाहीत.  तसेच, स्वप्नामधील पदार्थ जागृतावस्थेमध्ये उपयोगी पडत नाही.  स्वप्नामध्ये लॉटरी लागली तर जागृतावस्थेमध्ये पैसे मिळत नाहीत.  यावरून सिद्ध होते की, स्वप्नामधील विषय जितके मिथ्या आहेत, तितकेच जागृतीमधील विषयही मिथ्या आहेत.  यामध्ये शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही.  जागृतावस्थेमधील विषय हे मिथ्याच आहेत, हे स्पष्ट आहे.

 

म्हणून स्वप्नावस्था व जागृतावस्था या दोन्हीही अवस्थांच्यामध्ये अनुभवायला येणारे सर्वच विषय हे आदिअंतयुक्त, उत्पत्तिस्थितिलययुक्त आहेत.  ही त्यांच्यामधील समानता आहे.  म्हणूनच या दोन्हीही अवस्थांच्यामधील सर्वच दृश्य विषय हे जन्ममरणयुक्त, नाशवान, अनित्य असून मिथ्या, असत्, वितथ स्वरूपाचे आहेत.  हेच येथे सिद्ध होते.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ





Tuesday, April 19, 2022

मागचा पुरुषार्थ आत्ताचे दैव | Past Duty is Current Fate

 



संकटामध्ये आपली शक्ति आणि सामर्थ्य वाढते.  वसिष्ठ येथे सांगतात की, "हे मनुष्या !  तू दैवाला महत्त्व देऊ नकोस.  निकृष्ट वस्तु जशा आपण पायाखाली तुडवितो, तसेच दैवाला तुडव.  दैवाकडे दुर्लक्ष करून जीवनभर नित्य निरंतर सातत्याने धर्मकर्माचे अनुसरण करीत जा.  कारण निश्चितच दैव हे पुरुषार्थापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही.  आत्ताच्या पुरुषार्थाने तू तुझे दैव म्हणजेच मागचे कर्म निष्प्रभ करू शकतोस."

 

समजा, आज आपल्याला काही त्रास होत असेल, आपल्याशी कोणी वाईट वागत असेल तर असे समजावे की, आपणही दुसऱ्याला असाच त्रास कधीतरी दिला असला पाहिजे.  त्या आपल्या पूर्वीच्या वाईट कर्माचे फळ आज मिळत आहे.  अशा वेळी दुसऱ्या व्यक्तीला किंवा नशीबाला दोष देत बसण्यापेक्षा आपण आता वर्तमानकाळात चांगला पुरुषार्थ करू शकतो.  म्हणजेच आपण दुसऱ्याशी चांगले वागू शकतो. परोपकार करू शकतो, दुसऱ्याची निःस्वार्थ सेवा करू शकतो.  त्यामुळे आपल्याला या चांगल्या कर्माचे निश्चितच चांगले फळ मिळणार हे सत्य आहे.  पण त्या पुरुषार्थाचा आपण दुरुपयोग केला आणि "हा माझ्याशी वाईट वागतो म्हणून मीही त्याच्याशी वाईट वागेन", ही वृत्ति ठेवली तर आपले भविष्यकाळचे दैवही वाईट होते.

 

म्हणून दैव आणि पुरुषार्थ हे वस्तुतः भिन्न नाहीत.  आपल्यासमोर येताना ते दोन भिन्न वाटतात.  पण ते दोन्हीही एकच आहेत.  मागचा पुरुषार्थ म्हणजे आत्ताचे दैव होय आणि आत्ताचा पुरुषार्थ म्हणजे पुढचे दैव !  म्हणूनच आपणास आयुष्यामध्ये सुखी व्हावयाचे असेल तर शास्त्रविहित चांगले कर्म करणे आवश्यक आहे.  येथून मागच्या कर्म-कर्मफळावर आपले नियंत्रण नसेल तरी या वर्तमान क्षणापासून सुद्धा आपण ठरविले तर शास्त्राचा उपदेश तंतोतंत पाळू शकतो.  हेच प्रारब्ध आणि पुरुषार्थाचे रहस्य आहे.  मनुष्याने ठरविले तर या जगात त्याला काहीही अशक्य नाही.  म्हणून दैवापेक्षा पुरुषार्थ श्रेष्ठ आहे, हेच पुन्हा एकदा येथे सिद्ध होते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, April 12, 2022

सिद्धींच्या पलीकडे | Beyond Miracle Capabilities

 



जगामध्ये अनेक गुह्य वस्तू आहेत.  गुह्य म्हणजे प्राप्त करण्यास अत्यंत कठीण.  वस्तु जितकी गुह्य असेल तितके अधिक परिश्रम करावे लागतात.  कायासिद्धि, आसनसिद्धि, इंद्रियदमनसिद्धि अशा अनेक सिद्धि आहेत.  याहीपेक्षा मोठ्या सिद्धि म्हणजे –  १) अणिमा – परमाणूप्रमाणे अत्यंत सूक्ष्म रूप धारण करणे,  २) महिमा – व्यापकरूपाने होणे,  ३) लघिमा – कापसाप्रमाणे अत्यंत हलके होणे,  ४) गरिमा – पर्वताप्रमाणे मोठे होणे,  ५) प्राप्ति – हाताच्या बोटाने चंद्रमंडळास स्पर्श करणे,  ६) प्राकाम्य – सत्य संकल्पवान होणे,  ७) वशित्व – सर्व प्राणिमात्रांना वश करणे आणि  ८) ईशित्व – भूतमात्रांची उत्पादनशक्ति.  या अष्टसिद्धि आहेत.

 

याशिवाय तंत्र, मंत्र, औषधी सिद्धि आहेत.  अशा सिद्धि प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे.  या सर्व गुह्य सिद्धींच्यामध्ये ब्रह्मज्ञान अत्यंत गुह्य आहे.  अन्य सर्व सिद्धि प्रदीर्घ केलेल्या स्वप्रयत्नाने कदाचित प्राप्त करता येतील.  परंतु ब्रह्मज्ञान मात्र त्याहीपेक्षा कठीण आहे, कारण ते सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे.  किती सूक्ष्म आहे ?  तर ते आपले स्वतःचेच स्वरूप आहे.  म्हणून मनुष्य स्वतःव्यतिरिक्त अन्य सर्व पाहू शकतो.  सर्व विश्व जाणू शकतो.  परंतु स्वतःला मात्र पाहू शकत नाही.  जाणू शकत नाही.

 

ज्याप्रमाणे मनुष्याला आपल्या स्वतःचा चेहरा अत्यंत जवळ असूनही कधीच पाहाता येत नाही, प्रत्यक्ष अनुभवता येत नाही.  दुसऱ्याचे चेहरे पाहाता येतात.  परंतु स्वतःचा मात्र दिसत नाही.  काखेत कळसा आणि गावाला वळसा.  याप्रमाणे – “तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलासी” या वाचनाप्रमाणे मनुष्य जे शोधत आहे ते त्याच्याजवळच आहे.  नव्हे, त्याचे स्वतःचे स्वरूपच आहे.  त्यामुळे अनंतकोटी जन्मामध्ये ते स्वतःचे स्वरूप सापडणार नाही.  याचे कारण मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ति ही बहिर्मुख आहे.  या बहिर्मुख मनामुळेच आपल्या आतच असणारे आपले स्वतःचे स्वरूप कळत नाही, जाणता येत नाही.  म्हणून ते अत्यंत गूढ आहे.

 

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, April 5, 2022

प्रयत्न-पराक्रमाने दैव ही घाबरेल | Fate Fears Effort

 



आपण स्वतः केलेला शास्त्रविहित प्रयत्न आणि अन्य कोणीतरी म्हणजे दैवाने केलेला पुरुषार्थ या दोघांमध्ये दोन एडक्यांप्रमाणे युद्ध चाललेले असते.  त्यामध्ये ज्याची शक्ति जास्त तोच जिंकतो.  श्रीवसिष्ठ मुनि सांगतात की, आपल्या जीवनामध्ये आपण जसा प्रयत्न-पुरुषार्थ करीत असतो, चांगले काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपले दैव सुद्धा आपल्या प्रयत्नांच्याबरोबर लढण्यासाठी, आपली परीक्षा पाहण्यासाठी तेथे येते.  आपल्या प्रयत्नांना शक्तिहीन करण्याचा प्रयत्न करते.  त्यामुळे प्रयत्न आणि दैव मनुष्यासमोर सारख्याच शक्तीने येतात.  एका बाजूला आहे पुरुषार्थ आणि दुसऱ्या बाजूला आहे दैव !

 

अशा वेळी विवेकी मनुष्य अथक प्रयत्न करून धैर्याने, दृढ विश्वासाने, उत्साहाने व सातत्याने प्रयत्न करून दैवाचा प्रभाव कमी करतो.  याउलट अविवेकी मनुष्य मात्र त्याच्यासमोर घोर दैव प्राप्त झाले असताना गोंधळून जातो.  त्याची बुद्धि भ्रमिष्ट होते.  त्यावेळी त्याला पुरुषार्थ दिसतच नाही.  आपण प्रयत्न करू शकतो, हे विसरून तो निष्क्रीय होऊन बसतो.  प्रयत्नांचा त्याग करून मनुष्य निष्क्रीय झाला की, त्याचे दैव आणखीनच बलवत्तर होते.

 

दैव समोर आले रे आले, एखादा वाईट प्रसंग, एखादे संकट आले की, आपण, "काय माझे नशीब ?"  असे म्हणून भयभीत होतो.  आपलेच दैव ज्यावेळेस आपली अशी अवस्था पाहते, त्यावेळेस ते दैव आपल्या मनावर अधिक प्रभाव गाजवते.  त्यामुळे मनुष्य हताश, निराश, उद्विग्न होतो.

 

दैव आणि पुरुषार्थ ज्यावेळेस आपल्यासमोर येतील, त्यावेळी आपण प्रयत्नांचे सामर्थ्य वाढविले तर आपल्याला दैवही घाबरेल.  रघुवंशामध्ये असे थोर राजे होऊन गेले की, त्यांच्यापुढे दैवही घाबरत होते.  ज्यावेळी शत्रूप्रमाणे संकटांशी मी दोन हात कारेन, दैवासमोर दुर्दम्य आत्मविश्वासाने मनुष्य उभा राहील, त्यावेळी संकटे सुद्धा त्याच्यापुढे नतमस्तक होतात.  प्रत्यक्ष मृत्यु सुद्धा ज्ञानी पुरुषाला प्रणाम करतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ