Tuesday, April 19, 2022

मागचा पुरुषार्थ आत्ताचे दैव | Past Duty is Current Fate

 



संकटामध्ये आपली शक्ति आणि सामर्थ्य वाढते.  वसिष्ठ येथे सांगतात की, "हे मनुष्या !  तू दैवाला महत्त्व देऊ नकोस.  निकृष्ट वस्तु जशा आपण पायाखाली तुडवितो, तसेच दैवाला तुडव.  दैवाकडे दुर्लक्ष करून जीवनभर नित्य निरंतर सातत्याने धर्मकर्माचे अनुसरण करीत जा.  कारण निश्चितच दैव हे पुरुषार्थापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही.  आत्ताच्या पुरुषार्थाने तू तुझे दैव म्हणजेच मागचे कर्म निष्प्रभ करू शकतोस."

 

समजा, आज आपल्याला काही त्रास होत असेल, आपल्याशी कोणी वाईट वागत असेल तर असे समजावे की, आपणही दुसऱ्याला असाच त्रास कधीतरी दिला असला पाहिजे.  त्या आपल्या पूर्वीच्या वाईट कर्माचे फळ आज मिळत आहे.  अशा वेळी दुसऱ्या व्यक्तीला किंवा नशीबाला दोष देत बसण्यापेक्षा आपण आता वर्तमानकाळात चांगला पुरुषार्थ करू शकतो.  म्हणजेच आपण दुसऱ्याशी चांगले वागू शकतो. परोपकार करू शकतो, दुसऱ्याची निःस्वार्थ सेवा करू शकतो.  त्यामुळे आपल्याला या चांगल्या कर्माचे निश्चितच चांगले फळ मिळणार हे सत्य आहे.  पण त्या पुरुषार्थाचा आपण दुरुपयोग केला आणि "हा माझ्याशी वाईट वागतो म्हणून मीही त्याच्याशी वाईट वागेन", ही वृत्ति ठेवली तर आपले भविष्यकाळचे दैवही वाईट होते.

 

म्हणून दैव आणि पुरुषार्थ हे वस्तुतः भिन्न नाहीत.  आपल्यासमोर येताना ते दोन भिन्न वाटतात.  पण ते दोन्हीही एकच आहेत.  मागचा पुरुषार्थ म्हणजे आत्ताचे दैव होय आणि आत्ताचा पुरुषार्थ म्हणजे पुढचे दैव !  म्हणूनच आपणास आयुष्यामध्ये सुखी व्हावयाचे असेल तर शास्त्रविहित चांगले कर्म करणे आवश्यक आहे.  येथून मागच्या कर्म-कर्मफळावर आपले नियंत्रण नसेल तरी या वर्तमान क्षणापासून सुद्धा आपण ठरविले तर शास्त्राचा उपदेश तंतोतंत पाळू शकतो.  हेच प्रारब्ध आणि पुरुषार्थाचे रहस्य आहे.  मनुष्याने ठरविले तर या जगात त्याला काहीही अशक्य नाही.  म्हणून दैवापेक्षा पुरुषार्थ श्रेष्ठ आहे, हेच पुन्हा एकदा येथे सिद्ध होते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ