जगामध्ये अनेक गुह्य वस्तू आहेत. गुह्य म्हणजे प्राप्त करण्यास अत्यंत कठीण. वस्तु जितकी गुह्य असेल तितके अधिक परिश्रम
करावे लागतात. कायासिद्धि, आसनसिद्धि,
इंद्रियदमनसिद्धि अशा अनेक सिद्धि आहेत. याहीपेक्षा
मोठ्या सिद्धि म्हणजे – १) अणिमा –
परमाणूप्रमाणे अत्यंत सूक्ष्म रूप धारण करणे, २) महिमा – व्यापकरूपाने होणे, ३) लघिमा – कापसाप्रमाणे अत्यंत हलके
होणे, ४) गरिमा – पर्वताप्रमाणे
मोठे होणे, ५) प्राप्ति – हाताच्या
बोटाने चंद्रमंडळास स्पर्श करणे, ६) प्राकाम्य
– सत्य संकल्पवान होणे, ७) वशित्व
– सर्व प्राणिमात्रांना वश करणे आणि ८) ईशित्व
– भूतमात्रांची उत्पादनशक्ति. या अष्टसिद्धि
आहेत.
याशिवाय तंत्र, मंत्र, औषधी सिद्धि आहेत. अशा सिद्धि प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे. या सर्व गुह्य सिद्धींच्यामध्ये ब्रह्मज्ञान अत्यंत
गुह्य आहे. अन्य सर्व सिद्धि प्रदीर्घ
केलेल्या स्वप्रयत्नाने कदाचित प्राप्त करता येतील. परंतु ब्रह्मज्ञान मात्र त्याहीपेक्षा कठीण आहे,
कारण ते सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे. किती
सूक्ष्म आहे ? तर ते आपले स्वतःचेच स्वरूप
आहे. म्हणून मनुष्य स्वतःव्यतिरिक्त अन्य
सर्व पाहू शकतो. सर्व विश्व जाणू शकतो. परंतु स्वतःला मात्र पाहू शकत नाही. जाणू शकत नाही.
ज्याप्रमाणे मनुष्याला आपल्या स्वतःचा चेहरा
अत्यंत जवळ असूनही कधीच पाहाता येत नाही, प्रत्यक्ष अनुभवता येत नाही. दुसऱ्याचे चेहरे पाहाता येतात. परंतु स्वतःचा मात्र दिसत नाही. काखेत कळसा आणि गावाला वळसा. याप्रमाणे – “तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलासी”
या वाचनाप्रमाणे मनुष्य जे शोधत आहे ते त्याच्याजवळच आहे. नव्हे, त्याचे स्वतःचे स्वरूपच आहे. त्यामुळे अनंतकोटी जन्मामध्ये ते स्वतःचे स्वरूप
सापडणार नाही. याचे कारण मनुष्याची
स्वाभाविक प्रवृत्ति ही बहिर्मुख आहे. या
बहिर्मुख मनामुळेच आपल्या आतच असणारे आपले स्वतःचे स्वरूप कळत नाही, जाणता येत
नाही. म्हणून ते अत्यंत गूढ आहे.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–