Tuesday, October 26, 2021

रजोगुणाचे दोन प्रकार | Two Types of Modes of Passion

 



रजोगुण सतत कर्मामध्येच प्रवृत्त करीत असल्यामुळे तेच कर्म निष्काम वृत्तीने केले तर रजोगुणाच्या रागद्वेषांचा परिणाम कमी होतो.  म्हणून प्रत्येक कर्म ईश्वरार्पणबुद्धीने निष्काम वृत्तीने परमेश्वराची सेवा म्हणून करावे.  याचा अर्थ कर्माचा त्याग करून अंतःकरणशुद्धि होत नाही किंवा मनाची बहिर्मुख प्रवृत्ति कमी होत नाही.  शारीरिक कर्म केले नाही तर रजोगुणामधून निर्माण होणारे विकल्प, मनाच्या प्रतिक्रिया, द्वंद्व, विक्षेप कमी होत नाहीत. म्हणून साधकाने प्रथम निष्काम कर्मयोगाच्या अनुष्ठानाने रजोगुणाची प्रवृत्ति कमी करावी.  याप्रमाणे अखंड, दीर्घकाळ केलेल्या सेवेने रजोगुण शांत होतो.

 

रजोगुण दोन प्रकारचा आहे.  १) शुद्ध रजोगुण व २) अशुद्ध रजोगुण.  अशुद्ध रजोगुण अज्ञानी, मूढ मनुष्यामध्ये असून त्यामुळे मनामध्ये सतत कामक्रोधादि विकारांचा उत्कर्ष होतो.  प्रत्येक कर्माच्या मागे कर्मफळाची अपेक्षा राहाते.  आपल्याला किती मिळावे, काय मिळावे, काय मिळू नये, तसेच केव्हा मिळावे याचा निर्णय आपणच ठरवितो.  त्यामुळे सतत अपेक्षाभंगाचे दुःख, उद्विग्नता, नैराश्य त्याच्या वाट्याला येते.  थोडक्यात अशुद्ध रजोगुण शेवटी मनुष्याच्या दुःखालाच कारण होतो.

 

याउलट साधु पुरुषांमध्ये शुद्ध रजोगुण असतो.  त्याच्या मनामधील उपभोग घेण्याची वासना कमी झालेली असल्यामुळे मनामध्ये रागद्वेषांचा प्रभाव कमी होतो.  कोणतेही कर्म द्वंद्वरहित, उत्स्फूर्त असून अपेक्षारहित, निष्काम वृत्तीने सेवाभावाने होत असल्यामुळे यश मिळाले तरी साधुपुरुष हुरळून जात नाही किंवा अपयशाने, अपेक्षाभंगामुळे दुःखी, उद्विग्न होत नाही.  कितीही प्रतिबंध आले तरी तो आपले काम सतत करीत राहातो.  तो स्वकर्तव्यापासून कधीही च्युत होत नाही.  उलट या शुद्ध रजोगुणामुळेच समाजामध्ये महान कार्य घडत असते.  म्हणून प्रत्येक साधकाने आपल्यामध्ये असलेला अशुद्ध रजोगुण शुद्ध करण्याचा अभ्यास करावा.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, October 19, 2021

मन विषयांकडे का धावते ? | Why Mind Runs Out ?

 



मन विषयांच्याकडे का जाते ?  याचा विचार केला पाहिजे.  नाहीतर केवळ इच्छाशक्तीने मनाला आवर घालण्याचा प्रयत्न केला तरी ते मन निवृत्त होणार नाही.  उदा. सर्वसाधारणपणे लहान मुलांना अभ्यासापेक्षा खेळण्यामध्ये अधिक आनंद वाटतो.  अशा मुलाला आई-वडिलांनी सांगितले की, बाबा रे खेळ बंद करून अभ्यास कर.  तर तो मुलगा हो म्हणेल सुद्धा !  परंतु हातातील खेळ मात्र सोडणार नाही.  अशा वेळी त्याला जर बळजबरीने, त्याच्या इच्छेविरुद्ध अभ्यासाला बसविले तर तो अभ्यासाला बसेल, परंतु त्याचे मन त्यामध्ये कधीही एकाग्र होणार नाही.  खेळामध्येच त्याला गोडी आहे.  म्हणून अभ्यासापेक्षा खेळ अधिक महत्त्वाचा वाटतो.

 

ज्या गोष्टीची आवड नसते तेथे मन कधीच एकाग्र होत नाही.  रमत नाही.  हा सर्वांचाच अनुभव आहे.  त्याचप्रमाणे योगसाधनेमध्ये आम्ही आमचे मन सर्व विषयांच्यापासून निवृत्त करून आत्मस्वरूपामध्ये मनाची उपशमा करण्याचा अभ्यास करतो परंतु या मनाला विषयांचे महत्त्व असेल, विषयांच्यामध्ये रस असून आसक्ति असेल तर असे मन एकदम आत्मस्वरूपामध्ये कसे स्थिर होईल ?  कधीच शक्य नाही.  इतकेच नव्हे तर विवेकाने मनाला विषयांचा फोलपणा समजला, विषयदोषदर्शनाने खरे स्वरूप आणि सर्व मर्यादा समजल्या तरीही हे मन इच्छा नसताना सुद्धा विषयांच्याकडे धाव घेते.  विषयांचेच चिंतन करते.  असे मन कितीही प्रयत्न केले तरी निवृत्त होत नाही.  असे का ?

 

योगाभ्यास करताना जरी मनामध्ये विषय उपभोगण्याची इच्छा नसली तरीही मन विषयांच्याकडे धावत असेल तर त्याचे कारण १) वरवर विषय नकोसे वाटत असतील तरी अजून मनाला विषयांचे महत्त्व असले पाहिजे.  २) अनेक वर्षांच्या लागलेल्या सवयीमुळे मन पुन्हा पुन्हा विषयाकडे धावते.  ३) मन विरक्त असेल तरीही आतापर्यंत संग्रहीत केलेल्या सूक्ष्म विषयांच्या संस्कारांच्या प्रभावामुळे मन विषयाभिमुख होते.  ४) सुप्त विषयभोगवासानेमुळे पुन्हा पुन्हा विषयांचे संकल्प निर्माण होऊन मन विषयांचे चिंतन करते.  ५) याचा अर्थ अजून संपूर्ण वैराग्य प्राप्त झालेले नाही.  विषयांचा रस – म्हणजेच आसक्ति सूक्ष्म रूपाने अंतःकरणामध्ये आहे.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, October 12, 2021

ध्यान आणि मन | Dhyan And The Mind

 



ध्यानामध्ये मनाचे निरीक्षण करीत असताना काहीही चांगले नाही किंवा वाईटही नाही, कारण चांगले आणि वाईट या मनाने निर्माण केलेल्या चुकीच्या कल्पना आहेत.  कल्पनेनेच चांगले-वाईट विचार ठरविलेले आहेत तसेच कितीही चांगले विचार असले तरी ते जसे येतात तसे टिकविण्याचा प्रयत्न करून सुद्धा न राहाता आपोआप निघून जातात आणि वाईट विचार सुद्धा जातात.  हा आपला प्रत्येकाचा अनुभव आहे.

 

मग हे सत्य असताना विनाकारण ते विचार टिकविण्याचा किंवा काढून टाकण्याचा प्रयत्न का करावा?  त्यांना कोणत्याही प्रकारचे महत्व न देता, सत्यता न देता त्यांना त्यांच्या स्वभावाप्रमाणे येऊ द्यावे आणि जाऊही द्यावे.  यातच मनाची पक्वता नाही का?  हा खरा पुरुषार्थ नाही का?  म्हणून ध्यान करताना साधकाने मनाचे निरीक्षण करताना मनाला कोणत्याही प्रकारची वास्तवता न देता अत्यंत तटस्थतेने अलिप्त राहून जाणीवपूर्वक सावधानतेने निरीक्षण करावे म्हणजेच चांगले विचार आले तर हुरळून जावू नये, वाईट आले तर खिन्न, नाराज होऊ नये.  ते जसे आहेत तसे पाहाण्याचा अभ्यास करावा.  निरीक्षकाचे काम फक्त निरीक्षण करणे आहे.  त्यावर प्रतिक्रिया करणे हे काम नाही.  याप्रमाणे साक्षित्वाचाअभयस करावा.

 

याचा परिणाम म्हणजे मनामधील सर्व काल्पनिक विषयांच्या वृत्ति, संकल्प-विकल्प, द्वंद्व, मनाची मनोराज्ये, सुख-दु:खांचे हेलकावे वगैरे कमी होतील.  वृत्तींचा प्रवाह आणि मनाची बहिर्मुख प्रवृत्ति कमी कमी होऊन मनाची उपशमा होईल.  मनाचे लक्ष मनामध्येच असल्यामुळे अंतरिक जाणीव आणि सावधानता अधिक वाढेल.  बाहेरील शब्द, स्पर्शादि विषयांच्या सवेंदना अंतरिक सावधानता विचलित करणार नाहीत, अस्वस्थ करणार नाहीत, त्या अवस्थेमध्ये मन संपूर्ण अंतरिक जाणीवेमध्ये एकाग्र झालेले असते.  त्यावेळी बाह्य विषय, इंद्रिये व शरीर यांची शरीराची जाणीव संपते.  मनामधील सर्व संकल्प आणि विकल्प गळून पडतात.  संकल्पप्रभवान्कामान्स्त्यक्त्वा सर्वानशेषतः |  ही अवस्था प्राप्त होते.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, October 5, 2021

प्राण आणि मन | Breath And The Mind

 



प्राणायामाने मनावर संयमन का होते ?  त्याचे कारण प्राणाचा आणि मनाचा अत्यंत जवळचा संबंध आहे.  ज्यावेळी आपले मन अत्यंत अस्वस्थ, क्षुब्ध, संतप्त किंवा क्रोधाविष्ट असते त्यावेळी आपला श्वासोच्छवास सुद्धा जलद आणि अस्वस्थ होतो आणि ज्यावेळी मन शांत, एकाग्र असते त्यावेळी प्राण सुद्धा संथ, शांत असतो. हा प्रत्येकाचा अनुभव आहे.  म्हणजेच प्राण व मन यांचा एकमेकांवर परिणाम होतो.  याचे कारण प्राण आणि मन या दोघांची निर्मिती एकाच त्रिगुणात्मक प्रकृतीपासून झालेली आहे.

 

एकाच बुंध्यापासून दोन शाखा निर्माण होतात, त्याचप्रमाणे एकाच प्रकृतीच्या शक्तीमधून प्राण आणि मन निर्माण झालेले आहे.  म्हणून प्राण आणि मन या दोघांचाही सूक्ष्म शरीरामध्ये अंतर्भाव आहे.  सूक्ष्म शरीरामध्ये पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेन्द्रिये, पंचप्राण आणि मन, बुद्धि, चित्त व अहंकार अशा १९ घटकांचा समावेश आहे.  यामुळे मनाचा प्राणावर आणि प्राणाचा मनावर परिणाम होतो.  म्हणून मनावर एकदम संयमन करता येत नसल्यामुळे प्राणाचे नियमन करून मनावर काही प्रमाणामध्ये संयमन करता येते.  यासाठी येथे प्राणायामाची साधना दिलेली आहे.  प्राणापानौ समौ क्रुत्वा नासाभ्यन्तर चारिणौ |  प्राण आणि अपान म्हणजेच श्वास आणि उच्छ्वास यांची गति संथ, नियमित व सम करून प्राणायामाची साधना करावी.

 

प्राणायाम म्हणजे केवळ श्वास घेणे आणि सोडणे नव्हे.  त्याप्रकारचा श्वासोच्छवास आपण आत्तापर्यंत सतत करीतच आहोत.  परंतु त्याला प्राणायाम म्हणत नाहीत.  याचे कारण तो यंत्राप्रमाणे होत असतो.  त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जाणीव नसते. परंतु प्राणायामामध्ये अत्यंत सावधान राहून जाणीवपूर्वक श्वास आणि उच्छ्वास याची गति संथ आणि सम करून याचे निरीक्षण करणे याला प्राणायाम असे म्हणतात.  प्राणायामामध्ये मनाला दोन क्रिया दिलेल्या आहेत. अंतरिक सावधान राहून जाणीवपूर्वक श्वास व उच्छ्वास घेऊन तो संथ व सम करणे ही पहिली क्रिया आणि त्याचवेळी या क्रियेचे अत्यंत दक्ष व तटस्थ राहून निरीक्षण करणे ही दुसरी क्रिया.  या क्रमाने केलेल्या साधनेमुळे प्रथम मनाचे बाह्य विषयांच्यावरील लक्ष निवृत्त होऊन शरीरावर एकाग्र होते आणि त्यानंतर प्राणायामामुळे ते लक्ष शरीरावरून निवृत्त होऊन प्राणावर केंद्रीभूत होते.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ