Tuesday, October 5, 2021

प्राण आणि मन | Breath And The Mind

 प्राणायामाने मनावर संयमन का होते ?  त्याचे कारण प्राणाचा आणि मनाचा अत्यंत जवळचा संबंध आहे.  ज्यावेळी आपले मन अत्यंत अस्वस्थ, क्षुब्ध, संतप्त किंवा क्रोधाविष्ट असते त्यावेळी आपला श्वासोच्छवास सुद्धा जलद आणि अस्वस्थ होतो आणि ज्यावेळी मन शांत, एकाग्र असते त्यावेळी प्राण सुद्धा संथ, शांत असतो. हा प्रत्येकाचा अनुभव आहे.  म्हणजेच प्राण व मन यांचा एकमेकांवर परिणाम होतो.  याचे कारण प्राण आणि मन या दोघांची निर्मिती एकाच त्रिगुणात्मक प्रकृतीपासून झालेली आहे.

 

एकाच बुंध्यापासून दोन शाखा निर्माण होतात, त्याचप्रमाणे एकाच प्रकृतीच्या शक्तीमधून प्राण आणि मन निर्माण झालेले आहे.  म्हणून प्राण आणि मन या दोघांचाही सूक्ष्म शरीरामध्ये अंतर्भाव आहे.  सूक्ष्म शरीरामध्ये पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेन्द्रिये, पंचप्राण आणि मन, बुद्धि, चित्त व अहंकार अशा १९ घटकांचा समावेश आहे.  यामुळे मनाचा प्राणावर आणि प्राणाचा मनावर परिणाम होतो.  म्हणून मनावर एकदम संयमन करता येत नसल्यामुळे प्राणाचे नियमन करून मनावर काही प्रमाणामध्ये संयमन करता येते.  यासाठी येथे प्राणायामाची साधना दिलेली आहे.  प्राणापानौ समौ क्रुत्वा नासाभ्यन्तर चारिणौ |  प्राण आणि अपान म्हणजेच श्वास आणि उच्छ्वास यांची गति संथ, नियमित व सम करून प्राणायामाची साधना करावी.

 

प्राणायाम म्हणजे केवळ श्वास घेणे आणि सोडणे नव्हे.  त्याप्रकारचा श्वासोच्छवास आपण आत्तापर्यंत सतत करीतच आहोत.  परंतु त्याला प्राणायाम म्हणत नाहीत.  याचे कारण तो यंत्राप्रमाणे होत असतो.  त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जाणीव नसते. परंतु प्राणायामामध्ये अत्यंत सावधान राहून जाणीवपूर्वक श्वास आणि उच्छ्वास याची गति संथ आणि सम करून याचे निरीक्षण करणे याला प्राणायाम असे म्हणतात.  प्राणायामामध्ये मनाला दोन क्रिया दिलेल्या आहेत. अंतरिक सावधान राहून जाणीवपूर्वक श्वास व उच्छ्वास घेऊन तो संथ व सम करणे ही पहिली क्रिया आणि त्याचवेळी या क्रियेचे अत्यंत दक्ष व तटस्थ राहून निरीक्षण करणे ही दुसरी क्रिया.  या क्रमाने केलेल्या साधनेमुळे प्रथम मनाचे बाह्य विषयांच्यावरील लक्ष निवृत्त होऊन शरीरावर एकाग्र होते आणि त्यानंतर प्राणायामामुळे ते लक्ष शरीरावरून निवृत्त होऊन प्राणावर केंद्रीभूत होते.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ