अभेद दृष्टीच्या आचार्यांनी उपदेश केल्यानंतर
वेदान्तशास्त्रामधून प्रतिपादन केलेल्या आत्मस्वरूपाची बुद्धि केवळ तर्काने
प्राप्त होत नाही. केवळ स्वतःच्या
बुद्धीने उहापोह विचार करून प्राप्त होत नाही. इतकेच नव्हे, तर कोणत्याही तर्काने आत्मज्ञानाचे
खंडनही करता येत नाही. तार्किक
लोकांना वेदान्तशास्त्राचे परिपूर्ण ज्ञान नसल्यामुळे केवळ स्वबुद्धीलाच
प्रामाण्यत्व देऊन ते पोकळ बुद्धिवाद करतात. त्यांच्या त्या निराधार बुद्धिवादाने किंवा
तर्काने वेदशास्त्रजनित आत्मबुद्धीचा निरास होऊ शकत नाही, कारण ज्याचे खंडन
करावयाचे ते वेदान्तशास्त्र त्यांना पूर्णपणे माहित नाही. म्हणून स्वतःला बुद्धिवादी समजणाऱ्या लोकांना
प्रथम अध्यात्म म्हणजे काय हे समजावून घेतले पाहिजे.
सूक्ष्मातिसूक्ष्म असणाऱ्या आत्मस्वरूपाची
प्राप्ति केवळ बुद्धीने, तर्काने होत नाही, कारण आत्मस्वरूप तर्काच्याही अतीत आहे. वेदान्तशास्त्राचे खंडन तर्काच्या
साहाय्याने करता येत नाही, कारण अनेक प्रकारचे तर्क आहेत, युक्तिवाद आहेत. दोन तार्किक एकत्र आले की, एकजण दुसऱ्याच्या
तर्काचे खंडन करतो, दुसरा तिसऱ्याचे खंडन करतो. आत्मस्वरूपाविषयी अनेक मते, मतप्रणाली, वाद
आहेत. प्रत्येकजण माझेच कसे खरे आहे, हे
सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. या सर्व वादांच्यामधून
आत्मवस्तूची सिद्धि होत नाही. आचार्य
म्हणतात – वादे वादे तत्त्वबोधः न जायते | तर्क-वितर्क-कुतर्क करणाऱ्या लोकांना कधीही आत्मज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त
होत नाही. त्यांना यथार्थ व सम्यक् ज्ञान प्राप्त होत नाही.
म्हणून पंडित, विद्वान पुरुषाने सुद्धा
स्वतंत्रपणे, स्वबुद्धीला प्रमाण मानून ब्रह्मविचार करू नये. स्वबुद्धीने कितीही तर्क केले, कल्पना
केल्या, तौलनिक अभ्यास केला तरीही ज्ञानाची प्रगल्भता व स्पष्टता प्राप्त होत
नाही. स्वअभ्यासाने थोडेफार
समजल्यासारखे वाटेल. माहितीवजा ज्ञान
मिळेल. परंतु आत्म्याची माहिती म्हणजे
आत्मज्ञान नव्हे. आचार्यांच्या कृपेशिवाय,
अनुग्रहाशिवाय आत्मज्ञान मिळणे अशक्य आहे.
- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०११
- Reference: "Kathopanishad" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011
- हरी ॐ–