कारणब्रह्माच्या उपासनेने उपासक कार्याचा लय
करतो. त्यामुळे – दुःखअभावात् | त्याला कोणत्याही प्रकारच्या
दुःखांचा अनुभव येत नाही, कारण त्यावेळी त्याच्या मनाची पूर्णतः निर्विचार स्थिति,
लयावस्था असते. त्यामुळे या उपासनेने
उपासक जास्तीत जास्त अव्यक्तावस्थेपर्यंत जाऊ शकतो. इतकेच नव्हे, तर ब्रह्माजीच्या स्थानापर्यंत
सुद्धा तो जाऊ शकतो. परंतु ही उपासना
करीत असताना जर अधिकारित्व कमी पडले किंवा उपासनेमध्ये काही उणीव राहिली तर त्या
सर्वश्रेष्ठ स्थानापासून च्युत होण्याचीच अधिक शक्यता असते.
समजा, आपण गृहीत धरले की, एखादा अत्यंत परमश्रेष्ठ
उपासक दीर्घकाळ सातत्याने ही उपासना करून ब्रह्मलोकापर्यंत पोहोचला, तरी सुद्धा
त्याला दीर्घकाळ ब्रह्माजीबरोबर क्रममुक्ति मिळते. परंतु इतका भयंकर असणारा काळ की, ज्याची आपण
कल्पनाही करू शकत नाही, गणितही मांडू शकत नाही, इतका काळ कोणत्याही कारणाने च्युत
न होता तो अत्यंत दृढ राहिला पाहिजे.
परंतु ही गोष्ट खूप अशक्य कोटीतील वाटते,
कारण आपल्या चित्ताचा स्वभावच सतत अधोगामी होण्याचा आहे. शास्त्राच्या भाषेत सांगावयाचे झाले तर आपले
चित्त सतत कार्यब्रह्मामध्येच रममाण होते. म्हणजेच दृश्य, नामरूपात्मक विश्वामध्ये, विषयांच्यामध्येच
आसक्त होते. यामुळेच कारणब्रह्माची उपासना
ही अत्यंत कठीण आहे.
म्हणूनच भाष्यकार येथे सूचित करतात की, या
क्रममुक्तीच्या मार्गाने जाण्यापेक्षा, कारणब्रह्माची उपासना करण्यापेक्षा साधकाने
कारणब्रह्माच्याही अतीत असणारे जे कार्य-कारणाचेही अधिष्ठान चैतन्यस्वरूप आहे,
त्या चैतन्यस्वरूपाच्या प्राप्तीसाठी मनापासून प्रयत्न केला, सातत्याने साधना केली
तर याच जन्मामध्ये – याचि देहि याचि डोळां | त्या स्वरूपाची प्राप्ति होऊ शकते. यालाच ‘सद्योमुक्ति’ असे म्हणतात. किंवा यालाच ‘जीवनमुक्तावस्था’ असे म्हटले आहे. ज्या क्षणी अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाचा उदय
होतो, त्याचक्षणी युगपत् अविद्येचा ध्वंस होऊन अविद्येचे कार्य असणाऱ्या संपूर्ण संसाराचा ध्वंस होतो आणि जीव
स्वतःच परब्रह्मस्वरूप, चैतन्यस्वरूप, आनंदस्वरूप होतो.
-
"ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "Ishavasya
Upanishad" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
- हरी ॐ–