कर्मयोगाच्या अनुष्ठानाशिवाय पारमार्थिक
संन्यास किंवा विद्वत्संन्यास प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे. अपरिपक्व मनाने जर विषयांचा केवळ शरीराने
त्याग केला तर तो त्याग सुखाला कारण न होता दुःखालाच कारण होतो. शास्त्रश्रवण करीत असताना मनामधील रागद्वेष,
पूर्वीचे संस्कार, कामक्रोधादि विकार उफाळून बाहेर येतात. मग शास्त्रश्रवण राहते बाजूला आणि नको त्या विषयांच्यामध्ये
मन अडकून राहते. बाहेरच्या गोष्टींना
महत्व दिले की, शास्त्राला दिलेले महत्व कमी होते. मग साधकाच्या हातून प्रमाद घडू लागतात.
परमपूज्य हरिहर तीर्थाजी महाराज याविषयी फार
सुंदर सांगत असत. त्यांच्या आश्रमात अनेक
ब्रह्मचारी साधक होते. एक दिवस महाराजजींच्याकडे
एक साधक आला आणि म्हणाला की, “महाराजजी ! आजकल
आश्रम में भोजन अच्छा नहीं बन रहा है | आप रसोईघर में सूचना देंगे तो
अच्छा होगा |” महाराजजी त्याला फक्त “ठीक है |” असे
म्हणाले. दोन दिवसांनी तो पुन्हा आला व
म्हणाला – “महाराजजी, पहले तो भोजन थोडा ठीक था | अभी और
भी बिगड़ गया है |” त्यावेळी महाराजजींनी त्या ब्रह्मचारी शिष्याला सांगितले की, “भगवन् ! यह आपका स्थान नहीं है | अगर आपको रोज स्वादिष्ट भोजन
पाना हो तो आप गृहस्थाश्रम स्वीकार कीजिए | अच्छी लड़की के साथ ब्याह कीजिए
और आराम से रहिये |”
याचा अर्थच साधक सर्वसंगपरित्याग करून
आश्रमात राहिला तरी त्याचे मन कसे आहे, यावरच ज्ञान अवलंबून आहे. आश्रमात इकडे काय चालले, तिकडे काय चालले ? या आश्रमात काय आहे ? त्या आश्रमात काय आहे ? अशी स्थूल, प्राकृत, बहिर्मुख प्रवृत्ति असेल तर
वर्षानुवर्षे साधक केवळ शरीराने आश्रमात राहील, वेष बदलेल. परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये अनेक विषयांच्या
कामना, भोगवासना थैमान घालतील. एका
बाजूला बहिरंगाने तो श्रवण करेल, सेवा करेल, परंतु त्या श्रवणाचे त्याला फळ
प्राप्त होणार नाही. थोडक्यात शास्त्र-उपदेश-गुरु
यांचा दोष नाही. तर जोपर्यंत मनामध्ये
अन्य विषयांना महत्त्व दिलेले आहे, अंतःकरणामध्ये तीव्र वैराग्याचा उदय झालेला
नाही तोपर्यंत श्रवणामध्ये अनेक प्रकारचे प्रतिबंध निर्माण होतात.
- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०११
- Reference: "Kathopanishad" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011
- हरी ॐ–