Tuesday, June 8, 2021

बुद्धीची खरी कसोटी | Real Test of Wisdom

 


श्रेयस् प्रेयस् हे दोन्हीही मार्ग अनुसरण करण्यामध्ये पुरुषाला इच्छास्वातंत्र्य आहे.  खरे तर बुद्धिमान मनुष्याने अधोगामी, अंधारमय, दुःखस्वरूप असणाऱ्या प्रेयस् मार्गाचा त्याग करून ऊर्ध्वगामी, प्रकाशमय मोक्षरूप श्रेयस् मार्गाचा स्वीकार करावयास हवा.  परंतु बहुतांशी लोक प्रेयस् मार्गालाच निवडतात.  असे का ?  मनुष्य चांगला मार्ग सोडून वाईट मार्गाच्यामागे का लागतो ?  

 

शास्त्रकार मनाची व्याख्या करतात – संकल्पविकल्पात्मकं मनः |  संकल्प-विकल्प निर्माण करणे, हेच मनाचे कार्य आहे.  परंतु काय योग्य व काय अयोग्य, हे ठरविण्याचे निर्णयस्वातंत्र्य बुद्धीला दिलेले आहे.  निश्चयात्मिका निर्णयात्मिका अंतःकरणवृत्ति: इति बुद्धिः |  जी जीवनामध्ये योग्यायोग्याचा विचार करून निर्णय घेते, त्या अंतःकरणवृत्तीला बुद्धि असे म्हणतात.  सदसद्विवेकबुद्धीच्या साहाय्याने योग्य निर्णय घेऊन मनुष्याने जीवनामध्ये अधर्माचा, अनीतीचा त्याग करून धर्मामध्ये, नीतीमध्ये प्रवृत्त झाले पाहिजे.  हेच बुद्धीचे खरे कार्य आहे.  

 

व्यवहारामध्ये आपणही बुद्धीचा उपयोग करतो.  आपल्याला खूप बुद्धि आहे असे आपणास वाटते.  बुद्धिवादाच्या मोठमोठ्या गप्पा आपण मारतो.  दोनचार शाब्दिक कोट्या केल्या, सलग दहा वाक्ये एका श्वासात बोलली की, अन्य लोकांनाही वाटते की, आपण बुद्धिमान आहोत.  परंतु आपण फक्त व्यवहारकुशलज्ञ आहोत.  संपूर्ण विश्वाचे ज्ञान घेतो.  कोणत्याही विषयावर तासन्तास उत्कृष्ट बोलतो; परंतु आचार्य येथे सांगतात की – साधनतः फलतः च मन्दबुद्धीनाम् |  साधन व फळ, म्हणजेच साध्य यांचा विचार करण्यामध्ये मात्र मनुष्य मंदबुद्धि आहे.  

 

आपल्या जीवनाचे खरे साध्य, ध्येय काय आहे ?  आणि त्या ध्येयप्राप्तीसाठी योग्य साधन काय आहे, याचा विचार करण्याविषयी आपली बुद्धि मंद आहे.  यामुळेच मनुष्यासमोर श्रेयस् प्रेयस् हे दोन मार्ग एकत्र होऊन, मिश्रित स्वरूपाने येतात.  म्हणूनच तेथेच खरी मनुष्याची परीक्षा आहे.  पुरुषार्थ आहे.  दोन भिन्न मार्ग स्पष्टपणे समोर आले तर निवडणे सोपे आहे.  तेथे विशेष बुद्धि चालविण्याची गरज नाही.  परंतु हे दोन्हीही मार्ग मिश्र स्वरूपाने आल्यानंतर विवेकाच्या साहाय्याने ते एकमेकांच्यापासून भिन्न केले पाहिजे.  


 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011- हरी ॐ