Tuesday, June 15, 2021

आत्मज्ञान आणि इतर ज्ञान | Self-Knowledge & Outward Knowledge

 



बहुतांशी लोकांना आत्मस्वरूपाचे ज्ञान श्रवण करायलाच मिळत नाही.  आत्मज्ञानाचे श्रवण करावे, ही इच्छाच त्यांच्या मनामध्ये निर्माण होत नाही.  आत्मज्ञानाव्यतिरिक्त जे जे काही आहे, ते सर्व श्रवण करतात.  त्यामध्ये मन तल्लीन होते, कारण त्या श्रवणाने काहीतरी दृश्य फळ प्राप्त होते.  

 

आत्मज्ञानाव्यतिरिक्त असणाऱ्या अनात्म्याच्या ज्ञानाने कोणत्यातरी दृश्य फळाची प्राप्ति होते.  मग ते व्यावहारिक कोणतेही ज्ञान असो.  भौतिकशास्त्र असो, रसायन, जीव, गणित, खगोल, ज्योतिष, विज्ञान, मानस, अतींद्रिय मानस, संगणकज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान किंवा याव्यतिरिक्त असणाऱ्या ज्ञानशाखा असोत, कला असो, क्रीडा असो.  त्या सर्वांच्यामुळे मनुष्याला पैसा, संपत्ति, ऐश्वर्य, समृद्धी, भरभराट, यश, प्रतिष्ठा, कीर्ति, नावलौकिक, सत्ता, उपभोग या गोष्टी प्राप्त होतात.  वेगवेगळ्या पदव्या, पुरस्कार प्राप्त होतात.  म्हणून मनुष्य या सर्वांच्या मागे लागतो.  

 

याउलट, आत्मज्ञानाचे फळ मात्र दृश्य नाही.  वेदांच्यामध्ये कोठेही आत्मज्ञानाचे दृश्य, ऐहिक फळ सांगितलेले नाही.  ऐहिक भोग हे आत्मविद्येचे प्रयोजनच नाही.  मग यामधून काही मिळणारच नसेल तर मग विनाकारण का बरे आत्मज्ञान घेऊ ?  अशी वृत्ति निर्माण होते.  इतकेच नव्हे तर आत्मविद्येने सिद्धि, चमत्कार, एका क्षणात आत्मसाक्षात्कार असेही फळ प्राप्त होत नाही.  म्हणूनच सर्व लोक अध्यात्माच्या बहिरंगालाच भुलतात.  तथाकथित स्वतःला अध्यात्मवादी म्हणवून घेणारे लोक स्वार्थापोटी, प्रसिद्धीच्या इच्छेने अध्यात्माचा जो अवडंबर माजवितात त्यालाच समाजातील बहुतांशी लोक भुलून बळी पडतात व पारमार्थिक ज्ञानापासून, शास्त्रश्रवणापासून वंचित राहतात.  

 

अन्य व्यावहारिक ज्ञान घ्यावयाचे असेल तर तेथेही अर्जामध्ये पात्रता असा एक रकाना असतो.  त्याठिकाणी आपण आपले शिक्षण, पदवी, अनुभव वगैरे गोष्टी लिहितो.  पूर्वीच्या पात्रतेवरच पुढचे शिक्षण अवलंबून असते.  आध्यात्मिक ज्ञानामध्ये मात्र ज्ञान घेण्याचे साधन अंतःकरण आहे आणि ज्ञान होण्याचे स्थानही अंतःकरणच आहे.  त्यामुळे अंतःकरणाची पूर्वतयारी होणे आवश्यक आहे.  

 

 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011



- हरी ॐ