शास्त्र हे निरपेक्ष आहे. जसे आरशासमोर उभे राहिल्यानंतर आरसा आपल्याला
आपले जसे रूप आहे तसेच दाखवितो. मी आहे
त्यापेक्षा सुंदरही दाखवीत नाही किंवा मी आहे, त्यापेक्षा कुरूपही दाखवीत नाही. तसेच, शास्त्र आपणास आपले बहिरंग व अंतरंग जीवन
जसे आहे तसे उलगडून दाखविते. शास्त्रदर्पणामध्ये
पाहून मग साधकाने स्वतःमधील अनावश्यक भाग काढून टाकला पाहिजे. जे जे आपल्यामध्ये वाईट आहे, कुरूप आहे, ती सर्व
आसुरीगुणसंपत्ति काढून टाकली पाहिजे. इतकी
सोपी गोष्ट आहे.
परंतु दुर्दैवाने गुरूंच्या मुखामधून
ज्यावेळी साधक शास्त्राचे श्रवण करतो, त्यावेळी तो स्वतःच्या कल्पनांच्यामधून
शास्त्र पाहतो, त्यामुळे त्यामधील बराचसा भाग अमान्य करतो हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे शास्त्रश्रवण करीत असताना ज्यावेळी
काळजीपूर्वक ऐकल्यावर स्वतःमधील सर्व दोषच दिसायला लागतात, त्यावेळी मात्र तो सहन
करू शकत नाही. त्याला ते श्रवणही असह्य
होते. त्याचे मन स्वतःमधील दोषांना सामोरे
जाऊ शकत नाही. त्याचे मन शास्त्रश्रवणाने
शांत होण्याऐवजी उलट अधिक अशांत, उद्विग्न, क्षुब्ध, तर काही वेळेला निराश, भकास
होते. त्यावेळी साधक स्वतःमधील दोष
स्वीकार करून ते कमी करण्याऐवजी तो शास्त्राला, गुरूंना दोष देतो. वाट्टेल तशा प्रतिक्रिया व्यक्त करतो. खरोखरच, अशा लोकांसाठी शास्त्र लिहिलेलेच नाही.
हे शास्त्र कोणाला सांगितलेले आहे ? आचार्य फार सुंदर सांगतात. आचार्य म्हणतात –
तपोभिः क्षीणपापानां शान्तानां वीतरागिणाम् |
मुमुक्षूणामपेक्ष्योSयं आत्मबोधोSभिधीयते ||
(आत्मबोध)
ज्यांनी दीर्घकाळ तपश्चर्या करून,
इंद्रियमनावर संयमन करून आपली रागद्वेषात्मक कलुषितता क्षीण केली आहे, जे वीतरागी
शांत, वैराग्यसंपन्न झालेले आहेत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये तीव्र मुमुक्षुत्व
उदयाला आलेले आहे, अशा उत्तम अधिकाऱ्यांच्यासाठी आत्मज्ञान सांगितलेले आहे. आपल्या अंतःकरणामधील दोष कमी करून
अंतःकरण अधिकाधिक शुद्ध करणे, हीच खरी साधना आहे. ही अनेक जन्मांची साधना आहे.
- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०११
- Reference: "Kathopanishad" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011
- हरी ॐ–