जसे, दोरीमधून कल्पनेने – मायेने सर्प
निर्माण होतो, त्याचप्रमाणे परमात्म्यामधून मायेने या विश्वाची निर्मिती होते. म्हणजेच परमात्म्यामधून प्रत्यक्ष, वास्तविक,
सत्य विश्वाची निर्मिती झालेलीच नाही.
निर्मिती ही दोन प्रकारची असते. परिणाम व विवर्त हे निर्मितीचे दोन प्रकार आहेत.
शास्त्रकार व्याख्या करतात – स्वस्वरूपपरित्यागेन रूपान्तरपत्तिः
इति परिणामः |
स्वस्वरूपअपरित्यागेन रूपान्तरपत्तिः इति विवर्तः
||
स्वस्वरूपाचा पूर्णतः त्याग होऊन एका
पदार्थाचे दुसऱ्या पदार्थामध्ये रूपांतर होणे, या निर्मितीच्या प्रकाराला ‘परिणाम’
असे म्हणतात. उदा. दुधापासून दही बनणे,
दह्यापासून ताक, ताकापासून लोणी, लोण्यापासून तुप निर्माण होणे, हे याचे उत्तम उदाहरण आहे. यामध्ये
पहिल्या मूळ पदार्थाचा पूर्णतः नाश होऊन दुसरा नवीन पदार्थ निर्माण होतो. म्हणून दुधापासून दह्याच्या निर्मितीला ‘परिणाम’
असे म्हणतात.
यानंतर दुसऱ्या निर्मितीला ‘विवर्त’ असे
म्हणतात. राज्जुमधून सर्पाची निर्मिती, हे
याचे उत्कृष्ठ उदाहरण आहे. येथे रज्जुमधून
सर्पाची निर्मिती होत असताना रज्जूच्या मूळ स्वरूपामध्ये कोणताही बदल, विकार,
परिणाम न होता सापाची निर्मिती होते. म्हणूनच
हा साप वास्तविक स्वरूपाने अस्तित्वात नसून तो कल्पित, मिथ्या, असत् स्वरूपाचा असतो. असा हा सर्प मायेमधून, कल्पनेमधून निर्माण
झाल्यामुळे त्यास रज्जूचा ‘विवर्त’ असे म्हणतात. हा सर्प भासात्मक, अध्यस्त असून रज्जु हे त्याचे
अधिष्ठान आहे. त्यामुळे या कल्पित
सापाची निर्मिती झाली किंवा रज्जूच्या ज्ञानाने या कल्पित सापाचा निरास झाला तरी
अधिष्ठानस्वरूप राज्जुमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही.
याप्रमाणेच निर्गुण-निर्विशेष-निरुपाधिक-निर्विकार
परमात्म्यामधून त्रिगुणात्मक मायेच्या साहाय्याने विश्वनिर्मिती होते. मात्र परमात्मस्वरूपामध्ये कोणताही विकार होत
नाही. म्हणूनच विश्वाची निर्मिती म्हणजेच
परब्रह्माचे विवर्त आहे. परब्रह्मामध्ये
झालेला अध्यास, भास आहे व परब्रह्म हे या संपूर्ण मायाकार्याचे, अध्यासाचे
अधिष्ठान आहे.
- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, डिसेंबर २०१६
- Reference: "Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand
Saraswati, 1st Edition, December 2016
- हरी ॐ–