Tuesday, September 29, 2020

आत्मा कोठे वसतो ? | Where is the “Supreme Self”

 


परमात्मस्वरूपाने चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त केलेले आहे.  याप्रमाणे जे स्वरूप प्रत्येक बोधामध्ये, प्रत्येक वृत्तीमध्ये जाणले जाते, तेच आत्मचैतन्यस्वरूप आहे.  ज्यावेळी साधक याप्रकारे प्रत्येक बोधामधून आत्मचैतन्यस्वरूपाचे ज्ञान घेईल, त्याचवेळी त्यास आत्मस्वरूपाचे यथार्थ दर्शन होऊ शकेल.  तेच आत्म्याचे यथार्थ व सम्यक् ज्ञान आहे.  याचे कारण ‘आत्मा’ म्हणजे एखाद्या विशिष्ट स्थानामध्येच किंवा विशिष्ट काळामध्येच अनुभवायला येणारी वस्तु नसून ती सर्वदा, सर्वत्र, सर्व ठिकाणी अखंडपणे व सर्व वस्तूंच्यामध्ये अनुस्यूत असणारी ‘आत्मवस्तु’ आहे.  

 

‘आत्मा’ हा घटादिवत् पाहण्याची वस्तु नाही.  म्हणून घटाच्या अनुभवाप्रमाणे कोणालाही आत्म्याचा अनुभव येउच शकत नाही.  आत्मस्वरूप हे विशिष्ट स्थानात किंवा वस्तुमध्ये नसून सर्व वस्तूंच्यामध्ये सत्तास्वरूपाने अनुस्यूत आहे.  तेच आत्म्याचे खरे दर्शन आहे.  आत्मा हा कोणत्याही वस्तूने किंवा उपाधीने बद्ध, मर्यादित किंवा परिच्छिन्न होत नाही.  जे चैतन्य माझ्यामध्ये आहे, तेच अन्य उपाधीमध्ये, सर्व भूतमात्रांच्यामध्ये अनुस्यूत आहे.  भगवान म्हणतात – वासुदेवः सर्वमिति |  हे सर्व विश्वच वासुदेवस्वरूप आहे.  

 

विद्याविनयसंपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा व चांडाल अशा सर्व प्राणिमात्रांच्यामध्ये ज्ञानी पुरुष समदर्शी असतात. ही समत्वाची, एकत्वाची व ज्ञानाची दृष्टि आहे.  जसे, एकाच सोन्यामधून नानाविविध अलंकार निर्माण होतात.  सामान्य मनुष्य विविध अलंकार पाहतो, परंतु तत्त्वदर्शी सोनार मात्र त्या अलंकाराच्या आत असणारे सोने पाहतो.  

 

त्याप्रमाणेच आत्मज्ञानी पुरुषाला यथार्थ व सम्यक आत्मदर्शन होते.  त्याचेच वर्णन श्रुतीने येथे – प्रतिबोधविदितं ... |  यामधून केलेले आहे.  सर्व बुद्धिवृत्तींच्यामधून साक्षीरूपाने, प्रकाशस्वरूपाने लक्षित होणारे तत्त्व, तेच आत्मचैतन्यस्वरूप आहे.  आत्मचैतन्याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी याशिवाय दुसरा कोणताही उपाय अथवा मार्ग नाही.  तेच आत्म्याचे सम्यक् दर्शन आहे.         

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013


- हरी ॐ