Tuesday, September 15, 2020

ज्ञानाचे चार प्रकार | 4 Types of Knowledge

 


एक प्राचीन कथा आहे.  एकदा असुरराज विरोचन व देवराज इंद्र ब्रह्माजीकडे ज्ञानग्रहणासाठी गेले.  दोघांनाही सांगितले गेले की, “या नेत्रांच्यामध्ये जो पुरुष दिसत आहे, तोच आत्मा आहे.  तो आत्मा अमर, अभय असून तेच परब्रह्मस्वरूप आहे.”  असे ब्रह्माजीने सांगितल्यानंतर प्रजापतीचा पुत्र, असुरांचा राजा विरोचन हा विद्वान, बुद्धिमान असूनही त्याने आपल्या स्वभावदोषानुसार वरील विधानाचा विपरीत, युक्तिविसंगत अर्थ काढला.  विरोचनाने “शरीर हाच आत्मा आहे”, असा विपरीत अर्थ काढला.

 

देवराज इंद्राने पुन्हा-पुन्हा हे वाक्य ऐकूनही त्यास त्याचा गूढार्थ समजला नाही.  तेव्हा त्याने प्रथम आपल्या अंतःकरणाचे निरीक्षण केले व अंतःकरणामधील कामक्रोधादि विकार, चंचलता, अस्थिरता तसेच अहंकार ममकारादि प्रत्यय नाहीसे केले.  मन शुद्ध, सात्विक व अंतर्मुख करून पुन्हा चौथ्या वेळेस त्याच वाक्याचे श्रवण केले.  त्यावेळी त्याला त्या वाक्याचे यथार्थ ज्ञान झाले.  आत्मा हाच ब्रह्मस्वरूप असून ब्रह्मस्वरूप हे अमर व अभय आहे, हे त्याला समजले.

 

आपण व्यवहारामध्ये सुद्धा पाहतो की, एकाच गुरूंच्याकडून शिकलेल्या शिष्यांच्यापैकी एखादा शिष्य यथार्थपणे जाणतो, एखादा अयथार्थपणे जाणतो, एखादा विपरीतपणे जाणतो, तर एखादा जाणतच नाही.  येथे आचार्य ज्ञानाचे चार प्रकार सांगत आहेत.  

१. कश्चित् यथावत् प्रतिपद्यतेज्ञेय वस्तु जशी आहे, तसे बरहुकुम ज्ञान होणे, यास “यथार्थ ज्ञान” असे म्हणतात.

. कश्चित् अयथावत् प्रतिपद्यते काही वेळेस आपण म्हणतो की, थोडे समजले, थोडे समजले नाही. याला “अयथार्थ ज्ञान” म्हणतात.  

. कश्चित् विपरीतं प्रतिपद्यते काही वेळेस बरोबर उलटे, विपरीत ज्ञान होते.  ज्ञेय वस्तु जशी आहे, तसे ज्ञान न होता तेथे दुसऱ्याच वस्तूचे ज्ञान होते.  याला “विपरीत ज्ञान” असे म्हणतात.  

. कश्चित् न प्रतिपद्यते - काही वेळेस कशाचेही ज्ञान होत नाही.  जसे गडद अंधारामध्ये आपल्याला काहीही दिसत नाही.  किंवा गाढ सुषुप्ति अवस्थेमध्ये आपल्याला काहीही समजत नाही.  यालाच “अज्ञान” असे म्हणतात.  

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013


- हरी ॐ