व्यवहारामध्ये ज्ञान घेण्यासाठी १.
प्रत्यक्ष, २. अनुमान, ३. उपमान, ४. अर्थापत्ति व ५. अनुपलब्धि अशी पाच प्रमाणे
आहेत. या पाचही प्रमाणांच्या द्वारे
दृश्य, इंद्रियगोचर विषयांचे ज्ञान होते. विश्वामधील कितीही सूक्ष्म, अतिसूक्ष्म वस्तु
असेल तरी तिचे ज्ञान होऊ शकते. कारण त्या
वस्तूला निश्चित dimension असते. अणु, रेणु, परमाणु, इलेक्ट्रोन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रोन्स
इतकेच नव्हे तर शास्त्रज्ञांनी नुकताच शोध लावलेल्या “देवकणाला” (God particle) सुद्धा dimension आहे. त्यामुळे ते सर्व पदार्थ कोणत्या
ना कोणत्या तरी प्रमाणाच्या साहाय्याने जाणता येतात, कारण विश्वामधील यच्चयावत
सर्व पदार्थ निर्मित कार्य असून इंद्रियगोचर आहेत.
परंतु आत्मचैतन्यस्वरूप मात्र इंद्रियअगोचर असल्यामुळे
ते या पाचही प्रमाणांचा विषय होत नाही. आत्मस्वरूप
हे नामरूपरंगगुणधर्मजातिरहित आहे. आत्म्याला
कोणतेही dimension नाही. म्हणून जोपर्यंत आपण आत्म्याला पाहण्याचा,
जाणण्याचा विषय करतो किंवा असा-असा आत्मा आहे, अशा कल्पना करतोय, तोपर्यंत आत्मस्वरूपाचे
ज्ञान होणे शक्य नाही.
विश्वामध्ये दोनच प्रकारचे विषय आहेत. १.
द्रष्टा - subject, २. दृश्य - object. संपूर्ण विश्व, विषय हे दृश्य असून त्यांना पाहणारा
द्रष्टा ‘मी’ आत्मा आहे. विज्ञानाच्या सिद्धान्ताप्रमाणे
सुद्धा द्रष्टा हा दृश्याला पाहू शकतो. परंतु दृश्याच्या साहाय्याने कधीही द्रष्ट्याला
पाहता येत नाही. म्हणून द्रष्ट्याचे
म्हणजेच आत्म्याचे ज्ञान हे कधीही प्रत्यक्षादि प्रमाणांच्या साहाय्याने प्राप्त
होत नाही. म्हणून आत्मस्वरूपाला “अप्रमेय”
असे म्हटले जाते.
मग याठिकाणी शंका येईल की, कोणत्याही
प्रमाणाने जर आत्मस्वरूपाचे ज्ञान होत नसेल तर मग आत्मज्ञान होणार कसे ? यासाठीच आचार्य येथे सांगतात – आगमेन तु
शक्यते | आत्मस्वरूपाचे ज्ञान “आगम”
प्रमाणाने म्हणजेच “शब्द” प्रमाणाने होते. शब्दप्रमाण म्हणजे वेदान्तशास्त्र होय. आचार्य म्हणतात – वेदान्तो
नाम उपनिषत् प्रमाणम् | (वेदान्तसार)
आत्मतत्त्वाचे ज्ञान ग्रहण करण्यासाठी
वेदान्त म्हणजेच उपनिषदे हेच प्रमाणभूत शास्त्र आहे.
- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013
- Reference: "Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013
- हरी ॐ–