Tuesday, September 22, 2020

ब्रह्मज्ञानी आणि भ्रम-ज्ञानी | Knowers and Pretenders

 


ज्याला ब्रह्म अविज्ञात अविदित आहे, त्यालाच ते ब्रह्मस्वरूप निश्चितपणे समजले आहे.  तसेच, जो म्हणतो की, मी ब्रह्मस्वरूप निश्चितपणे जाणले आहे, तो ब्रह्मस्वरूपाला जाणत नाही.  या दोन विधानांच्यामधून श्रुति विद्वान व अविद्वान म्हणजेच ज्ञानी व अज्ञानी असे दोन पक्ष स्पष्ट करून त्यांच्यामधील भेद सांगते.

 

यामधील पहिला पक्ष ब्रह्मज्ञानी पुरुषांचा आहे.  ब्रह्मज्ञानी पुरुष म्हणतात की, “मला ब्रह्मस्वरूप समजले नाही”.  याचे कारण ब्रह्मस्वरूप हे इंद्रिय-मन-बुद्धि वगैरेदि उपाधींचा विषय होत नाही.  व्यवहारामध्ये आपण दृश्य विषयांचे ज्ञान प्राप्त करतो.  हा घट, हा वृक्ष, याप्रकारे आपणास सर्व इंद्रियगोचर विषयांचे ज्ञान प्राप्त होते.  परंतु ब्रह्मस्वरूपाचे मात्र “हे ब्रह्म” याप्रकारे ज्ञान होत नाही.  यामुळे ब्रह्मज्ञानी पुरुष म्हणतात की, “आम्हाला ब्रह्म समजले नाही.”  

 

याउलट दुसरा पक्ष आहे – विज्ञातं अविजानताम् |  जे लोक अज्ञानी आहेत, जे खऱ्या स्वरूपाने आत्मस्वरूप जाणत नाहीत, तर फक्त जाणण्याचा भास निर्माण करतात, तेच म्हणतात की, आम्हास ब्रह्मस्वरूप समजलेले आहे.  असे हे अज्ञानी लोक असम्यक्दर्शी आहेत.  ते लोक इंद्रिय-मन-बुद्धि-शरीर या अनात्मउपाधीमध्येच आत्म्याला पाहतात.  ते पुरुष अज्ञानाने अनात्मउपाधीशी तादात्म्य पावतात.  

 

जे लोक इंद्रियमनबुद्धि या उपाधीमध्येच आत्मस्वरूप पाहतात, ज्यांच्यामध्ये यथार्थ, सम्यक् ब्रह्मज्ञानाचा अभाव आहे, असेच लोक बुद्ध्यादि उपाधि विदित झाल्यामुळे, आपल्याला ब्रह्मस्वरूपच विदित झाले, असा भ्रम निर्माण करतात.  ब्रह्म हे जाणणाऱ्या लोकांना अज्ञात आहे व न जाणणाऱ्या लोकांना ज्ञात आहे.  याचे कारण एकच – ब्रह्मोपाधिविवेकानुपलम्भात् |  साधकाच्या अंतःकरणामध्ये शास्त्राचे श्रवण करूनही सहजासहजी ब्रह्मविवेक उदयाला येत नाही.  ब्रह्मचिंतन होत नाही किंवा ब्रह्माकार वृत्ति उदयाला येत नाही.  विषयांचे चिंतन मात्र सहजासहजी होते.  त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत.  ब्रह्माकार वृत्ति किंवा आत्माकार उदयाला यावयाची असेल तर साधकाने युक्तीच्या साहाय्याने आत्मानात्मविवेक करणे आवश्यक आहे.  

     

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013


- हरी ॐ