Tuesday, October 6, 2020

अनात्मउपाधीचा निरास | Knowledge by Elimination of Non-Self

 



आचार्य सांगतात की, आत्म्याला जाणण्याची किंवा आत्म्याचे ज्ञान घेण्याची आवश्यकताच नाही, कारण आत्मा हा संवेदनस्वरूपत्वात् |  स्वतःच संवेदनस्वरूप, ज्ञानस्वरूप आहे.  त्यामुळे त्याला दुसऱ्या ज्ञानाची आवश्यकताच नाही.  ज्याप्रमाणे प्रकाशाला पाहण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकताच नाही.  सूर्याला पाहण्यासाठी टॉर्चची गरज नाही.  तसेच ज्ञानस्वरूप आत्म्याला दुसऱ्या ज्ञानाची, प्रकाशाची आवश्यकता नाही.  

 

आत्मस्वरूप हे विदित व अविदित वस्तूंच्याही अतीत आहे.  जसे – सूर्य हा स्वयंप्रकाशस्वरूप आहे.  त्याच्या प्रकाशामध्येच संपूर्ण विश्व प्रकाशमान होते.  परंतु “सूर्य प्रकाशमान करतो” ही प्रकाशमान करण्याची क्रिया सुद्धा वस्तुतः सूर्यामध्ये संभवत नाही.  अंधाराच्या दृष्टीने आपण ‘प्रकाश’ हा शब्द वापरतो.  परंतु सूर्याच्या दृष्टीने अंधार व प्रकाश या दोन्हीही कल्पनाच आहेत.  सूर्य हा अंधार व प्रकाशाच्याही अतीत असून प्रकाशस्वरूप आहे.  सूर्य व प्रकाश या दोन भिन्न गोष्टी नाहीत तर प्रकाश हे सूर्याचेच स्वस्वरूप आहे.  

 

आत्मचैतन्यस्वरूप हे प्रकाशकांचेही प्रकाशक असून अंधाराच्याही अतीत आहे.  म्हणून आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किंवा आत्म्याच्या सिद्धीसाठी अन्य कोणत्याही प्रमाणाची आवश्यकता नाही.  वेदांतशास्त्र सुद्धा प्रत्यक्ष आत्म्याचे “हा आत्मा आहे”, याप्रकारे ज्ञान देत नाही.  “आत्मा काय आहे” हे न सांगता वेदांतशास्त्र “आत्मा काय नाही”, याचेच ज्ञान देते.  म्हणजेच वेदांतशास्त्र आत्म्यावर झालेल्या अध्यासाचा निरास करते.  

 

हा आत्मा नाही, हा आत्मा नाही, याप्रकारे श्रुति आत्म्याचे ज्ञान देतात.  म्हणजेच आत्मस्वरूपावर अनात्मा, शरीर-इंद्रिये-मन-बुद्धि-चित्त-अहंकार-अज्ञान या अनात्मउपाधीचा झालेला जो आरोप, त्या सर्व आरोपांचा श्रुति निरास करते.  म्हणजेच दृश्य असणाऱ्या विश्वाचा, नामरूपात्मक विषयांचा, समष्टी-व्यष्टीचा श्रुति निरास करते.  सर्वांचा निरास झाल्यानंतर अधिष्ठानस्वरूपाने राहते ते – आत्मचैतन्यस्वरूप होय.  म्हणून आत्मा हा वेदांताचा व वेदांचा सुद्धा ज्ञेय विषय होऊ शकत नाही.  कारण वेदांची निर्मिति सुद्धा परमात्म्यामधूनच झालेली आहे.  

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013


- हरी ॐ