सत्वगुणाच्या वर्धनासाठी शास्त्रकार दहा
घटकांचे अनुसरण करावयास सांगतात.
आगमोSपः प्रजा देशः कालः कर्म च जन्म च |
ध्यानं मन्त्रोSथ संस्कारः दशैते गुणहेतवः
|| (श्रीमद्भागवत ११-१३-४)
आगम (शास्त्र), आप (पाणी), प्रजा, देश, काळ,
कर्म, जन्म, ध्यान, मंत्र आणि संस्कार हे दहा घटक तिन्हीही गुणांचा उत्कर्ष
करण्यासाठी कारण होतात.
जीवनामध्ये आपला अनेक गोष्टींशी संपर्क होत
असतो. त्यामधून मनावर सुप्त संस्कार होत
असतात. प्रामुख्याने उपरोक्त सांगितलेल्या
दहा घटकांच्यामुळे तीन गुण वर्धन पावतात. म्हणून
राजोतमोगुणात्मक घटकांचा त्याग करून सात्विक आगमादि दहा घटकांचेच अनुसरण करावे.
त्यामुळे सत्वगुणाचा उत्कर्ष होऊन काया-वाचा-मनसा
अंतर्बाह्य शुद्धि होईल.
१. सात्विक
शास्त्र म्हणजेच निवृत्तिपर असणारे अध्यात्मशास्त्र होय.
२. सात्विक
पाणी म्हणजेच परमेश्वराचे अथवा गुरुचरणांचे तीर्थ होय.
३. सात्विक
प्रजा म्हणजे सज्जनांचा संग किंवा सत्संगति.
४. सात्विक
देश म्हणजे पवित्र, एकांत स्थान.
५. सात्विक
काळ म्हणजे पहाटे ३:३० नंतर सूर्योदयापर्यंतचा ब्राह्ममुहुर्त.
६. सात्विक
कर्म म्हणजेच निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान.
७. सात्विक
जन्म म्हणजेच गुरुपदेश अथवा उपनयन संस्कार.
८. सात्विक
ध्यान म्हणजेच परमेश्वराचे ध्यान.
९. सात्विक
मंत्र म्हणजेच गायत्री मंत्र किंवा प्रणवोपासना.
१०. सात्विक संस्कार म्हणजेच आत्मबोधाचा
संस्कार.
याप्रकारे सात्विक घटकांचेच अनुसरण
करावे. यामुळे भक्तिरूप धर्माचा उदय होऊन
आत्मज्ञानाची प्राप्ति होते आणि जन्ममृत्युयुक्त संसाराचा ध्वंस होतो. यालाच सत्वगुणाची उपासना असे म्हणतात. याप्रमाणे सत्वगुणाचा उत्कर्ष करणे ही सुद्धा
गुणउपासना आहे.
- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "Upasana" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 3rd Edition, July 2011
- Reference: "Upasana" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 3rd Edition, July 2011
- हरी ॐ–