Tuesday, February 18, 2020

अध्यात्मात चालणारा पाखंड | Fakeness in Spiritualism




अध्यात्ममार्गामध्ये प्रवेश केल्यानंतर पुष्कळसे लोक स्वतःच अध्यात्माच्या अनेक कल्पना करतात.  एखादा महात्मा किंवा श्रेष्ठ साधु, संत पाहिले, त्यांना मिळत असलेला मान-सन्मान पाहिला की, असे पूजनीयत्व व आदर आपणासही मिळावा, अशी स्वप्ने ठेवून अध्यात्ममार्ग स्वीकारतात.  साधु झाले की, सर्वजण नमस्कार करतात, बर्फी-पेढे, फळे-फुले समोर आणून ठेवतात, गळ्यात हार घालतात, श्रद्धा ठेवतात, सल्ला ऐकतात.  शिवाय उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटतो.  हिंडायला भक्तांच्या गाड्या मिळतात.  असे सर्व बहिरंग पाहून “ आपणही साधु व्हावे.  व्यवहार जमला नाही.  निदान अध्यात्म करून बघावे.  मग आपल्यालाही सर्वजण नमस्कार करतील.  आपणही दुसऱ्यांच्या समस्या सोडवू व मोठे होऊ ”.  अशी विचित्र व भयंकर स्वप्ने उराशी बाळगून लोक अध्यात्मामध्ये प्रवेश करतात.  

सद्य समाजामध्ये तर अध्यात्मात प्रवेश करणाऱ्या अशा लोकांच्यामध्ये तरुण पिढीचाही समावेश आहे.  दोन-चार आध्यात्मिक पुस्तके वाचून त्यांचे मर्कट वैराग्य उफाळून येते व ही मुले सर्वसंगपरित्याग करण्याची भाषा बोलतात. आध्यात्मिक ज्ञान कशासाठी घ्यावयाचे आहे ?  असे विचारले तर उत्तरही ठरलेले असते की, हे ज्ञान घेऊन समाजाचा, जगाचा उद्धार करावयाचा आहे.  अध्यात्ममार्गाबद्दल अशा खूप चुकीच्या कल्पना करून लोक बहिरंगाने जीवनामध्ये खूप बदल करतात.  परंतु त्यांच्या अंतरंगामध्ये विषयांच्या अनेक कामना व भोगवासना दडलेल्या असतात.  

या मानसन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या वासना स्वकर्तृत्वाने व्यावहारिक जीवनामध्ये त्यांना पूर्ण करता आल्या नाहीत तर असे लोक स्वार्थाने, अहंकाराने प्रेरित होऊन अध्यात्ममार्गामध्ये प्रवेश करतात व दांभिकतेचा आश्रय घेतात.  समाजाला फसवितात.  सामान्य, श्रद्धावान लोकांना फसवितात.  स्वतः साधक आहे, ब्रह्मचारी आहे, साधु आहे, असे भासवितात.  

परंतु दुर्दैवाने हे लोक सर्वात जास्त स्वतःलाच फसवीत असतात.  स्वतःचीच प्रतारणा करीत असतात.  बाहेरून रामनामाचा महिमा जगाला सांगतात.  हातात रुद्राक्षाची माळ धरतात.  परंतु त्यांचे स्वतःचे मन मात्र रामनामामध्ये तल्लीन, तन्मय होत नाही.  त्यांचे मन भोग, विषयासक्ति, अनेक विचार यांनी कलुषित, अशुद्ध असते.  यामुळे बहिरंगाने अध्यात्माचे आचरण करूनही अशा दांभिक पुरुषाला सुख व शांतीचा अनुभव येत नाही.  



- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ

No comments:

Post a Comment