Tuesday, February 11, 2020

गर्व आणि वस्तुस्थिति | False Pride & Reality
अभिमानाने प्रेरित झालेले जीवन जगत असताना जोपर्यंत सर्व सुरळीत चालते, सर्वकाही मनाप्रमाणे घडते, तोपर्यंत मनुष्याचा अहंकार, गर्व वाढतच जातो.  परंतु जेव्हा विपरीत घडायला लागते, अपेक्षाभंग होतो, तेव्हा मात्र मनुष्य उद्विग्न होतो.  आपण ठरवितो एक व घडते मात्र निराळेच !  नियतीने काहीतरी वेगळे ठरविले असते.  आपल्या मनाप्रमाणे फार क्वचितच घडते.  परंतु बाकी पुष्कळ वेळेला जीवन अपेक्षेपेक्षा वेगळेच दिसते.  आपण प्रयत्न करतो.  परिश्रम करतो.  परंतु त्याचे फळ विपरीत मिळते.  जीवनामध्ये असे संकटांचे प्रसंग एकामागून एक येत राहतात.  

अशा वेळी विचारी मनुष्य विचार करतो की, माझ्या जीवनात कोणतीतरी एक अज्ञात शक्ति आहे की, जी माझ्या जीवनावर नियमन करते.  म्हणूनच संकट आले की बुद्धिमान, नास्तिक माणसे सुद्धा ज्योतिषाकडे जातात.  आजकाल तरुण पिढीसुद्धा त्या अदृश्य, अज्ञान, अनाकलनीय शक्तीचे अस्तित्व मान्य करते.  ज्यावेळी मनुष्य जीवन जगतो, अनेक अपेक्षा करतो तेव्हा त्याने ईश्वरी सत्तेची जाणीव ठेवली पाहिजे.  संपूर्ण विश्वावर, सर्व प्राणिमात्रांच्यावर तसेच माझ्याही जीवनावर नियमन करणारी कोणीतरी एक अज्ञात शक्ति आहे, हे मान्य करावेच लागते.  आचार्य म्हणतात – “हे मनुष्या !  तू व्यर्थ चिंता का करतोस ?  या विश्वात तू मुख्य नाहीस.  तुझ्यावर नियमन करणारे कोणी नाही, असे तुला वाटते का ?  तू कोणत्या गर्वाने उन्मत्त झाला आहेस ?  थोडासा विचार कर.”  

ज्या परमेश्वराने या विश्वाला निर्माण केले, ज्याने सर्वांना जन्म दिला, तोच विश्वाची काळजी घेतो.  तोच विश्वाचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता आहे.  तोच विश्वाचे पालन-पोषण-वर्धन करतो.  तोच विश्वंभर आहे.  त्याच्याशिवाय झाडाचे पानही हालत नाही.  त्याच्याशिवाय पापण्यांची उघडझापही होऊ शकत नाही.  त्यानेच आपल्या सर्वांना जन्माला घातले.  जन्मल्यापासून या क्षणापर्यंत त्यानेच आपल्याला अन्न दिले, पाणी दिले, राहायला आकाश दिले, जिवंत राहण्यासाठी प्राणवायू दिला, आपल्याला इतकी सुंदर सृष्टि दिली.  त्याने वरून कधी याची बिले पाठविली नाहीत.  आपण कधीतरी विचार करतो का की, त्याची कृपा, करुणा किती अपरंपार आहे.  तो करुणेचा सागर आहे.  त्याच्या दयेला सीमा नाहीत.  त्याने निर्माण केलेल्या या जगड्व्याळ विश्वामध्ये माझे अस्तित्व अगदीच नगण्य आहे.  आपण एक यःकश्चित् क्षुद्र जीव आहोत.  अथांग सागरामधील एखाद्या थेंबाप्रमाणे आहोत.   - "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015- हरी ॐ

No comments:

Post a Comment