Friday, October 25, 2019

आत्म्याचा आरसा | The Mirror of Self





साधकाला ब्रह्मज्ञान घेण्यासाठी योग्य, निर्दोष असे यथार्थ प्रमाण आवश्यक आहे.  मग शंका येईल की, तत् किं प्रमाणम् ?“ते प्रमाण कोणते आहे ?”  शिष्याला आत्मज्ञान घ्यावयाची इच्छा आहे, स्वतःचेच ज्ञान घ्यावयाची इच्छा आहे.  पण तो स्वतःच स्वतःचे ज्ञान घेऊ शकत नाही.  बुद्धिमान मनुष्य अन्य प्रमाणांच्या साहाय्याने “मी” व्यतिरिक्त जे जे काही आहे, त्या संपूर्ण विश्वाचे ज्ञान घेतो, पण तो “मी” चे ज्ञान मात्र घेऊ शकत नाही.  त्याला स्वतःला स्वतःचे ज्ञान नाही.  

उदा.  माझा स्वतःचाच चेहरा माझ्या अत्यंत जवळ आहे.  परंतु दुर्दैवाने बाकी सर्व विश्व मी पाहातो, फक्त माझा चेहरा पाहू शकत नाही.  मला स्वतःचाच चेहरा पाहावयाचा असेल, तर त्यासाठी योग्य साधनाची आवश्यकता आहे.  भिंत समोर ठेवली, अन् त्यात “चेहरा पहा” असे म्हटले तर पाहाता येईल का ?  नाही, तर त्यासाठी योग्य, निर्दोष साधनाची – प्रमाणाची आवश्यकता आहे, आणि ते प्रमाण म्हणजेच “आरसा !”  आरशामध्ये मी माझा चेहरा पाहातो आणि पाहून मला समजते की, “मी असा-असा आहे.”  जसे आहे तसे आरशात दिसते.  आरशाचे काम एकच – जसे तुम्ही आहात, तसे बरहुकुम दाखविणे !  तुमचेच तुम्हाला दर्शन करवून देणे, हेच आरशाचे प्रयोजन आणि कार्य आहे.  म्हणून आरसा हे स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी प्रमाण आहे.  तसेच याठिकाणी सांगतात की, जर स्वतःच्या स्वरूपाचे ज्ञान घ्यावयाचे असेल, “मी” च्या स्वरूपाचे ज्ञान घ्यावयाचे असेल तर - किं प्रमाणम् ?  काय प्रमाण आहे ?  
शास्त्रकार सांगतात – वेदन्तो नाम उपनिषत् प्रमाणम् |          (वेदान्तसार)

वेदान्तशास्त्र हे एकच प्रमाण आहे.  त्यालाच उपनिषद असे म्हटले जाते.  उपनिषद हेच माझ्या स्वरूपाचे ज्ञान घेण्यासाठी योग्य असे यथार्थ साधन आहे.  अन्य कोणतेही साधन नाही.  शास्त्रकार याठिकाणी अन्य सर्व शास्त्रांचे, अन्य सर्व साधनांचे खंडन करतात.  अन्य सर्व साधने, अन्य सर्व व्यावहारिक ज्ञान बाह्य दृश्य विषयांचे ज्ञान देते.  परंतु स्वस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करावयाचे असेल, तर वेदान्तशास्त्र हेच अत्यंत प्रमाणभूत शास्त्र आहे.



- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ


Tuesday, October 22, 2019

गुरुशिष्यपरंपरा | Uninterrupted Knowledge Tradition





विश्वाच्या आरंभी असणारे चार वेद – ऋगवेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे सर्व वेद आणि वेदांच्यामधील ज्ञान आज मी अध्ययन करू शकत असेन तर “हे ज्ञान माझ्यापर्यंत कसे आले ?”  याचा विचार केला पाहिजे.  हे ज्ञान केवळ यंत्रवत् आलेले नाही.  या ज्ञानाला “श्रुति” म्हटले जाते.  श्रुति याचा अर्थ श्रवण होय.  फार प्राचीन काळी, युगायुगांचा पूर्वी लिहिण्याची – लेखनाची कला सुद्धा अवगत नव्हती.  अशा वेळी ऋषीमुनींना ध्यानावस्थेमध्ये स्फुरलेले मंत्र त्यांच्या शिष्यांनी श्रवण करून, ते स्मरण करून त्यांनी आपल्या शिष्यांना – प्रशिष्यांना अध्यापन केले.  

अशा प्रकारे या गुरुशिष्यपरंपरेने आजपर्यंत ही विद्या आपल्यापर्यंत आलेली आहे.  त्यातील एकही मंत्र विस्मृत न होता, त्या मंत्रामधील काहीही न गाळता आणि त्या मंत्रांच्यामध्ये स्वतःच्या बुद्धीने अधिक न घालता ते मूळ मंत्र आजपर्यंत आलेले आहेत.  लाखो-कोट्यावधी वर्ष गेल्यानंतर जर मी आजही ते ज्ञान विधिवत् गुरुशिष्यपरंपरेने घेत असेन तर त्याच्यामागे फार मोठा संप्रदाय आहे.  फार मोठी अलौकिक व अपूर्व परंपरा आहे.  म्हणूनच आपल्या संकृतीमध्ये गुरुशिष्यपरंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे.  

गुरुशिष्य परंपरा हा आपल्या संकृतीचा गाभा आहे.  म्हणूनच या परंपरेमध्ये अनेक शिष्टाचार व श्रेष्ठ आचारसंहिता आहे.  वेदांतशास्त्राचे अध्ययन करावयाचे असेल तर ती मान्य केलीच पाहिजे.  मी जर शास्त्रअध्ययन करीत असेन तर यामध्ये माझे स्वतःचे कर्तुत्व नाही.  मी भाग्यवान आहे की, या परंपरेमध्ये मला श्रवण करायला मिळते आहे.  श्रुति म्हणते –
श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्यः |                       (कठ. उप. १-२-७)  

हे शास्त्र शास्त्रशुद्ध श्रवण करायला मिळणे सुद्धा दुर्लभ आहे.  बाकी सर्व चिरीमिरी शास्त्र सांगणारे भरपूर आहेत आणि ऐकणारे ही भरपूर आहेत.  परंतु या परंपरेप्रमाणे शास्त्रशुद्ध अध्ययन हे अत्यंत दुर्लभ आणि दुर्मिळ आहे.  असे हे उपनिषद् ही जड असणारी विद्या नव्हे, तर श्रुति जणु काही माता आहे आणि ती सर्व अज्ञानी असणाऱ्या जीवांना हे ज्ञान प्रबोधन करते.  



- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ


Tuesday, October 15, 2019

“ॐ नमः शिवाय” – ७ | Meaning of Namah Shivay - 7




येथे नमः यात न आणि मः अशी दोन अक्षरे आहेत.  त्यातील नकारामधून निषेध दर्शविला आणि मः म्हणजेच – मासि - मस्यति म्हणजे मापन करणे.  ज्याप्रमाणे एखादा तराजू धान्याचे मापन करतो म्हणजेच धान्य स्वतःमध्ये ठेऊन तोलतो, मोजतो आणि मोजल्यानंतर बाहेर काढून टाकतो.  त्यानंतरच ते धान्य ग्राहकांना व्यवहारयोग्य होते.  मात्र तराजू स्वतःमध्ये धान्य ठेऊनही, धान्य मोजूनही स्वतः मात्र धान्यापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी, अविकारीस्वरूप राहतो.

मापनासाठी तराजू पाहिजे.  तसेच, मापनासाठी काहीतरी वस्तु पाहिजे.  मापनक्रियेमध्ये १) मापनासाठी मापनाच्या उपकरणात आपण मापनाची वस्तु घालतो.  २) तराजूचा एक भाग धान्याला आपल्यामध्ये सामावून घेतो.  ३) मापन केल्यानंतर मोजलेले धान्य बाहेर ओततो व परत मापनासाठी दुसरे नवीन धान्य घेतो.  या सगळ्या प्रक्रियेला मापन, मोजणे असे म्हणतात.  या सर्व प्रक्रियेमध्ये तराजू हा नित्य अलिप्त राहतो ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

त्याप्रमाणेच ईश्वरही या संपूर्ण विश्वाचे मापन करतो.  तो संपूर्ण विश्वाला प्रथम आपल्यामध्ये सामावून घेतो.  विश्वाला आधारभूत, अधिष्ठानभूत होतो.  जे बाहेरचे विश्व आहे, तेच तो आत घेतो.  म्हणजेच जे बाहेर व्यक्त, स्थूल आहे, तेच त्याच्यामध्ये आल्यानंतर सूक्ष्म, अव्यक्त होते.  म्हणजेच प्रलयावस्थेत तो सर्व विश्वाला सूक्ष्म रूपात धारण करतो व पुन्हा योग्य वेळी विश्वाला आतून बाहेर काढतो म्हणजेच सृष्टिरचनेच्या वेळी अव्यक्ताला व्यक्त करतो, सूक्ष्माला स्थूल करतो आणि विश्वनिर्मिती होते.  यालाच ‘मापन’ असे म्हणतात.  याप्रकारे हे भगवंता !  नमः यामधून तू संपूर्ण विश्वाचे मापन करतोस.



- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ




Tuesday, October 8, 2019

“ॐ नमः शिवाय” – ६ | Meaning of Namah Shivay - 6



‘शिव’ शब्दाचा आणखी एक अर्थ सांगतात.  हे विद्वान पुरुषांनो !  कारणब्रह्माला ‘शिव’ असे म्हणतात.  शिव शब्दाची व्याख्या याठिकाणी करतात – अस्मिन् सर्वं जगत् शेते इति शिवः |  ज्यामध्ये सर्व जग शयन करतात त्याला ‘शिव’ असे म्हटले आहे.  हे संपूर्ण विश्व प्रलयावस्थेमध्ये शिवामध्येच शयन करते. ‘शिव’ या पदामध्ये ‘शि’ आणि ‘व’ ही दोन अक्षरे आहेत.  ‘शि’ याचा अर्थच संपूर्ण जग प्रलयावस्थेत जेथे शयन करते, त्याला ‘शि’ असे म्हणतात. म्हणून ‘शि’ या अक्षरामधून अव्यक्त प्रकृति निर्देशित केलेली आहे.  ‘शि’ हे अक्षर मूळ प्रकृतिवाचक आहे आणि – वानात् वः शिवः इति उक्तम् |   त्या विश्वाला जो प्रेरणा देतो, त्याला ‘शिव’ असे म्हणतात.   

जे जग प्रलयावस्थेमध्ये, बीजावस्थेमध्ये, अव्यक्तावस्थेमध्ये राहते की, जे विश्व वाणीचा विषय आहे.  वाणी म्हणजे शब्द होय.  प्रत्येक शब्दामधून विश्वामधील एकेक एकेक विषय निर्देशित केला जातो.  म्हणून विश्व म्हणजेच नाम आणि रूप होय.  हे संपूर्ण विश्व स्थितिकालामध्ये इंद्रियांच्या माध्यमामधून अनुभवायला येते.

असे हे विश्व भू भुवः स्वः महः जनः तपः सत्यम् याप्रकारे सर्व त्रिभुवन म्हणजेच ऊर्ध्वलोक, अधोलोक आणि मर्त्यलोक असा हा संपूर्ण नामरूपात्मक दृश्य प्रपंच अनुभवाला येतो.  तन्मयं म्हणजे – प्रकृतिमयं इति |  हे संपूर्ण विश्व बीजावस्थेमध्ये तन्मय म्हणजेच प्रकृतिमय असते.  आणि नंतर तेच विश्व व्यक्त होते म्हणून प्रकृतीचा परिणाम, प्रकृतीचा विकार म्हणजेच हे दृश्य विश्व होय.  



- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ

Tuesday, October 1, 2019

“ॐ नमः शिवाय” – ५ | Meaning of Namah Shivay - 5



या श्लोकामध्ये ‘नमः’ या पदाचा आणखी एक अर्थ सांगतात.  नम् धातूला अच् प्रत्यय लावून ‘नमः’ हे पद तयार होते.  ‘नमः’ म्हणजेच प्रणामकर्ता उपासक होय.  नमति इति नमः |  जो नमस्कार करतो, प्रणाम करतो, तो ‘नमः’ होय.  म्हणून ‘नमः’ म्हणजेच प्रणाम करणारा, नमस्कार करणारा उपासक होय.  

यानंतर – जन्ता स्यात् जगदीश्वरे |  जन्ता यामध्ये ‘जम्’ हा धातु आहे.  जमु अदने |  ‘जम्’ म्हणजे भक्षण करणे, खाणे होय.  या धातुपासून ‘जन्ता’ हे पद तयार होते.  म्हणून जन्ता म्हणजे खाणारा, भक्षण करणारा होय.  जो संपूर्ण जगाला खातो, भक्षण करतो म्हणजेच जगाचा संहार करतो, त्यालाच ‘जन्ता’ असे म्हणतात.  म्हणून जन्ता म्हणजेच जगदीश्वर होय.  

“ हे देवदेवेशा !  तू या संपूर्ण सृष्टीचा संहारकर्ता असल्यामुळेच मी तुझा दास आहे आणि तू माझा स्वामी आहे.  म्हणून मी – ‘नमः’ मी तुझा उपासक आहे.  मी तुझ्या चरणांचा निश्चितपणे आश्रय घेतला आहे, तुला समर्पित झालो आहे, असे जाणून तू निश्चितपणे माझा उद्धार कर.  मला अभयदान देऊन या संपूर्ण भवसागरामधून पार करवून ने.” 

“ कारण जे जे तुला शरण येतात, त्या सर्व आश्रितांना अभयदान देऊन त्यांचा उद्धार करणे, हे तुझे कर्तव्य आहे.  म्हणून शरण आलेल्या मला तुझा दास समजून तू मला तुझ्या स्वरूपाजवळ घेऊन चल.  म्हणूनच मी तुला – जगदीश्वराला अनन्य भावाने शरण आलो आहे.  तूच या विश्वाचा नियामक, ईशनशील, अधिपति आहेस.  आणि मी मात्र नियम्य, तुझा एक यःकश्चित असणारा दास आहे.”  


- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ