विश्वाच्या
आरंभी असणारे चार वेद – ऋगवेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे सर्व वेद आणि
वेदांच्यामधील ज्ञान आज मी अध्ययन करू शकत असेन तर “हे ज्ञान माझ्यापर्यंत कसे आले
?” याचा विचार केला पाहिजे. हे ज्ञान केवळ यंत्रवत्
आलेले नाही. या ज्ञानाला
“श्रुति” म्हटले जाते. श्रुति याचा अर्थ
श्रवण होय. फार प्राचीन काळी, युगायुगांचा
पूर्वी लिहिण्याची – लेखनाची कला सुद्धा अवगत नव्हती. अशा वेळी ऋषीमुनींना ध्यानावस्थेमध्ये
स्फुरलेले मंत्र त्यांच्या शिष्यांनी श्रवण करून, ते स्मरण करून त्यांनी आपल्या
शिष्यांना – प्रशिष्यांना अध्यापन केले.
अशा
प्रकारे या गुरुशिष्यपरंपरेने आजपर्यंत ही विद्या आपल्यापर्यंत आलेली आहे. त्यातील एकही मंत्र विस्मृत न होता, त्या
मंत्रामधील काहीही न गाळता आणि त्या मंत्रांच्यामध्ये स्वतःच्या बुद्धीने अधिक न
घालता ते मूळ मंत्र आजपर्यंत आलेले आहेत. लाखो-कोट्यावधी
वर्ष गेल्यानंतर जर मी आजही ते ज्ञान विधिवत् गुरुशिष्यपरंपरेने घेत असेन तर त्याच्यामागे
फार मोठा संप्रदाय आहे. फार मोठी अलौकिक व
अपूर्व परंपरा आहे. म्हणूनच आपल्या
संकृतीमध्ये गुरुशिष्यपरंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे.
गुरुशिष्य
परंपरा हा आपल्या संकृतीचा गाभा आहे. म्हणूनच
या परंपरेमध्ये अनेक शिष्टाचार व श्रेष्ठ आचारसंहिता आहे. वेदांतशास्त्राचे अध्ययन करावयाचे असेल तर ती
मान्य केलीच पाहिजे. मी जर शास्त्रअध्ययन
करीत असेन तर यामध्ये माझे स्वतःचे कर्तुत्व नाही. मी भाग्यवान आहे की, या परंपरेमध्ये मला श्रवण
करायला मिळते आहे. श्रुति म्हणते –
श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्यः | (कठ.
उप. १-२-७)
हे
शास्त्र शास्त्रशुद्ध श्रवण करायला मिळणे सुद्धा दुर्लभ आहे. बाकी सर्व चिरीमिरी शास्त्र सांगणारे भरपूर
आहेत आणि ऐकणारे ही भरपूर आहेत. परंतु या
परंपरेप्रमाणे शास्त्रशुद्ध अध्ययन हे अत्यंत दुर्लभ आणि दुर्मिळ आहे. असे हे उपनिषद् ही जड असणारी विद्या नव्हे, तर श्रुति जणु काही माता आहे आणि ती सर्व अज्ञानी
असणाऱ्या जीवांना हे ज्ञान प्रबोधन करते.
- "मुण्डकोपनिषत्
" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती
लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007
- Reference: "Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007
-
हरी ॐ–
No comments:
Post a Comment