Tuesday, January 1, 2019

अक्षुद्रबुद्धि | Magnanimous Mind




क्षुद्र बुद्धि म्हणजे संकुचित बुद्धि होय.  अक्षुद्रबुद्धि म्हणजे विशाल मन होय.  शिष्याच्या अधिकारित्वामुळे गुरूंचे मन प्रसन्न होऊन ते शिष्यावर अहैतुक कृपा करून आपले सर्वस्व शिष्याला बहाल करतात.  वस्तुतः गुरु कधीच क्षुद्र बुद्धीचे नसतात.  गुरु एकच आहेत.  परंतु ज्ञान ग्रहण करणारा शिष्य क्षुद्र बुद्धीचा असेल तर गुरूंच्या ज्ञान देण्यासही आपोआप मर्यादा येतात.  

शास्त्राचे ज्ञान, शास्त्राची दिव्यता, भव्यता, गांभीर्य, प्रगल्भता, सखोलता प्राप्त होऊन ज्ञानाची विशाल दृष्टि प्राप्त करायची असेल तर शिष्याचे मन सुद्धा तितकेच अनुकूल, सामर्थ्यसंपन्न, प्रगल्भ, एकाग्र असले पाहिजे.  शिष्यच अनधिकारी असेल, त्याच्यामध्ये नम्रता, विनयशीलता, ज्ञानाविषयी तळमळ नसेल, तर त्याला ज्ञानही अर्धवटच प्राप्त होईल.  त्याच्या ज्ञानामध्ये संशय, शंका, विकल्प, संदिग्धता राहते.  केवळ ऐकायचे म्हणून तो ऐकतो.  गुरूंना कितीही इच्छा असेल तरीही शिष्याचे मन ज्ञान घेण्यास अनुकूल नसते.  

परंतु, एखादा शिष्य नचिकेतासारखा शिष्योत्तम असेल, नम्रता, विनयशीलता, अंतर्मुख, चिंतनशील वृत्ति, श्रद्धा, गुरुभक्ति, ज्ञानजिज्ञासा, वैराग्यवृत्ति इत्यादी गुणांनी संपन्न असेल तर गुरु त्यास भरभरून ज्ञान देतात.  त्याला काय शिकवावे आणि काय नको, असे त्यांना होऊन जाते.  आपले सर्व ज्ञानभांडार त्याच्यासाठी खुले करतात.  इतके त्यांचे मन उदार होते.  असे गुरु व असा शिष्य हे विश्वामधील महदाश्चर्य आहे.  असे गुरुही भाग्यवान आणि शिष्यही भाग्यवान आहे.  



- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011



- हरी ॐ



No comments:

Post a Comment