Tuesday, October 2, 2018

नात्यांची मर्यादा | Limitations of Relations




हे मनुष्य !  हे मूढमते !  ज्यांच्यामध्ये तू आसक्त होतोस त्यांचे स्वरूप तरी काय आहे, याचा विचार कर.  तुझी पत्नी कोण ?  तुझा पुत्र कोण ?  ज्या पत्नीला तू माझे-माझे म्हणतोस, जीवनभर तिच्यामध्ये आसक्त होऊन पत्नीचा गुलाम होतोस.  ती पत्नी खरोखरच कोण आहे ?  तुझ्याभोवती असणारे हे सर्व सगेसोयरे, आप्त, नातेवाईक कोण आहेत ?  याचा विचार कर.  म्हणजेच याचा शोध घे.  Proper enquiry कर.  मग तुला समजेल की, हा सर्व संसारच अतिशय विचित्र आहे.  हा संसार नाटकाप्रमाणे किंवा स्वप्नाप्रमाणे भ्रामक काल्पनिक आहे.  

आत्यंतिक प्रेमाने व करुणेने आचार्य मनुष्याला समजावून देतात की, बाळा !  तू कोण ?  तुझी पत्नी कोण ?  तुझा पुत्र कोण ?  तू कोणाचा आहेस ?  तू कोठून आलास ?  कोठे जाणार आहेस ?  या मुलभूत प्रश्नांचा विचार कर.  आपण जन्माला आल्यानंतर पती-पत्नी, पुत्र-पौत्र, सगेसोयरे वगैरे सर्व नाती निर्माण करतो.  “ही माझी पत्नी आहे”, असे म्हणतो.  त्याचप्रमाणे दोघांना पुत्रप्राप्ति होते.  कोणतातरी जीव त्याच्या प्रारब्धकर्माने आईवडिलांच्या पोटी जन्म घेतो.  त्याला आपण ‘माझा पुत्र’ असे म्हणतो.  

जोपर्यंत सर्व सुरळीत चालले आहे, परस्परांना अनुकूल आहेत, एकमेकांच्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, सामंजस्य आहे, तोपर्यंतच नाती टिकतात.  जेव्हा एकमेकांच्या सहवासाने, सान्निध्यात राहून एकमेकांच्यामधील दोष दिसायला लागतात, तेव्हा सर्व नाती संपतात.  आईवडील म्हणजे मुलाला व त्याच्या पत्नीला घरातील अडचण वाटते, अशा वेळी मनुष्य विचार करतो की, अरे !  खरोखरच हा माझा मुलगा आहे का ?  जेव्हा आपलाच मुलगा आपल्या दुःखाला कारण होतो, तेव्हा आपण संबंध तोडतो.  नाती संपतात.  

संसार हा आकाशातील ढगांच्या नागरीप्रमाणे सतत बदलणारा आहे.  संसार हा वाळवंटामधील चमकणाऱ्या वाळूवर भासणाऱ्या पाण्याप्रमाणे भासमान आहे.  केळीच्या सोपटाप्रमाणे संसार निःसार आहे.  स्वप्नाप्रमाणे नाटकाप्रमाणे भासमान आहे.  संसार हा रज्जूवर दिसणाऱ्या सर्पाप्रमाणे मिथ्या आहे.  असा हा संसार विचित्र आहे.  म्हणूनच मनुष्याने चिरंतन, शाश्वत सत्याचा शोध घ्यावा.  परमेश्वराला शरण जावे.  भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते |    


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015




- हरी ॐ

No comments:

Post a Comment