Friday, October 19, 2018

संकल्पांचा त्याग | Renunciation of Resolution





विश्वाच्या, विषयांच्या अधिष्ठानाचे जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत ते सर्व विषय सत्यच वाटतात. त्यांना सत्यत्व दिल्यामुळेच त्या विषयांच्यामध्ये प्रिय-अप्रिय वृत्ति निर्माण होतात.  त्यामुळे विषयांचे संकल्प, कामना, भोगलालसा निर्माण होते.  परंतु ज्या पुरुषाने या सर्व विश्वाचे, विषयांचे अधिष्ठानस्वरूप असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाचे प्रत्यगात्मस्वरूपाचे यथार्थ व सम्यक ज्ञान प्राप्त केलेले आहे त्याला हे सर्व अध्यस्त, कल्पित असणारे विषय मिथ्या स्वरूपाचे होतात.  एकदा विषयांचे मिथ्यात्व समजले की, त्यामध्ये संकल्प, कामना निर्माण होत नाहीत.  

जोपर्यंत रजताचे अधिष्ठानस्वरूप असणाऱ्या शुक्तीचे ज्ञान नसते, तोपर्यंत शुक्ति न दिसता शुक्तीच्या ठिकाणी चांदीच इंद्रियगोचर होवून सत्य भासते.  यामुळेच ती चांदी घ्यावी, हा संकल्प निर्माण होतो.  चांदीला सत्यत्व दिल्यामुळेच संकल्पाची निर्मिति होते.  परंतु ज्यावेळी रजताच्या अधिष्ठानाचे म्हणजेच शुक्तीचे यथार्थ आणि सम्यक ज्ञान प्राप्त होते त्यावेळी आपोआपच रजतामधील सत्यत्वबुद्धि गळून पडते.  मिथ्या रजताविषयी कोणत्याही प्रकारचा संकल्प निर्माण होत नाही, कारण मिथ्या, भासमान विषयाचा कधीही, कोणीही संकल्प निर्माण करीत नाही.  म्हणजेच अधिष्ठानाच्या यथार्थ ज्ञानाने अध्यस्त असणाऱ्या वस्तूचा संकल्प गळून पडतो.  

काम जानामि ते मूलं संकल्पात्त्वं हि जायसे |
न त्वां संकल्पयिष्यामि तेन मे न भविष्यसि ||     (महा. शान्ति. १७७-२५)   
हे काम !  तुझे मूळ कारण मी जाणतो.  संकल्पामधूनच तू जन्माला येतोस म्हणून मी तुझा संकल्प करणार नाही.  त्यामुळे तू मला प्राप्त होणार नाहीस.  

संकल्प हाच कामाचे कारण आहे.  म्हणून ब्रह्मज्ञानी यति सर्व ठिकाणी ब्रह्मस्वरूपच पाहात असल्यामुळे ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त असणाऱ्या सर्व विषयांच्या संकल्पांचा त्याग करतो.  विषयांमधील सत्यत्वबुद्धि गळून पडल्यामुळे आपोआपच मिथ्या विषयांचे सर्व संकल्पही मिथ्या होतात.  गळून पडतात.  तोच सर्वसंकल्पसंन्यासी होतो.  ब्रह्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाल्यामुळे या पुरुषाची द्वैतदृष्टि न राहाता त्याला पारमार्थिक स्वरूपाची, अद्वैताची, अभेदत्वाची दृष्टि प्राप्त होते. 

  

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

No comments:

Post a Comment