Monday, October 8, 2018

मोक्षपरायण | Engaged in Liberation




मोक्षः एव परं अयनं यस्य सः मोक्षपरायणः |  मोक्ष हेच ज्याचे आश्रयाचे स्थान आहे, तीच साधकाची परम, अत्युत्कृष्ट गति आहे आणि ती प्राप्त करण्यासाठीच ज्याचे मन व्याकूळ झालेले असून प्रयत्नशील असते, तो मोक्षपरायण होय.  ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये मनुष्याला एखाद्या वस्तूचा ध्यास लागतो, तो वेडा होतो, त्यावेळी मनुष्य काया-वाचा-मनासा त्या ईप्सित विषयासाठी अत्यंत व्याकूळ होत असतो.  ती प्राप्त करण्यासाठी प्राण देतो.  

अशा वेळी अन्य विषय पाहिले, अनुभविले तरी त्याचे मन त्यामध्ये रमत नाही.  ते विषय त्याला आकर्षित करू शकत नाहीत, कारण एकाच विषयाचा ध्यास लागल्यामुळे बाकी सर्व विषय त्याला तुच्छ वाटतात.  ही त्या मनुष्याच्या मनाची अवस्था असते.  

अशीच अवस्था साधकाची मोक्षासाठी झाली पाहिजे.  मोक्षाची तीव्र तळमळ निर्माण होऊन मन त्यासाठी अत्यंत व्याकूळ झाले पाहिजे.  यामुळे आपोआपच अन्य सर्व सुंदर मोहक विषय तुच्छ होतील.  साधक बाह्य विषयांच्यामध्ये वावरत असेल, विषय अनुभवत असेल, तरीही त्याच्या मनामध्ये बाह्य विषयांचे संकल्प उठणार नाहीत.  ते विषय त्याच्या मनाला आकर्षित करून व्याकूळ करू शकणार नाहीत.  ज्यावेळी साधकामध्ये तीव्र वैराग्य निर्माण होते त्यावेळी ही अवस्था निर्माण होते.  त्यावेळी फक्त एकच तीव्र इच्छा असते, ती म्हणजे मोक्षप्राप्तीची किंवा ज्ञाननिष्ठेची !  

अशा साधकाचे मन बाह्य विषयासक्तीमधून निवृत्त होऊन अंतर्मुख आणि चिंतनशील होते.  ते मन आत्मचिंतनामध्येच अखंड तन्मय, तल्लीन होते.  तो सत्त्वगुणप्रधान असलेला साधकच मुनि आहे.  मननशीलात् इति मुनिः |  तो अखंड आत्मचिंतनाने आत्मस्वरूपामध्ये स्थिर होतो.  तो त्याचा स्वभाव बनतो.  त्याला सम्यक यथार्थ ज्ञान प्राप्त होऊन अहंकार-ममकारादि प्रत्यय गळून पडतात आणि तो अंतरंगामध्ये स्वस्वरूपाने आत्मतृप्ति, संतुष्टता प्राप्त करतो.  तो याच शरीरामध्ये राहून जीवनमुक्तावस्था प्राप्त करतो.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ




No comments:

Post a Comment