आत्मस्वरूपाचे
ज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषाला ‘शम’ हेच पुष्कल कारण सांगितले जाते. मग ही उपशमा कशी करावी ? किंवा ‘उपशमा’ म्हणजे काय ? उपशमा म्हणजेच ब्रह्मस्वरूपावर आरोपित
केलेल्या नामरूपादींचे अग्रहण करणे होय.
आपण
इंद्रियांच्या माध्यमामधून जेव्हा बाह्य विषयांचे अनुभव घेतो तेव्हा मनामध्ये त्या
त्या विषयाची वृत्ति निर्माण होते. वृत्तीरूपाने अंतःकरणामध्ये असणारे हे विषयच
मनाला विचलित करतात. म्हणूनच या
विषयांमधून निवृत्त झाले पाहिजे. परंतु
बाह्य विषय हे डोळ्यांना दिसणारच ! म्हणूनच
येथे शारीरिक निवृत्ति नसून त्या विषयांचे मनामध्ये जे संस्कार आहेत, प्रचंड
आकर्षण आहे त्या विषयासक्तीमधून निवृत्त झाले पाहिजे. हे सर्व विषय सत्य नसून ते ब्रह्मस्वरूपावर
अध्यस्त, मिथ्या आहेत, हे समजावून घेवून त्यापासून निवृत्त झाले पाहिजे.
आचार्य
सांगतात –
विरज्य
विषयव्राताद्दोषदृष्ट्या मुहुर्मुहुः |
स्वलक्ष्ये
नियतावस्था मनसः शम उच्यते || (विवेकचुडामणि)
पुन्हा
पुन्हा विषयांचे दोष पाहून विषयसमुहापासून हळूहळू निवृत्त होऊन मन स्वतःच्या
लक्ष्यामध्ये – स्वस्वरूपामध्ये स्थिर करणे यालाच ‘शम’ असे म्हणतात.
अशा
प्रकारे विषयरस, विषयाकर्षण गळून पडले पाहिजे. यामुळे विश्वामध्ये, विषयांच्यामध्ये राहूनही ते
विषय मनावर परिणाम करू शकत नाहीत. मन
विचलित करू शकत नाहीत. भगवान दुसऱ्या
अध्यायाच्या शेवटी खूप सुंदर उपमा देतात – ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी परिपूर्ण,
अचल असलेल्या समुद्रामध्ये नद्यांचे पाणी प्रवेश करते, त्याप्रमाणे ज्या स्थिरबुद्धि
पुरुषामध्ये सर्व विषय विकार निर्माण न करता प्रवेश करतात त्यालाच परमशांति
प्राप्त होते. कामुक पुरुषाला प्राप्त
होत नाही. म्हणून शमयुक्त, स्थिर मनच
ज्ञाननिष्ठेचे अधिकारी आहे. ‘शम’ हेच
ज्ञाननिष्ठेचे पुष्कल साधन आहे.
- "श्रीमद्
भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment