जरी
सर्व चित्तवृत्ति ब्रह्मात्मस्वरूपामध्ये स्थिर, दृढ झाल्या तरी सुद्धा कधी कधी
अन्य प्रयोजनाची अपेक्षा असल्यामुळे त्या निष्ठेमध्ये प्रतिबंध निर्माण होतात.
याचे कारण ज्ञानी पुरुष सुद्धा शरीरयात्रेसाठी किंवा लोकसंग्रह करण्यासाठी अनेक
प्रकारच्या बाह्य कर्मामध्ये प्रवृत्त होत असतो. त्यामुळे कळत-नकळत त्याची
बहिर्मुख होण्याची शक्यता आहे. तसेच त्या मनामध्ये विषयसंगाने आणि जनसंपर्कामुळे
चांगले-वाईट विचार किंवा प्रसंगामुळे मनाचा क्षोभ, संताप होऊन विक्षेप निर्माण
होतात. त्याचे मन काही प्रमाणामध्ये अस्वस्थ व व्याकूळ होते. याचा परिणाम म्हणजे
ब्रह्मनिष्ठेमध्ये काही प्रमाणात प्रतिबंध निर्माण होतात. ब्रह्मनिष्ठा असूनही
परमशांति मिळत नाही.
म्हणून
विद्वान पुरुषाने शरीराने कर्म करीत असताना सुद्धा आहारविहारादि सर्व
व्यापारामध्ये बुद्धीने कर्मांचा किंवा विषयांचा आश्रय न घेता सतत ब्रह्मस्वरूपाचा
आश्रय घ्यावा. म्हणजेच बाह्य वृत्तींचा निरास करून आत्मस्वरूपात स्थिर होण्याचा
अभ्यास करावा. ‘मी’ आत्मा अकर्ता-अभोक्ता आहे हे जाणून साक्षित्वाचा अखंड अभ्यास
करावा. तोच तत्परायण आहे.
या
अभ्यासामुळे –
योगरतो
वा भोगरतो वा सङ्गरतो वा सङ्गविहिनः |
यस्य
ब्रह्मणि रमते चित्तम् नन्दति नन्दति नन्दत्येव || (भजगोविन्दम् )
तो
योगी योगाभ्यासामध्ये असो किंवा प्रारब्धाने प्राप्त होणाऱ्या भोगामध्ये असो, तसेच
जनसंपर्कामध्ये असो किंवा जनसंपर्काचा त्याग करून एकांतामध्ये असो, त्याचे मन ब्रह्मस्वरूपामध्ये
तन्मय झालेले असल्यामुळे तो सर्व प्रसंगामध्ये किंवा परिस्थितीमध्ये नित्य आनंदी,
प्रसन्न असतो. तोच जीवनामधील खरा आनंद उपभोगतो. नव्हे, तर तोच आनंदस्वरूप होतो.
भगवान
म्हणतात –
यस्त्वात्मरतिरेव
स्यादात्मतृप्तश्च मानवः |
आत्मन्येव
च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ||
(गीता अ. ३-१७)
जो
आत्म्यामध्ये रममाण झालेला असून आत्मतृप्त आणि आत्मसंतुष्ट असतो, त्या यतीला
कोणतेच कर्तव्य शिल्लक राहात नाही.
- "श्रीमद्
भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
No comments:
Post a Comment