Monday, June 18, 2018

विदेहकैवल्यप्राप्ति | Achieving Liberation




१. सर्वत्र ब्रह्मदर्शन,  २. ब्रह्मात्मदर्शन, ३. तन्निष्ठा आणि ४. तत्परायणत्व – हे चार घटक विदेहकैवल्यप्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहेत.  म्हणून ज्या साधकांनी निष्काम कर्मयोग आणि उपासना यांचे प्रदीर्घ अनुष्ठान करून चित्तशुद्धि, दैवीगुणसंपत्ति आणि विवेकवैराग्यादि गुण आत्मसात करून ज्ञानसाधनेने अप्रतिबद्ध सहजस्वाभाविक स्वरूपाची अवस्था प्राप्त केलेली आहे, त्यांचे सर्व प्रकारचे अंतरिक दोष नाहीसे होतात.  

स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे अनेक भेद निर्माण होतात.  १) जीव आणि ईश्वर भेद, २) जीव आणि जगत भेद, ३) जगत आणि ईश्वर भेद, ४) जीव आणि अन्य जीव भेद आणि ५) ईश्वर व जीव भेद.  हे सर्व भेद स्वस्वरूपाच्या ज्ञानाने नाहीसे केलेले आहेत अशा विद्वान पुरुषांना पुनरावृत्ति नसलेली परमगति प्राप्त होते.  वर्तमान देहपातानंतर पुन्हा पुन्हा देह प्राप्त करणे म्हणजे पुनरावृत्ति होय.  याला कारण – जीवाचे पाप-पुण्यात्मक कर्म-कर्तृत्व-भोक्तृत्व आणि अज्ञान हे आहे.  

ज्याप्रमाणे मोहरीचे झाड त्याचे बीज मागे ठेवून मरून जाते आणि पर्जन्यवृष्टि झाल्यानंतर पुन्हा उगवते, त्याचप्रमाणे अज्ञानी जीव वर्तमान शरीराच्या मृत्यूपूर्वीच आपल्या नवीन कर्माचे बीज संस्काररूपाने पेरतो व ते पुढील शरीरासाठी कारण होते.  ज्ञानी पुरुष मात्र सर्व संसाराचे असलेले कारण अज्ञान आणि कर्तृत्व-भोक्तृत्व यांचा ज्ञानाने संपूर्ण निरास करून कर्मफलाच्या चक्रामधून मुक्त होतो.  याच शरीरामध्ये त्याने देहात्मबुद्धीचा निरास करून आत्मस्वरूपाची दृढ वृत्ति केलेली असते.  कारणनाशात् कार्यनाशः |  या न्यायाने पुनर्जन्माच्या असलेल्या बीजाचा, अज्ञानाचा ज्ञानाने संपूर्ण नाश झाल्यामुळे जन्ममृत्यूची कल्पनाच गळून पडते.  आत्मवित् शोकं तरति |  (छांदो. उप. ८-४-२) आत्मज्ञानी शोकसागराला पार करतो आणि याच शरीरामध्ये तो जीवनमुक्तावस्था प्राप्त करतो.  

याप्रमाणे जीवनमुक्त पुरुष प्रारब्धक्षय झाल्यानंतर वर्तमानकाळातील मिथ्या शरीराचा त्याग करून विदेहकैवल्यावस्था प्राप्त करतो.  म्हणजेच कारणाचा अभाव असल्यामुळे त्याला पुन्हा जन्म येत नाही तर उपाधीचा त्याग झाल्यानंतर निरुपाधिक परब्रह्मस्वरूपाने राहातो.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

No comments:

Post a Comment