शास्त्रामध्ये
“आत्मपरीक्षण” (Self Introspection) ही
महत्त्वाची साधना सांगितलेली आहे. आपले
दोष मान्य करणे, ही पहिली साधना आणि ते जाणीवपूर्वक काढणे ही दुसरी साधना आहे.
यामुळे आपोआपच दंभित्वाची वृत्ति हळुहळू
कमी होऊन “अदंभित्व” आत्मसात होईल.
दंभित्वाची
वृत्ति ही मनामध्ये असल्यामुळे बदल हा मनामध्येच झाला पाहिजे. दोष सर्वांच्यामध्येच आहेत. दोष असेल तरी हरकत नाही. फक्त दोष मान्य करून ते काढून टाकण्याचा
प्रामाणिक प्रयत्न मात्र केला पाहिजे. आपल्याला
दुसऱ्यांच्यामधील दोष चटकन दिसतात. दुसऱ्याबद्दल
बोलताना आपण बहुतांशी त्याच्या दोषांचीच मीमांसा करीत असतो. दुसऱ्याचे दोष पाहाणे, हा साधकाच्या दृष्टीने
अक्षम्य गुन्हा आहे, तर आपले स्वतःचे दोष पाहाणे ही खरी साधना आहे. दुसऱ्याचे दोष पाहिल्यामुळे आपले मन बहिर्मुख,
अशांत, विक्षिप्त होते. आपण सतत
दुसऱ्याचाच विचार करीत असल्यामुळे स्वतःसाठी एक क्षणही जगू शकत नाही. दुसऱ्यांचा विचार करीत आपण मौल्यवान वेळ व्यर्थ
खर्च करतो.
यामुळे
साधकाने स्वतःच स्वतःचे दोष मान्य करावेत. यामुळे प्रतिक्रिया कमी होतील. समजा, व्यवहारात आपल्याशी कोणी तावातावाने भांडत
असेल आणि आपणही तितक्याच आवेशाने भांडलो, आवाज चढविला तर ते भांडण विकोपाला जाते. परंतु आपण कोणतीही प्रतिक्रिया न दर्शविता
अत्यंत शांत राहिलो तर समोरील व्यक्तीचा सर्व जोष, आवेश क्षणार्धात कमी होतो. यामुळे साधकाने अत्यंत प्रांजळपणे आपले दोष
मान्य करावेत. आपले अज्ञान मान्य करावे. बुरखे पांघरून जगू नये.
जग
आपल्याला सामावून घेणार नाही. आपणच
आपल्याला आपण जसे आहोत तसे सामावून घेतले पाहिजे. ‘मी’च माझ्या दोषांना मान्य करावे. त्यामुळे दुसऱ्याने आपले दोष दाखविले तरी ‘मी’
एकदम upset होणार नाही. उलट आनंदाने मी मान्य करेन. एवढी मनाची ताकद निर्माण झाली
पाहिजे. यामुळे आपोआपच अदंभित्वाची वृत्ति
आत्मसात होईल.
- "दिव्यत्वाचा
मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010
- Reference: "Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment