Sunday, May 27, 2018

अभेदत्वाची दृष्टी | Non-Discriminatory Vision




द्वैतबुद्धीमुळे जीव स्वतःच्या अज्ञानामुळे संसार निर्माण करतो.  अज्ञानामुळे जो सर्व विश्वाचे तत्त्व न जाणता फक्त नानात्व, अनेकत्व पाहातो.  अशा पुरुषाला काय मिळते ?  
श्रुति म्हणते – मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति |          (कठ. उप. २-१-११)
जो येथे नानात्व, अनेकत्व पाहातो तो एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूपर्यंत जातो.  म्हणजे – पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननीजठरे शयनम् |  तो जीव पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकतो.  

परंतु शुद्ध अंतःकरणाचा विचारी पुरुष – यत् दृष्टं तत् सत्यं |  जे दिसते ते सत्य आहे असे न मानता द्रष्टा आणि दृश्याच्या मागे कोणते तत्त्व आहे, याचा सतत शोध घेत असतो आणि सद्गुरूंच्या कृपेने श्रवण-मनन आणि अखंड चिंतनाने तो पारमार्थिक तत्त्व शोधतो.  त्यावेळी त्याला समजते की, द्रष्टा-दृश्य-दर्शन, ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान किंवा प्रमातु-प्रमेय-प्रमाण हा व्यवहार सत्य नाही तर, साक्षीस्वरूप असलेले कूटस्थअसंगचिद्रूपसाक्षीचैतन्य हेच सत्य आहे.  अनेकत्व-नानात्वाने युक्त असलेले सर्व विश्व तसेच द्रष्टा-दृश्य-दर्शनादि द्वैतव्यवहार साक्षीचैतन्यामध्येच अस्तित्वामध्ये आहे.  

इतकेच नव्हे, तर जीव जगत आणि ईश्वर सुद्धा एकमेकांपासून भिन्न नाहीत तर सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप हेच सर्वांचे अधिष्ठान आहे.  त्यामुळे अधिष्ठानाच्या दृष्टीने पाहिले तर ब्रह्म एव सत्यं अन्यत् सर्वं मिथ्या इति |  प्रत्यगात्मस्वरूप असलेले परब्रह्म हेच सत्य आहे आणि सर्व द्वैतव्यवहार मिथ्या स्वरूपाचा आहे, कारण तरंग, बुडबुडे ज्याप्रमाणे पाण्यामधून निर्माण होतात, पाण्यामध्येच अस्तित्वात असतात आणि पाण्यामध्येच विरून जातात.  त्यामुळे पाणी हेच सत्य असून अन्य सर्व नामरूपांचा पाण्यामध्ये दिसणारा भास आहे.  सर्व दिसणारा भेद कल्पित आहे.  त्याचप्रमाणे तत्त्ववेत्ता पुरुष सुद्धा विश्वाकडे पाहाताना तत्त्वाच्या दृष्टीने पाहात असल्यामुळे त्याला फक्त ब्रह्मस्वरूप दिसते.  पाहाणारा द्रष्टा आणि पाहाण्याची दृश्य वस्तु हे भिन्न नसून चैतन्यस्वरूपच आहेत.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ – 

Tuesday, May 22, 2018

क्षान्ति | Forgiveness




व्यवहारामध्ये जोपर्यंत आपल्याला कोणी त्रास देत नाही, तोपर्यंत आपण सर्वांशीच चांगले वागतो.  परंतु ज्यावेळी एखादी व्यक्ति आपल्याला त्रास देते, आपल्याशी वाईट पद्धतीने वागते, त्यावेळी आपण जशास तसे न वागता त्या व्यक्तीला क्षमा करणे म्हणजेच “क्षान्ति” म्हणजेच सहनशीलता, सहिष्णुता होय.  

एखाद्या व्यक्तीला क्षमा करायची म्हणजे नेमके काय करायचे ?  जीवन जगत असताना आपला अनेक व्यक्तींशी सतत संबंध येत असतो.  त्या अनुषंगाने सतत चांगले-वाईट, काही सुखकारक तर काही दुःखकारक असे प्रसंग घडत असतात.  आपण सतत कोणत्या ना कोणत्यातरी प्रसंगामध्ये असतो. जीवन म्हणजेच प्रसंगांची अखंड मालिका आहे.  प्रत्येक प्रसंग हा अटळ, अपरिहार्य असेल तर पुरुषार्थ कोणता ?  कितीही प्रयत्न केले, स्थान बदलले, घरातून अरण्यात गेलो तरी तिथेही अन्य व्यक्ति असतातच.  त्यामुळे तेथेही चांगले-वाईट प्रसंग निर्माण होतातच.  हे निर्विवाद सत्य आहे.  कोणताही प्रसंग आपण टाळू शकत नाही. थांबवू शकत नाही. अथवा बदलू शकत नाही.  

आपल्या जीवनात ज्यावेळी चांगले प्रसंग येतात, त्यावेळी आपण त्याचे सर्व कर्तृत्व स्वतःकडे घेतो.  मात्र ज्यावेळी दुःखाचे प्रसंग, वाईट, प्रतिकूल परिस्थिति निर्माण होते, त्यावेळी आपले मन निराश, उद्विग्न होते.  आपण दुसऱ्यालाच दोष देतो.  आपले नातेवाईक, बांधव, अन्य लोक अथवा स्वतःचे गुरु, आकाशामधील शनि वगैरेदि सर्वांनाच दोषी ठरवितो.  परमेश्वरावरील श्रद्धा, निष्ठा डळमळीत होते.  आत्मविश्वास संपतो.  धैर्य खचते.  जीवनाची दुर्दशा होते.  

वास्तविक पाहाता परमेश्वराने आपल्याला इतके सुंदर विश्व बहाल केलेले आहे.  परंतु आपल्या मनातच आनंद नसल्यामुळे विश्वामधील आनंदाचा आस्वाद घेता येत नाही.  क्षुल्लक गोष्टींसाठी आपण इतके निराश, उद्विग्न होत असू तर असे सतत खचणारे (upset होणारे) मन साधनेमध्ये तल्लीन होऊ शकत नाही.  मी कशाला महत्त्व द्यावे ?  There are better things to think and to do.  यासाठीच साधकाने “क्षान्ति” म्हणजेच “तितिक्षा” हा गुण आत्मसात करावा.  
   

- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "
Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010



- हरी ॐ – 

Tuesday, May 15, 2018

साधूंची प्रेम-छाया | Love-Canopy of Saints




शास्त्रकार सुंदर दृष्टांत देतात.  आपल्या शरीरामध्ये अनेक अवयव आहेत.  सर्व अवयवांच्यावर आपण सारखेच प्रेम करतो.  एका हाताला लागले तर दुसरा हात त्यावरून हळुवारपणे फिरविला जातो.  तेथे आपण कोणताच भेद करीत नाही.  नव्हे, आपल्या मनामध्ये भेदाची कल्पनादेखील निर्माण होत नाही.  

याप्रमाणेच साधकाने सर्व जीवांना समदृष्टीने पाहावे.  सर्वांच्यावर शुद्ध प्रेम करावे.  वास्तविक प्रेम करता येत नाही.  प्रेम दाखविताही येत नाही.  तर “प्रेम” हा मनुष्याचा स्वभाव झाला पाहिजे.  या विश्वामध्ये प्रेमाइतकी कोणतीही पवित्र, सुंदर, शुद्ध गोष्ट नाही.  प्रत्येक जीव प्रेमाचा भुकेला असतो.  प्रेमाचे दोन शब्द ऐकण्यासाठी जीवनभर मनुष्य आसुसलेला असतो.  हे शुद्ध प्रेम फक्त साधु पुरुषच करू शकतो.  

आजपर्यंत सर्व समाजावर साधूंनी, संतांनीच शुद्ध प्रेम केलेले आहे.  आपल्या प्रेमळ शब्दांच्या हळुवार स्पर्शाने लाखो जीवांची आसवे पुसलेली आहेत.  त्यांना या दुःखसागरामधून बाहेर काढलेले आहे.  याचे कारण साधु पुरुषाच्या मनामधून राग, द्वेष, कामुकता, स्वार्थ या सर्व वृत्ति गळून पडलेल्या असतात.  तोच निःस्वार्थ, निष्काम प्रेम करतो.  म्हणून साधूंच्या सहवासात शुद्ध आनंदाची प्राप्ति होते.  त्यांच्या प्रेमवृक्षाच्या छायेमध्ये सर्व दुःखी-कष्टी जीव आनंदी, प्रसन्न होतात.  

यासाठीच साधकाने अहंकार-ममकार, राग-द्वेष यांचा त्याग करून हिंसात्मक वृत्तीच्या विरुद्ध असणारी प्रतिपक्षभावना म्हणजेच “प्रेमवृत्ति” आत्मसात केली पाहिजे.  म्हणजे आपोआपच “अहिंसावृत्ति” आत्मसात होईल.  या शुद्ध, शांत मनामध्येच ज्ञानाचा उदय होईल.  म्हणून “अहिंसा” हा स्वभाव झाला पाहिजे.  
   

- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "
Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010



- हरी ॐ – 

Tuesday, May 8, 2018

आत्मपरिक्षण | Self Introspection




शास्त्रामध्ये “आत्मपरीक्षण” (Self Introspection) ही महत्त्वाची साधना सांगितलेली आहे.  आपले दोष मान्य करणे, ही पहिली साधना आणि ते जाणीवपूर्वक काढणे ही दुसरी साधना आहे.  यामुळे आपोआपच दंभित्वाची वृत्ति हळुहळू कमी होऊन “अदंभित्व” आत्मसात होईल.

दंभित्वाची वृत्ति ही मनामध्ये असल्यामुळे बदल हा मनामध्येच झाला पाहिजे.  दोष सर्वांच्यामध्येच आहेत.  दोष असेल तरी हरकत नाही.  फक्त दोष मान्य करून ते काढून टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र केला पाहिजे.  आपल्याला दुसऱ्यांच्यामधील दोष चटकन दिसतात.  दुसऱ्याबद्दल बोलताना आपण बहुतांशी त्याच्या दोषांचीच मीमांसा करीत असतो.  दुसऱ्याचे दोष पाहाणे, हा साधकाच्या दृष्टीने अक्षम्य गुन्हा आहे, तर आपले स्वतःचे दोष पाहाणे ही खरी साधना आहे.  दुसऱ्याचे दोष पाहिल्यामुळे आपले मन बहिर्मुख, अशांत, विक्षिप्त होते.  आपण सतत दुसऱ्याचाच विचार करीत असल्यामुळे स्वतःसाठी एक क्षणही जगू शकत नाही.  दुसऱ्यांचा विचार करीत आपण मौल्यवान वेळ व्यर्थ खर्च करतो.  

यामुळे साधकाने स्वतःच स्वतःचे दोष मान्य करावेत.  यामुळे प्रतिक्रिया कमी होतील.  समजा, व्यवहारात आपल्याशी कोणी तावातावाने भांडत असेल आणि आपणही तितक्याच आवेशाने भांडलो, आवाज चढविला तर ते भांडण विकोपाला जाते.  परंतु आपण कोणतीही प्रतिक्रिया न दर्शविता अत्यंत शांत राहिलो तर समोरील व्यक्तीचा सर्व जोष, आवेश क्षणार्धात कमी होतो.  यामुळे साधकाने अत्यंत प्रांजळपणे आपले दोष मान्य करावेत.  आपले अज्ञान मान्य करावे.  बुरखे पांघरून जगू नये.  

जग आपल्याला सामावून घेणार नाही.  आपणच आपल्याला आपण जसे आहोत तसे सामावून घेतले पाहिजे.  ‘मी’च माझ्या दोषांना मान्य करावे.  त्यामुळे दुसऱ्याने आपले दोष दाखविले तरी ‘मी’ एकदम upset होणार नाही.  उलट आनंदाने मी मान्य करेन.  एवढी मनाची ताकद निर्माण झाली पाहिजे.  यामुळे आपोआपच अदंभित्वाची वृत्ति आत्मसात होईल.  
   

- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "
Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010



- हरी ॐ

Tuesday, May 1, 2018

दांभिकाचे वर्तन | Behavior of a Pretender





भाष्यकार दांभिक माणसाच्या वर्तनाचे वर्णन करतात – वेषभाषाक्रियाचातुर्यादिभिः |

१) वेषचातुर्य – वेष म्हणजेच कपडे किंवा पेहराव.  मनुष्य अनेक प्रकारचे वेष धारण करतो.  मी श्रीमंत आहे, हे दाखविण्यासाठी उत्तम-उत्तम उंची, तलम वस्त्रे परिधान करतो.  घरामध्ये कदाचित अन्नान्न दशा असेल, परंतु बाहेर मात्र एकदम श्रीमंती वेष असतो.  त्यामुळे लोक त्याला श्रीमंत समजतात.  त्याचा रुबाब, ऐट पाहून त्याच्याबद्दल एक प्रकारचा दबदबा, आदर निर्माण होतो.  यालाच वेषचातुर्य असे म्हणतात.  

२) भाषाचातुर्य – ही एक फार मोठी कला आहे.  काही लोकांना ती सहज अवगत असते.  आपल्या मृदु भाषेच्या प्रभावाने ते अन्य व्यक्तीला मंत्रमुग्ध करतात.  त्यांची वाणी अत्यंत मधुर, मोहक, भुरळ पाडणारी असते.  लोकांना आकर्षित करणारी असते.  परंतु यामागे खरे प्रेम, जिव्हाळा नसून फक्त स्वतःचा स्वार्थ असतो.  स्वार्थपूर्ति होईपर्यंत ते अत्यंत गोड-गोड बोलतात.  

म्हणून एखादा मनुष्य आपल्याशी खूप गोड बोलत असेल तर निश्चितपणे त्यामागे त्याचा स्वार्थ आहे, असे समजावे.  मधु तिष्ठति जिव्हाग्रे हृदये तु हलाहलम् |  त्याच्या बोलण्यामधून त्याची नम्रता, विनयशीलता, प्रेम दिसत असेल, जिभेवर मध ठेवल्याप्रमाणे तो अत्यंत गोड, लाघवी बोलत असेल तरीही त्याच्या मनामध्ये मात्र हलाहल वीष, कपटी वृत्ति असते.  स्वतःचा कार्यभाग साधला की, तो दुसऱ्या व्यक्तीला क्षणार्धात दूर करतो.  याप्रकारे हा मनुष्य आपल्या भाषाचातुर्याने जगाला फसवितो.  
३) क्रियाचातुर्य – दांभिक मनुष्य कोणतेही कर्म इतक्या कुशलतेने करतो की, त्याच्याबद्दल इतरांना कोणतीही शंका येत नाही.  उदाहरण म्हणजे निवडणुका जवळ आल्या की, आपली नेतेमंडळी औदार्य दाखवून अनेक कामे केल्यासारखी भासवितात.  

अशा प्रकारे या तीन चातुर्यांच्या साहाय्याने मनुष्य स्वतःचा स्वार्थ पूर्ण करतो.  
   

- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "
Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010


- हरी ॐ