आपल्या
अंतःकरणामध्ये गुह्य ज्ञानाचे बीज पेरायचे असल्यास प्रथम अंतःकरणाची मशागत केली
पाहिजे. आज आपले मन अशुद्ध आहे, कारण अनेक
जन्मांचे आपल्या मनावर चांगले-वाईट संस्कार झालेले आहेत. आपण आपल्या पुरुषार्थाने सतत रागद्वेषांचे,
कामक्रोधादि विकारांचे पोषण करीत असतो. ही
सर्व अशुद्धता नाहीशी करण्यासाठीच सर्व साधना आहे. ज्ञानप्राप्तीला वेळ लागत नाही. पूर्वतयारीसाठीच जन्मानुजन्मे लागतात.
यासाठी
भगवंतांनी अर्जुनाला गीतेमध्ये अनेक ठिकाणी एकच साधना पुन्हा-पुन्हा सांगितलेली
आहे. आपल्याला वाटते की, भगवान
पुन्हा-पुन्हा तेच-तेच का सांगतात ? याचे
कारण आपल्याला एकदा सांगून समजत नाही. तो
उपदेश मनावर ठसण्यासाठी पुनरावृत्तीची आवश्यकता आहे.
सूत्रकार
म्हणतात –
आवृत्तिरसकृत् उपदेशात् | (ब्रह्मसूत्र ४-१-१)
किंवा –
पौनः
पुन्येन श्रवणं कुर्यात् | (शांकरभाष्य)
आपण
सर्व साधक थोडीशी साधना करतो आणि लगेचच आत्मसाक्षात्काराची अपेक्षा करतो. हे कसे शक्य आहे. गुरूंनी साधना सांगितल्यावर, ही साधना किती वेळ
करू ? किती दिवस करू ? असे प्रश्न विचारतो. बिचारे गुरु यावर काय उत्तर देणार ?
जसे,
आपण रोज स्वयंपाक करतो. स्वयंपाकासाठी
वापरलेली भांडी आपण स्वच्छ करतो आणि पुन्हा वापरतो. ते भांडे स्वच्छ झाल्याशिवाय वापरता येत नाही. त्याप्रमाणेच आपले मन आहे. व्यवहारामध्ये मनाचा सतत वापर होत असल्यामुळे
ते चांगल्या-वाईट विचारांनी अशुद्ध, कलुषित होत असते. रात्रंदिवस मन कार्यरत असते. तसेच मागील जन्मांच्यामधील संस्कारांच्यामुळे ते
अशुद्ध झालेले असते. त्यामुळे
अंतःकरणशुद्धीची साधना ही एक दिवस, दोन दिवस नसून अनेक जन्मांची साधना आहे.
- "दिव्यत्वाचा
मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010
- Reference: "Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment