Tuesday, December 5, 2017

जितेंद्रियः | Victor of Senses
जितेंद्रियः – मन शुद्ध होऊन ब्रह्माभ्यासाने विषयासक्ति आणि भोगवासना गळून पडली की, मनाची उपशमा होते.  मनामधील क्षोभ, संताप, कामक्रोधादि विकार संपतात.  याचा परिणाम म्हणून साधकाला स्वभावतःच मनःसंयमन प्राप्त होते.  मन एकदा ताब्यात आले की, आपोआपच सर्व इंद्रिये त्याच्या ताब्यात येऊन तो जितेंद्रिय होतो.  

सर्व इंद्रिये त्यांच्या स्वभावाप्रमाणे बहिर्मुख असून विषयांच्यामध्येच रमत असतात.  ती विषयभोगासाठी सतत व्याकूळ झालेली असतात. वखवखलेली असतात.  यामुळे ती हळूहळू उधळलेल्या घोड्यांच्याप्रमाणे स्वैर, अनियंत्रित होऊन मनुष्याला गुलाम बनवितात.  त्याच्या बुद्धि आणि मनाला खेचून विषयाभिमुख करतात.  इतकेच नव्हे, तर मनुष्याला पशुतुल्य बनवितात.  म्हणून जीवन जगत असताना इंद्रियांच्यावर संयमन करणे आवश्यक आहे.  

यासाठी साधकाने विवेकाचा आश्रय घेऊन मनरूपी लगामाने इंद्रियांना वश करून घ्यावे. त्यांना सदाचार, सत्कर्म आणि धर्माचरणामध्ये प्रवृत्त करून दुष्टाचरण आणि अधर्माचरणापासून निवृत्त करावे.  म्हणजे त्यांच्या स्वैर, उच्छृंखल वृत्तीवर नियमन होईल आणि शेवटी ब्रह्माभ्यासाने ज्यावेळी मनावर संपूर्ण संयमन होईल त्यावेळी आपोआपच इंद्रियांच्यावर संपूर्ण निग्रह होईल.  

कूर्मोङ्गानीव सर्वशः |  ज्याप्रमाणे कासव पाण्यामध्ये मुक्त विहार करीत असते, परंतु धोक्याची सूचना मिळाल्याबरोबर ते आपले सर्व अवयव कवचाखाली निवृत्त करून रक्षण करते आणि धोका नाहीसा झाल्यानंतर पुन्हा मुक्त संचार करते, त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाला इंद्रियांच्यावर संपूर्ण संयमन प्राप्त होते.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐNo comments:

Post a Comment